सांसर्गिक व औपसर्गिक अशा दोन्ही प्रकारच्या व्याधींमध्ये धूपन चिकित्सा करावी, असे शास्त्रात सांगितले आहे. विषाणू-जीवाणू, बुरशी व सूक्ष्मजीव यांचे प्रसरण हवेतून होते. ते थांबविण्यासाठी धूपनाचा अवलंब करावा. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया...
कोरोनाचा संसर्ग तीन पद्धतीने होतो.
१) ड्रॉप्लेट ट्रान्समिशन : ‘कोविड’ ‘पॉझिटिव्ह’ रुग्णाच्या शिंकेमार्फत, खोकल्यामार्फत, कफाद्वारे जेव्हा संसर्ग पसरतो, त्याला ‘ड्रॉप्लेट ट्रान्समिशन’ किंवा ‘थेंबप्रसारण संसर्ग’ असे म्हणतात.
२) कॉन्टॅक्ट ट्रान्समिशन : कोरोनाच्या विषाणूंनी बाधित वस्तू, पृष्ठभाग याच्याशी संपर्क येऊन तोच हात नाका-तोंडाला लावल्याने जे प्रसारण होते, त्याला ‘संपर्क प्रसारण’ म्हणतात. हे कोरोनाचे विषाणू कार्डबोर्डवर २४ तास, स्टील व प्लास्टिकच्या वस्तूंवर दोन ते तीन दिवस सक्रिय राहतात. म्हणजे ‘कोविड-१९1’चा रुग्ण जरी तिथे नसला, तरी त्याच्या संपर्कात आलेल्या वस्तूंचाही स्पर्श झाल्याने कोरोनाचे विषाणू पसरतात.
३) एरोसोल ट्रान्समिशन : कोरोनाचे विषाणू अत्यंत सूक्ष्म स्वरुपात हवेत राहतात. त्यांची प्रसरणशीलताही अधिक व्यापक असते. हे विषाणू वातावरणात तीन तास सक्रिय राहू शकतात. म्हणजे ‘कोविड’ ’पॉझिटिव्ह’ रुग्ण शिंकून/खोकून गेल्यानंतर त्या जागी सूक्ष्म कणांमध्ये/द्रव स्वरुपात कोरोनाचे विषाणू तीन तास सक्रिय असतात.
ही वैशिष्ट्ये लक्षात घेतल्यास असे लक्षात येते की, सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) व मास्कचा वापर किती महत्त्वाचा आहे. तसेच ‘सॅनिटायझेशन’ (स्वच्छता व निर्जंतुकीकरण) ही अत्यंत गरजेचे आहे. ‘हॅण्ड सॅनिटायझर’ने आपण फक्त हात ‘सॅनिटाईझ’ करतो. पण, परिसर ‘सॅनिटाईझ’ करण्यासाठी ते अपुरे आहे. ‘सॅनिटायझर चेंबर’ही त्यासाठी पूरक होत नाही. यासाठी धूपन चिकित्सेचा खूप फायदा होतो. आयुर्वेदशास्त्रात धूपन चिकित्सेबद्दल खूप विस्तृत वर्णन केले आहे. सांसर्गिक व औपसर्गिक अशा दोन्ही प्रकारच्या व्याधींमध्ये धूपन चिकित्सा करावी, असे शास्त्रात सांगितले आहे. विषाणू-जीवाणू, बुरशी व सूक्ष्मजीव यांचे प्रसरण हवेतून होते. ते थांबविण्यासाठी धूपनाचा अवलंब करावा. धूपनातील वापरलेल्या घटकांनुसार ते ‘व्याधी प्रतिबंधात्मक’ व ‘रोगनिवारक’ अशी दोन्ही कार्य करते.
धूपनामध्ये वनस्पती (विविध) वापरल्या जातात. त्यांच्या औषधी गुणधर्मानुसार त्यांचा वापर करावा. सद्यस्थितीत कुठले धूपन करावे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. धूपन कोंदटलेल्या/बंद ठिकाणी न करता, उघड्या जागी करावे, अशाने तो धूर सर्वदूर पसरून त्याचे कार्य अधिक परिसरात पसरते. घरात, बाल्कनीमध्ये, इमारतीच्या ‘कॉमन एरिया’मध्ये, गच्चीवर, कॉरिडॉरमध्ये, पटांगणांमध्ये, मोठ्या कॉम्प्लेक्सच्या मध्यभागी, देवळांच्या ठिकाणी इ. ठिकाणी, पण गर्दी न जमवता धूपन चिकित्सा करावी. यात वाफारा घेतल्यासारखे त्या धुरासमोर उभे राहून हुंगावे लागत नाही. हा धूर सर्वत्र पसरत असल्याने, श्वासोच्छवास घेताना तो आपोआपच हुंगला जातो. (धूपन केलेल्या सभोवतालच्या परिसरात) पाच-सहा उदबत्त्या लावल्यावर जेवढा धूर तयार होतो, तेवढाच धूर करावा. यापेक्षा अधिक असल्यास, धुराजवळ असलेल्यांना डोळे चुरचुरणे, घसा खवखवणे, खोकला येणे इ. तात्पुरती लक्षणे उत्पन्न होऊ शकतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही धूपन चिकित्सा उपयोगी आहे.
