देशाच्या सुरक्षेसाठी विघटनकारी तंत्रज्ञानाची आवश्यकता

15 May 2021 20:39:23

lekhmala_1  H x


सध्या इस्रायल-पॅलेस्टाईन तणावामुळे पुन्हा एकदा इस्रायलची अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था चर्चेत आहे. पण, केवळ सुरक्षा व्यवस्थाच नाही तर इस्रायलकडून हल्ल्यासाठीही अशाच विघटनकारी तंत्रज्ञानाचा आज आवर्जून वापर केला जातो. तेव्हा, नेमके हे तंत्रज्ञान काय आहे आणि भारतात त्यासंबंधी काय हालचाली सुरु आहेत आणि भविष्यात आपल्याला काय करावे लागेल, याचा आढावा घेणारा हा लेख...


विघटनकारी तंत्रज्ञानाच्या (Disruptive technologies) (डिस्ट्रप्टिव्ह टेक्नोलॉजिस) नवीन क्षेत्राच्या उदयामुळे युद्ध लढण्यात आमूलाग्र बदल झाला आहे. आपण जेव्हा विघटनकारी तंत्रज्ञानाविषयी बोलतो, त्यामधील सर्वात महाभयानक आहे चिनी व्हायरस. चीनने चालवलेले महायुद्ध आपण गेले वर्षभर लढत आहोत. चीनने ‘युनायटेड नेशन्स’च्या सगळ्या संस्था विकत घेतल्यामुळे आणि जगातले बहुतेक देश चीनला घाबरत असल्यामुळे या व्हायरसला अजूनसुद्धा ‘चिनी व्हायरस’ म्हटले जात नाही. मात्र, या ‘चिनी व्हायरस’च्या ‘म्युटेशन’मुळे भारतामध्ये जो नवीन व्हायरस संकरित होत आहे, त्याला मात्र जगाने लगेच नाव दिले, ‘कोरोना व्हायरस इंडियन व्हेरिएंट’. मात्र, वाईट असे की, भारतातले अनेकानेक याला ‘इंडियन व्हेरिएंट’ म्हणत आहेत. जैविक विघटनकारी तंत्रज्ञान हा एक वेगळाच विषय होईल. या लेखामध्ये आपले लक्ष तांत्रिक विघटनकारी तंत्रज्ञानावर केंद्रित असेल. याची काही उदाहरणे.

नौदलातील महागड्या विमानवाहू नौकांना अतिशय कमी किमतीमध्ये असलेले ‘हायपरसॉनिक मिसाईल’ उद्ध्वस्त करू शकते. हवाईदलातील महागड्या ‘फायटर एअर क्राफ्ट’ऐवजी अतिशय कमी किमतीमध्ये असलेले ‘ड्रोन’ जास्त उत्तम काम करू शकतात.विघटनकारी तंत्रज्ञानाच्या परिणामाच्या विविध पैलूंवर उपाययोजना करण्यासाठी महू येथील -आर्मी वॉर कॉलेज, येथे संरक्षण आणि रणनीती चर्चासत्र २०२१चा भाग म्हणून आपल्या ‘लढाई तत्त्वज्ञानावर विघटनकारी तंत्रज्ञानाचा प्रभाव’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. चर्चासत्राच्या पॅनेलिस्ट, लष्करी तज्ज्ञ, तंत्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि या विषयांवरील वक्ते यांनी संबंधित विषयांवर चर्चा करून आणि कल्पना मांडून औपचारिक कागदपत्रे आणि सिद्धान्त विकसित केले आहेत. स्वायत्त वाहने ‘क्लाऊड कम्प्युटिंग’, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय), ‘ऑगमेंटेड रिअलिटी’/ ‘व्हर्च्युअल रिअलिटी’ (एआर/व्हीआर), ‘रोबोटिक्स’, ‘बिग डेटा अनॅलिटिक्स’, ‘सायबर’, ‘स्मॉल सॅटेलाईट’, ‘फाईव्ह-जी’/‘सिक्स-जी’, ‘क्वांटम कम्प्युटिंग’ आणि ‘सायबर वॉरफेअर’ सारख्या विघटनकारी तंत्रज्ञानावर चर्चा झाली. हे चर्चासत्र भारतीय लष्करासाठी राष्ट्रीय महत्त्व असलेल्या सैद्धांतिक आणि सामरिक मुद्द्यांकडे लक्ष वेधणारे होते. लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे त्यांनी युद्ध लढण्यावर आणि युद्धातील विघटनकारी तंत्रज्ञानाच्या परिणाम, आधुनिकीकरण मोहीम, विद्यमान शस्त्रे प्रणाली आणि प्लॅटफॉर्म अद्ययावत करण्यावर, भारतीय सशस्त्र सैन्याला दुहेरी उपयोग (Dual use technology) असलेल्या उपलब्ध विघटनकारी तंत्रज्ञानावर भर दिला, अशा प्रकारचे हे पहिलेच चर्चासत्र होते.

