कॉर्पोरेट चाणक्य : डॉ. राधाकृष्णन पिल्लई

08 Apr 2021 22:47:31

Radhakrushn Pillai_1 
 
 
 
चाणक्याला आजच्या काळाशी सुसंगत ठेऊन त्यांनी तब्बल १७ पुस्तकांचीदेखील रचना केली. एक प्रेरक वक्ता, व्यवस्थापनतज्ज्ञ, ‘कॉर्पोरेट चाणक्य’सारख्या गाजलेल्या पुस्तकांचे लेखक आणि ‘चाणक्य आन्विक्षिकी प्रा. लि.’ या संस्थेचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्णन पिल्लई हे असे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहेत.
 
 
 
चंद्रगुप्त मौर्याला सम्राट बनविणारा त्याचा गुरु म्हणजे आर्य चाणक्य. मूळचा शिक्षक असणाऱ्या या तत्त्वज्ञाने आपल्या चाणक्यनीतीने अक्षरश: जगाला वेड लावले. त्याच्या चाणक्यनीतीमुळे तत्कालीन भारतवर्षातील साम्राज्य अराजकतेपासून वाचवलं. या चाणक्याने पुढे जाऊन राजाला राज्यकारभार करण्यायोग्य असा आदर्शवत ग्रंथ लिहिला, ‘कौटिल्याचे अर्थशास्त्र’ म्हणून तो जगद्विख्यात आहे. चाणक्याचा हा ग्रंथ आजच्या काळातसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. या ग्रंथाला प्रमाणभूत मानत त्यांनी आपल्या कंपनीची स्थापना केली. कॉर्पोरेट्स आणि लघु-मध्यम उद्योग यांना ते अर्थशास्त्राचं आधुनिक पद्धतीने प्रशिक्षण देऊ लागले. एवढंच नव्हे, तर चाणक्याला आजच्या काळाशी सुसंगत ठेऊन त्यांनी तब्बल १७ पुस्तकांचीदेखील रचना केली. एक प्रेरक वक्ता, व्यवस्थापनतज्ज्ञ, ‘कॉर्पोरेट चाणक्य’सारख्या गाजलेल्या पुस्तकांचे लेखक आणि ‘चाणक्य आन्विक्षिकी प्रा. लि.’ या संस्थेचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्णन पिल्लई हे असे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहेत.
 
 
 
 
सी. के. के. पिल्लई आणि सुशीला पिल्लई हे दाम्पत्य ५१ वर्षांपूर्वी केरळहून मुंबईला आले. मुंबईच्या उपनगरात मुलुंडला स्थायिक झाले. तेव्हापासून इथल्याच मातीत रुळले ते कायमचे. सी. के. के. पिल्लई हे मेकॅनिकल इंजिनिअर. एका इंजिनिअरिंग कंपनीत कामाला होते. सुशीला या एका कापड गिरणीवजा कंपनीत वीणकाम विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. राधाकृष्णन हा त्यांचा एकुलता एक मुलगा. दाक्षिणात्य मंडळींचा शिक्षणावर मोठा भर असतो. त्यालाच अनुसरून राधाकृष्णन शिकत राहिले. मुलुंडच्या वाणी विद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी खालसा महाविद्यालयातून ‘समाजशास्त्र’ विषय घेऊन बी.ए पूर्ण केले. त्यानंतर ‘वेलिंगकर इन्स्टिट्यूट’मधून ‘इंडस्ट्रियल मॅनेजमेंट’ विषयात ‘एमबीए’ पदवी प्राप्त केली. रामटेक येथील ‘कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठा’अंतर्गत सोमय्या महाविद्यालयातून ‘एम.ए’ ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
 
 
 
