कुशल धनुर्धारी दीपिका

14 May 2021 20:22:09

mansa_1  H x W:


नुकतेच भारताच्या दीपिका कुमारीने तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकत ‘ऑलिम्पिक’साठी आपली दावेदारी सिद्ध केली. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या जीवनप्रवासाबद्दल...


आपला देश हा विविधतेने नटलेला देश म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. अशामध्ये भारतीय संस्कृतीपासून भारतीय खेळांपर्यंत सर्व बाबतीत भारतीयांची चर्चा जागतिक पातळीवर होते. कोरोनाचे तांडव कमी झाल्यानंतर जगभरात अनेक क्रीडा स्पर्धांना काहीशी सुरुवातही झाली. पण, आता पुन्हा क्रीडा स्पर्धांना मोठा ब्रेक लागला आहे. तरीही ‘ऑलिम्पिक’मध्ये आपल्या देशाला सुवर्ण पदक मिळवून देणे आणि जागतिक पटलावर आपल्या देशाचा झेंडा फडकवणे, हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. अर्थात, कोरोनाच्या अडथळ्यात ही स्वप्न पाहणार्‍यांना आणखी काहीकाळ वाट पाहावी लागणार आहे. मात्र, तरीही भारतातील अनेक खेळाडूंनी आपल्या कामगिरीच्या जोरावर टोकियो येथे होणार्‍या ‘ऑलिम्पिक’मध्ये प्रवेश मिळवला आहे. यामध्ये नुकतेच एका धनुर्धारी जोडप्याचे ‘ऑलिम्पिक’मध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न साकार झाले आहे. गेल्याच वर्षी म्हणजे ३० जून, २०२०मध्ये विवाहबद्ध झालेल्या दीपिका कुमारी आणि अतनू दास या जोडगोळीने ‘तिरंदाजी विश्वचषक’ स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकत ‘ऑलिम्पिक’चे तिकीट मिळवले आहे. दीपिका कुमारी ही सध्या जागतिक तिरंदाजी क्रमवारीत नवव्या स्थानावर आहे. अशा या एका रिक्षाचालकाच्या मुलीचा इथपर्यंतचा प्रवास हा प्रेरणादायी आहे. थोडक्यात जाणून घेऊया तिच्या प्रवासाबद्दल...

दीपिका कुमारीचा जन्म हा झारखंडमधील रांची येथे १३ जून, १९९४ रोजी एका गरीब कुटुंबात झाला. तिचे वडील शिवनारायण महतो हे रिक्षाचालक. त्याआधी ते रोजंदारीवर काम करत होते, तर तिची आई गीता महतो या रांची वैद्यकीय महाविद्यालयात एक परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. तिचे गाव हे रांचीपासून १५ किमी दूर. दीपिका ही लहानपणापासूनच नेमबाजीत तशी तरबेज. बालपणी तिला दगड मारून आंबे तोडायची आवड होती. याच वेळी तिला तिरंदाजीचे एक खेळणे मिळाले आणि तिला या खेळामध्ये एक विशेष आवड निर्माण झाली. जसजशी तिने या खेळाबद्दल माहिती मिळवली, तसा या खेळामधील तिचा रस आणखीनच वाढू लागला. तिरंदाजीमध्ये नाव कमावण्याचे ती स्वप्न पाहू लागली होती. परंतु, घरची बिकट परिस्थिती पाहता तिच्या वडिलांनी सुरुवातीला या खेळामध्ये करिअर घडवण्यासाठी नकार दिला. तिरंदाजीसाठी नवीन साधने घेण्याइतपतही त्यांच्याकडे पैसे नव्हते.

मात्र, दीपिकाने बांबूपासून घरच्या घरी धनुष्य आणि बाण बनवून सराव केला. तिची ही जिद्द आणि या खेळाप्रति एकाग्रता पाहता तिच्या वडिलांना अखेर मान्य करावे लागले. दीपिकाची चुलत बहीण विद्या कुमारी हिने तिच्यातील तिरंदाजी कौशल्य ओळखले आणि तिला मदत केली. विद्या ही ‘टाटा आर्चरी अ‍ॅकॅडमी’मध्ये तिरंदाजीचे शिक्षण घेत होती. अकादमी आणि विद्याच्या मार्गदर्शनामुळे दीपिकाला खेळाबद्दलचे मूलभूत ज्ञान मिळाले. २००५ मध्ये ‘अर्जुन आर्चरी अ‍ॅकॅडमी’मध्ये प्रवेश केल्यानंतर तिला राष्ट्रीय पातळीवर पहिली संधी मिळाली. पण, तिरंदाजीमध्ये तिचा खरा प्रवास हा २००६ मध्ये जमशेदपूरच्या ‘टाटा आर्चरी अ‍ॅकॅडमी’मध्ये सुरू झाला. येथून तिला योग्य उपकरणे तसेच गणवेश मिळाला आणि तिचे कठोर प्रशिक्षण सुरू झाले. तसेच तिला ५०० रुपये स्टायपेंड म्हणून देण्यात येत होते. याचवर्षी मेक्सिको येथे झालेला तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत तिने ‘ज्युनिअर कम्पाऊंड’ स्पर्धा जिंकत, अशी कामगिरी करणारी दुसरी भारतीय महिला म्हणून विक्रम आपल्या नावे केला.

अकादमीमध्ये आपली प्रतिभा निखारल्यानंतर तिने २००९ मध्ये ‘कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिप चषक’ आपल्या नावावर केला. याचवर्षी अमेरिकेमध्ये झालेल्या ‘ओगडेन यूथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिप’मध्येही विजय मिळवला. तिच्या कारकिर्दीत सर्वात मोठे यश हे २०१० या वर्षी मिळाले. यावर्षी झालेल्या ‘दिल्ली कॉमनवेल्थ गेम्स’मध्ये तिने ‘वैयक्तिक रिकर्व्ह’ आणि ‘महिला रिकर्व्ह टीम इव्हेंट’मध्ये दोन सुवर्णपदके जिंकली. त्यानंतर दोन महिन्यांनी ग्वांग्झू येथे झालेल्या ‘आशियाई स्पर्धा २०१०’मध्ये कांस्यपदक जिंकत जगभरात आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडले. यानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही. २०१२ मध्ये तुर्कीमधील अंटाल्य येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत दीपिकाने पदार्पण केले. यावेळी तिने वैयक्तिक, संघ आणि मिश्र या तिन्ही प्रकारांत रौप्यपदक पटकावले. यानंतर तिच्या कामगिरीचा आलेख हा चढताच राहिला. दीपिकाला २०१२ मध्ये ‘अर्जुन पुरस्कार’ देण्यात आला, तर २०१६मध्ये ‘पद्मश्री’ देऊन तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. गेल्या वर्षी ३० जून, २०२० मध्ये अतनू दास या तिरंदाज खेळाडूशीच तिने लग्नगाठ बांधली. एकेकाळी गरीब परिस्थिती कुटुंबावर असताना स्वतःच्या जिद्दीने आणि कौशल्याने आता करोडो रुपयांची संपत्ती उभी केली आहे. तिच्या घरी चषक आणि पदकांचा अगणित साठा आहे. अनेक युवा खेळाडू तिला आपला आदर्श मानतात. अशा या कुशल धनुर्धारीला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...

Powered By Sangraha 9.0