विघटनकारी तंत्रज्ञान


विघटनकारी तंत्रज्ञान, व्यत्यय आणणारे तंत्रज्ञान (Disruptive technologies) म्हणजे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान जे युद्ध करण्याच्या पद्धती पूर्णपणे बदलते. एक व्यत्यय आणणारे तंत्रज्ञान जुन्या प्रक्रियेस, मागे टाकते. अलीकडील व्यत्यय आणणार्‍या तंत्रज्ञानाच्या उदाहरणांमध्ये ‘ई-कॉमर्स’, ऑनलाईन बातम्या साईट्स, राईड-सामायीकरण/शेअरिंग अ‍ॅप्स (ओला, उबर) ‘जीपीएस सिस्टीम’, ‘ब्लॉकचेन’, समाविष्ट आहेत.या लेखात आपण सैन्याकरिता महत्त्वाच्या तंत्रज्ञानाकडे लक्ष देऊ जे विघटनकारी प्रभाव टाकत आहेत.विघटनकारी तंत्रज्ञानाचे अनेक चांगले फायदे आहेत. मात्र, चीनसारखे देश या तंत्रज्ञानाचा वापर दुष्कृत्ये करण्यासाठी आणि लढाई करण्यासाठी करतात. चीन या तंत्रज्ञानाचा कसा गैरवापर करत आहे, हा एक वेगळाच विषय होईल. या लेखामध्ये आपण आपले लक्ष विघटनकारी तंत्रज्ञानाचा वापर करून देशाला अजून कसे जास्त सुरक्षित करता येईल, यावर केंद्रित करू.
भारतामध्ये विघटनकारी तंत्रज्ञान या विषयाचे विश्लेषण करण्याकरिता, आपल्याला आधीच्या काळामध्ये काय झाले, सध्या काय परिस्थिती आहे आणि येणार्‍या काळामध्ये काय होऊ शकते, याचे विश्लेषण करावे लागेल.

विघटनकारी तंत्रज्ञानामध्ये चीन दुसर्‍या स्थानावर

आपल्याला जर विघटनकारी तंत्रज्ञानामध्ये प्रगती करून चीनच्या तोडीला पोहोचायचे असेल, तर अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करावी लागेल. विघटनकारी तंत्रज्ञानामध्ये जगातील प्रगत राष्ट्रे म्हणजे अमेरिका, इस्रायल आणि युरोपच्या काही देशांनी अतिशय वेगाने प्रगती केलेली आहे. भारताचा नंबर एक शत्रू चीनसुद्धा गेल्या काही वर्षांपासून यामध्ये वेगाने प्रगती करत आहे आणि आता जगामध्ये या तंत्रज्ञानामध्ये त्यांना नंबर दोनचे स्थान आहे.

गेल्या तीन दशकांमध्ये भारताने नेमके काय केले?

या क्षेत्रामध्ये भारताची कामगिरी अतिशय निराशाजनक आहे. ज्या थोड्या संघटना या विषयावरती काम करत आहेत, त्यांचा काम करण्याचा वेग हा बैलगाडीचा आहे.गेल्या ३० वर्षांमध्ये अनेक सरकारी अहवाल तयार करण्यात आले. २००१चा ‘ग्रुप ऑफ मिनिस्टर रिपोर्ट’, २००५ मध्ये ‘केळकर समिती रिपोर्ट’, २००७ मध्ये ‘सिसोदिया कमिटी रिपोर्ट’, २००८मध्ये ‘रामाराव कमिटी रिपोर्ट’, या सगळ्यांनी अनेक अनेक सूचना केल्या. परंतु, त्यावर फारशी अंमलबजावणी झाली नाही.


सध्याची परिस्थिती


‘नीति आयोगा’खाली या विषयावर जास्त वेगाने काम करण्याकरिता अनेक योजना तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये चार तंत्रज्ञानावर खास लक्ष देण्यात आलेले आहे. पहिले तंत्रज्ञान आहे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आणि ‘रोबोटिक्स.’ दुसरे तंत्रज्ञान ‘हायपर सॉनिक शस्त्रे’. तिसरे तंत्रज्ञान आहे ‘क्वांटम टेक्नोलॉजी.’यामध्ये भारतीय सैन्य, जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्था जशा ‘आयआयटी’, संशोधन करणारे शास्त्रज्ञ यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि याला आता मिशन मोडने पुढे नेण्यात येत आहे.यावर अंमलबजावणी चांगली झाली तर येणार्‍या काळामध्ये नेमका काय परिणाम होऊ शकतो? याआधी आपण बैलगाडीच्या वेगाने पुढे जात होतो आणि जग ‘रॉकेट टेक्नोलॉजी’चा वापर करून आपल्या अनेक दशके पुढे गेले होते. परंतु, आपण जर आपल्याकडे असलेल्या क्षमतेचा चांगला वापर केला तर याआधी आपल्याला आलेले अपयश भरून काढण्यामध्ये आपल्याला नक्कीच एक मोठी संधी मिळेल.