याचदरम्यान केरळच्या ‘चिन्मय मिशन’मधून त्यांनी कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता. चाणक्याविषयी एक गूढ होतंच, पण आत्मियतादेखील होती. त्यामुळे हाच विषय घेऊन राधाकृष्णन यांनी मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागातून पीएच.डीमिळवली. सध्या संस्कृत विषय घेऊन ते मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागातून ‘डि.लिट’ करत आहेत. अशाप्रकारे शिक्षण सुरू असतानाच राधाकृष्णन कामसुद्धा करत होते. ‘पॅक्सपर्ट सर्व्हिसेस’ या कंपनीत त्यांनी १९९३ साली पहिली नोकरी केली ती विक्री विभागात, पगार होता फक्त ८०० रुपये. अशाप्रकारे आणखी तीन-चार ठिकाणी त्यांनी नोकऱ्या केल्या. खरंतर उद्योजक होण्याचे त्यांनी मनाशी पक्क केलं होतं. एकविसाव्या शतकाची त्यांनी सुरुवात केली ती उद्योजकतेने. ‘आत्मदर्शन स्पिरिच्युअल टुरिझम’ नावाने त्यांनी आध्यात्मिक पर्यटनास सुरुवात केली. अष्टविनायक, १२ ज्योतिर्लिंग या महाराष्ट्रातील तीर्थस्थळांसह केदारनाथ, अमरनाथ या यात्रादेखील ‘आत्मदर्शन’ घडवू लागले. निव्वळ भारतातीलच नव्हे, तर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूरसारख्या विविध २२ देशांतील पर्यटकांनादेखील त्यांनी भारतातील तीर्थस्थळांच्या भेटी घडवल्या. अवघ्या दहा हजार रुपयांत सुरु झालेली ‘आत्मदर्शन’ आज २२ देशांमध्ये पोहोचली तीदेखील अवघ्या २१ वर्षांत हे विशेष!
 
 
 
२००२ मध्ये सुरेखा या सुविद्य तरुणीसोबत राधाकृष्णन यांचा विवाह झाला. ‘फायनान्स’ या विषयात एमबीए केलेल्या सुरेखा पिल्लई या सध्या ‘पर्यटन’ विषयात ‘पीएच.डी’ करत आहेत. या दाम्पत्यास आन्विक्षिकी आणि अर्जुन अशी दोन अपत्ये आहेत. ‘आत्मदर्शन’चा कारभार सध्या सुरेखा पिल्लई पाहतात. ‘कौटिल्याचे अर्थशास्त्र’ या विषयावर ‘पीएच.डी’ करताना चाणक्य हा आजच्या काळातदेखील तितकाच प्रभावी असल्याचे राधाकृष्णन यांना जाणवले. चाणक्य म्हटले की, ‘इसवी सन पूर्व’ अशा पठडीबद्ध नजरेतूनच पाहिलं जातं. इतिहासाचं एक पान म्हणजे चाणक्य या समजुतीमुळेदेखील चाणक्याकडे पाहण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोन वेगळा होता. चाणक्याचं तत्त्वज्ञान कोणीही आचरणात आणलं तर तो स्वत:च्या आयुष्याचं सोनं करू शकतो, हे राधाकृष्णन यांना उमजले. हा चाणक्य आजच्या काळाशी सुसंगत असा लोकांपर्यंत नेण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यातून आकारास आले ‘कॉर्पोरेट चाणक्य’ हे पुस्तक. राधाकृष्णन यांच्या या पहिल्याच पुस्तकाने लोकप्रियतेचे आणि सर्वाधिक खपाचे सगळे विक्रम मोडीत काढले. अनेक भारतीय भाषांमध्ये त्याचे भाषांतर झाले. डॉ. राधाकृष्णन पिल्लई हे नाव लोकप्रिय लेखकांच्या यादीत झळकू लागले. यानंतर पिल्लई यांनी ‘चाणक्य नीती’, ‘चाणक्य इन यू’, ‘चाणक्य इन डेली लाईफ’, ‘इनसाईड चाणक्याज् माईंड: आन्विक्षिकी अ‍ॅण्ड दी आर्ट ऑफ थिंकिंग’, ‘चाणक्याज् ७ सिक्रेट्स ऑफ लीडरशिप’ अशी तब्बल १७ पुस्तके लिहिली.
 