धूपनासाठी वापरली जाणारी औषधी द्रव्ये खालील प्रमाणे हळद, कडुनिंब, वावडिंग, नगर, तमालपत्र, लाख, मोहरी, बिब्बा, वेखंड इत्यादी. यात आंब्यांची पाने व कढीपत्ता, धूप, उद, भीमसेनी कापूर, गुग्गुळ इ. वापरल्यास उत्तम सुगंध दरवळतो. वरील सर्व घटक हे सुकलेले असावे, याचे खरबरीत चूर्ण करुन ठेवावे.
कृती
जुनी परात/घमले (कढई किंवा होम कुंंड यातील जे उपलब्ध आहे, ते घ्यावे. त्यात शेणाच्या गोवर्या पेटवून घालाव्यात व या पेटलेल्या गोवर्यांवर वरील सुकलेले खरबरीत चूर्ण घालावे. अधिक धूर नसावा. गोवर्या जर मिळत नसतील, तर कोळसे जाळून, त्याचे निखारे झाली की, हे खरबरीत धूपन चूर्ण त्यात घालावे. ते ही नसल्यास, नारळाच्या वाळवलेल्या करवंट्या पेटवून, त्या जळू लागल्यावर धूपन द्रव्य घालावे. पण, कागद, वाळलेल्या mosquito mats इ.चा वापर अजिबात करू नये. हा धूर काही वेळेस घशाला व डोळ्यांना चुरचुरतो. असे झाल्यास, त्या धूपन द्रव्यांबरोबर गाईचे तूप एक ते दोन चमचे घालावे.
हल्ली ‘इलेक्ट्रिक धूपन पॉट’ही बाजारात उपलब्ध आहेत. आत गोवर्या, कोळसे/निखारे किंवा करवंट्या न वापरता त्यातील ‘हॉटप्लेट’ गरम झाल्यावर, त्यावर धूपन द्रव्य घालावे. या धूपन द्रव्यांमुळे संपूर्ण परिसर शुद्ध होतो व microbial Load (सूक्ष्मजीव भार) परिसरातील कमी होतो. या धूपनाचे कार्य जीवाणू-विषाणू व बुरशीनाशक तर आहेच, पण त्याचबरोबर अॅन्टिसेप्टिक व अॅन्टिपॅरॅटिक आहे. (इन्फेक्शन होण्यापासून थांबवते व ज्वरघ्नदेखील ठरते.)
आयुर्वेदाप्रमाणे वरील धूपन घटकांबरोबर मनःशिलन, हरताळसारखी खनिजे व काही प्राण्यांच्या विष्ठा, खुर, निखई वापरल्यास कुष्ठहर, कृमीहर व कणुघ्न असेही कार्य घडते. म्हणजे त्वचेच्या विविध रोगांपासून वाचवते. जंतू, कृमीसंसर्ग टाळता येतो व कंड कमी होतो. धूपनचिकित्सा रोज करावी. विशेषतः सकाळी, सायंकाळी करावी. पावसाळ्यात व हिवाळ्यात आवर्जून करावी. धूपनचिकित्सेतील धूर फक्त नाकाद्वारे शरीरात येत नाही. तो मुखाद्वारे शरीरातील व त्वचेवरील रोमरंध्रांमधूनही शरीरात प्रवेश घेऊन आपले कार्य करतो. धूपनचिकित्सा करताना धूपनपात्रापासून थोडे दूर उभे राहावे. त्यातून ठिणगी उडणार नाही, याची खबरदारी घ्यावी. इतरांना त्रास होणार नाही अन्यत्र आग लागणार नाही. लहान मुलांना धक्का लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी. त्याचा चटका लागणार नाही, याची काळजी घ्यावी.
यातील सर्व घटक नैसर्गिक असल्याने धूपनचिकित्सेनंतर धूर संपल्यावर थंड झाल्यावर जी राख उरते, ती राख परिसरातील झाडांवर शिंपडल्यास झाडांच्या बुंध्याशी असणारे रोगकारक जंतूही आटोक्यात ठेवण्यात मदत होईल. धूपनचिकित्सा दिवसातून एकदा-दोनदा करावी, एका वेळेस साधारण दहा मिनिटे केल्यास उत्तम फायदा होतो. असेच कोरोना प्रतिबंधात्मक व ‘पोस्ट कोविड’मध्ये उपयुक्त असलेले साधेसोपे उपाय पुढील लेखांमधून जाणून घेऊयात.
क्रमशः