काय केले जात आहे?


सायबर तंत्रज्ञानामध्ये शत्रूवर आक्रमक कारवाई करण्याकरिता तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’चा वापर करून ‘सर्व्हेलन्स’ म्हणजे शत्रूवर २४ तास जमिनीच्या वरती, आकाशात लक्ष ठेवणे शक्य होईल. त्यांची कुठल्याही सैनिकी हालचालीचे विश्लेषण करून देशाला किती धोका निर्माण होतो आहे, हे शोधता येईल. ‘अ‍ॅण्टिसॅटेलाईट’ शस्त्रे तयार केली जातील. ‘फाईव्ह-जी’ तंत्रज्ञानाचा वापर करून आपण कुठल्याही देशाला तोडीस तोड असे उत्तर देऊ शकू. ‘इलेक्ट्रॉनिक वॉर फेअर’मध्ये शत्रूच्या तंत्रज्ञानावर प्रतिहल्ले करण्याची क्षमता निर्माण होईल. ‘ऑटोनोमोस व्हेईकल्स’ म्हणजे ‘ड्रोन्स’चा वापर करून ‘स्वार्म ड्रोन्स’द्वारे म्हणजे ७५ ते १०० ‘ड्रोन्स’ने एकाच वेळेला शत्रूवर हल्ला करण्याची क्षमता प्राप्त होईल. ‘क्वांटम टेक्नोलॉजी’चा वापर करून शत्रूला आपल्या ‘फायर वॉल’च्या (रक्षाक्तमक भिंत) आत प्रवेश करणे अतिशय कठीण होईल. प्रत्यक्ष ‘एनर्जी वेपन’ विकसित करून आपण चीनला चेतावणी देऊ शकतो की, तुम्ही जर अशा तंत्रज्ञानाचा वापर केला तर त्यामध्ये त्याला प्रत्युत्तर देण्याची आमचीही क्षमता आहे.

संरक्षणक्षेत्रात स्वावलंबन साधण्याकरिता लक्षणीय सुधारणा

पुढील काही वर्षांत प्राधान्य देऊन अनेक परिवर्तनकारी सुधारणा लागू केल्यास, संरक्षणक्षेत्रात स्वावलंबन साधण्याकरिता लक्षणीय सुधारणा होऊ शकते.‘नीति आयोगा’ने तयार केलेल्या एका अहवालाप्रमाणे या विषयात जर आपल्याला वेगाने प्रगती करायची असेल, तर अनेक बाबींकडे, अनेक पैलूंकडे लक्ष ठेवावे लागेल, यामध्ये देशाचा ‘इनोव्हेटिव्ह इंडेक्स’ हा वाढवावा लागेल. देशाचा ‘आरडी इंडेक्स’ वाढवावा लागेल आणि नवीन तंत्रज्ञान प्रयोगशाळेतून सैन्यात येण्याचा वेग वाढवावा लागेल. कारण, अनेक वेळा तंत्रज्ञान हे प्रयोगशाळेमध्ये विकसित केले जाते. मात्र, लढणार्‍या सैनिकांकडे पोहोचण्याकरिता प्रचंड वेळ लागतो. अर्थात, हे सगळे तेव्हाच शक्य होईल, ज्या वेळेला या सगळ्या कार्यक्रमांना लागणारे बजेट बिना अडथळा पुरवले जाईल, शास्त्रज्ञ एका टीमप्रमाणे काम करून लवकरात लवकर असे तंत्रज्ञान विकसित करतील. सेनादल, शास्त्रज्ञ उच्चशिक्षण संस्था यांचा मिलाप वाढून वेगवेगळ्या विघटनकारी तंत्रज्ञानामध्ये अजून जास्त वेगाने प्रगती करता येईल, तरच पुढच्या तीन ते चार वर्षांमध्ये आपण चीनबरोबर कुठल्याही प्रकारची म्हणजे ‘हायब्रिड’ लढाई किंवा ‘मल्टिडोमेन’ लढाई लढण्यासाठी तयार होऊ.
Powered By Sangraha 9.0