 
 
२०१६ मध्ये त्यांनी ‘चाणक्य आन्विक्षिकी प्रायव्हेट लिमिटेड’ नावाची कंपनी स्थापन केली. कंपन्यांचे व्यवस्थापन आणि नेतृत्व या विषयांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन ही कंपनी करते. संपूर्णत: कौटिल्याच्या अर्थशास्त्रावर आधारलेली कौशल्ये ही कंपनी कॉर्पोरेट्स आणि लघु-मध्यम उद्योजकांना शिकवते. ’टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस’, ‘आदित्य बिर्ला ग्रुप’, ‘इंडियन ऑईल’, ‘महिन्द्रा उद्योग समूह’, ‘भारतीय भूदल’ अशा अनेक मान्यवर संस्थांना त्यांनी आतापर्यंत मार्गदर्शन केलेले आहे. सध्या या कंपनीत दहा कर्मचारी कार्यरत आहेत. डॉ. राधाकृष्णन पिल्लई यांची आज नेतृत्व विषयावर बोलणारा वक्ता, लेखक, प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून स्वतंत्र ओळख आहे. त्यांचे आतापर्यंत २०० पेक्षा अधिक लेख विविध मासिके, वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेले आहेत. अथेन्स, ग्रीस येथील ‘वर्ल्ड फिलॉसॉफी काँग्रेस’, टेक्सास, अमेरिकामधील ‘अ‍ॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट’, ‘इंडियन फिलॉसॉफी काँग्रेस’ अशा परिषदांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. त्याचप्रमाणे जर्मनी, दुबई, मस्कत, सिंगापूर, इंडोनेशिया, ब्रिटन या ठिकाणी चाणक्याच्या अर्थशास्त्राचे धडेदेखील दिले आहे. आतापर्यंत त्यांनी एक हजारांपेक्षा जास्त व्याख्याने ‘नेतृत्व’ या विषयावर दिली आहेत. त्यांनी शैक्षणिक आणि साहित्य या विषयांमध्ये दिलेल्या अमूल्य योगदानासाठी २०१८ साली ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ‘ग्लोबल इनोव्हेंचर अ‍ॅवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. ‘सरदार वल्लभभाई पटेल फाऊंडेशन, नवी दिल्ली’ यांच्यातर्फे २००९ मध्ये ‘सरदार पटेल अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. २०१६ वर्षी ‘चाणक्य इन यू’ या पुस्तकासाठी मानाचा समजला जाणारा ‘क्रॉसवर्ड रेमण्ड बुक ऑफ दी इयर’ हा सन्मान मिळाला.
 
 
 
आपले गुरु डॉ. गंगाधरन नायर आणि आईवडिलांना ते आपल्या यशाचे श्रेय देतात. त्यांच्यावर आपल्या आईचा विशेष प्रभाव आहे. आपल्या संस्थेसाठी जागा विकत घेण्याची ज्यावेळेस वेळ आली, त्यावेळेस सुरुवातीची रक्कम त्यांनी आईच्या हस्ते विकासकास दिली होती. आईचा आशीर्वाद हा कोणतेही काम परिपूर्ण करण्यास सक्षम असतो, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.
आतापर्यंत त्यांनी हजारो उद्योजकांना प्रशिक्षित केले आहे. त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावे, यासाठी प्रयत्न केले आहेत. भविष्यातदेखील उद्योगविश्वात नेतृत्व तयार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. “उद्योजकाने फक्त मोठा विचार करू नये तर सर्वांत मोठ्ठा विचार करावा. त्याने संपत्ती नक्कीच कमवावी, पण स्वत:सारखे उद्योगातील नेतृत्वदेखील तयार करावेत,” असे डॉ. पिल्लई म्हणतात. डॉ. राधाकृष्णन पिल्लई हे खऱ्या अर्थाने ‘कॉर्पोरेट चाणक्य’ आहेत.
Powered By Sangraha 9.0