अमेरिकेत सध्या कोरोनाविषयक काहीसे दिलासादायक चित्र दिसून येते. एकूणच कोरोना संक्रमितांच्या मृत्युदरातही कमतरता नोंदवली गेली. कोरोना संक्रमितांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही घटले आहे. मृत्युदरही घटतोय. या परिस्थितीचे विश्लेषण करत असताना लसीकरणच प्रभावी ठरल्याचा अंदाज जाणकार व्यक्त करतात. पण, तरीही भारताप्रमाणेच अमेरिकेतही कोरोना आता नव्याने डोके वर काढतो की काय, अशी भीतीही तेथील डॉक्टरांना सतावत आहे. त्याचे कारण म्हणजे कोरोना विषाणूत वेगाने होणारे बदल. विषाणूतील या बदलांमुळे कोरोना संक्रमण हे अधिक घातक ठरू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये नव्या कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क आणि ओरेगॉनमध्येही नवे कोरोना विषाणूचे रुग्ण आढळत आहेत. सध्यातरी अमेरिकेत मान्यता असलेल्या लसी यावर प्रभावी ठरत आहेत. मात्र, ज्या वेगाने हा नवा कोरोना विषाणू बदलत आहे, त्यामुळे लसीचा प्रभाव कमी पडेल की काय, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत राहिला तर ‘बुस्टर डोस’ किंवा नवी लस द्यावी लागण्याची शक्यताही तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
एडनबर्ग विद्यापीठ, स्कॉटलँडच्या एका प्राध्यापकांनी वृत्तसंस्थांना दिलेल्या माहितीत याबद्दल अधिक स्पष्ट केले आहे. कोरोना विषाणू ज्या प्रकारे बदलतोय, त्याला थोपवण्यासाठी आता कस लागू शकतो. ब्रिटन आणि युरोपात संक्रमण पसरवणाऱ्या नव्या विषाणूच्या ‘बी.१.१.७’ याचा वेगही जास्त पसरत आहे. फ्लोरिडा आणि मिशिगनसहित कोरोना चाचणीत १२ हजार ५०० रुग्णांचा तपास लागला. या भागात कोरोना विषाणू दर घटत असताना नव्याने कोरोना विस्तार होत नसल्याचे चित्र आहे. ‘लंडन हायजीन’, ‘ट्रॉपिकल मेडिसिन स्कूल’चे संक्रमण विषयाचे प्राध्यापक सबॅस्टियन फंक यांच्या मते, ‘बी.१.१.७’ आणि अन्य कोरोना विषाणूमुळे कोरोना नवी महामारी पसरू शकते का, याचेही संशोधन सुरू आहे. ब्रिटन आणि अमेरिकेत आढळलेला नवा विषाणू पसरण्याची गती मंद आहे. कोरोना विषाणूचा नवा ‘स्ट्रेन’ हा लसीतील घटकांनाही प्रभावशाली ठरत असतो. अर्थात, या लढाईत कोरोना लसच जिंकेल, असा संशोधकांना विश्वास आहे. नव्या ‘स्ट्रेन’मुळे जर रुग्ण अधिक गंभीर झाला किंवा त्याच्या रोगप्रतिकार क्षमतेवर त्याचा परिणाम निर्माण झाला, तर ही बाब चिंताजनक आहे. ‘बी १.१.७’ या नव्या कोरोनाचा ‘स्ट्रेन’ हा इतर कुठल्याही विषाणूच्या बदल्यात ६० टक्के अधिक गतीने पसरतो आहे आणि ६७ टक्के अधिक घातक ठरेल, असेही म्हटले जाते. पण, सध्यातरी त्याचा फैलाव हा कुठल्याही देशात मोठ्या प्रमाणावर झालेला आढळला नाही, हे दिलासादायक आहे.
संशोधक ‘ई-४८४’ नावात झालेल्या बदलांमुळे चिंतित आहेत. नव्या विषाणू संक्रमिताला इतर कोरोना रुग्णांच्या तुलनेत बरे होण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो. ऑक्सफोर्ड विद्यापीठातील तज्ज्ञांच्या मते, नव्या कोरोना संक्रमितांमध्ये विषाणूचा प्रभाव दीर्घकाळ राहू शकतो. रुग्णाचा विलगीकरणाचा काळ वाढला जाऊ शकतो. ब्रिटनमध्ये ‘बी.१.१.७’ हा इतका संक्रमित आहे की, कडक ‘लॉकडाऊन’ पाळून, तसेच कोरोना लसीकरण पूर्ण झाल्यानंतरही कोरोनाची आकडेवारी कमी होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला होता. ‘बी.१.१.७’ ही कोरोनाची लाट कित्येक महिने आकार घेत होती. परंतु, त्या काळात केलेल्या प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने प्रसाराची गती वाढली. त्यामुळे नव्या विषाणूबद्दल केलेल्या दुर्लक्षाचे परिणाम युरोपला भोगावे लागत आहेत. कोरोना मृत्यूचा दर हा युरोपात गतवर्षी इतकाच आहे. अर्थात, जगात सगळे इतके भयाण होऊन बसेल का? तर याचे उत्तर ‘नाही’ असेच असेल. जर वेळीच नव्या कोरोना विषाणूचा शोध घेत त्यावर उपाययोजना केल्या, तर त्याला चाप लावता येऊ शकतो. चांगली बातमी अशी की, दक्षिण आफ्रिकेतील संशोधकांनी ‘बी.१३५१’ या विषाणू विरोधातही एक लस तयार केली आहे. ही लस अन्य सर्व कोरोना ‘स्ट्रेन’वर प्रभावशाली ठरू शकते. ‘फाईजर’, ‘बायोएनटेक’च्या लसीही नव्या कोरोनाचे संक्रमण थांबवू शकतील, असा दावा या कंपन्याही करत आहेत. लसीकरण आणि कोरोना उपचार या सगळ्यात ‘दो गज दूरी’ आणि मास्क, ही शस्त्रेही टाकून चालणार नाही, हेही तितकेच खरे. जुन्या-नव्या विषाणूच्या या लढाईत कोरोना लसीकरण, ‘कोविड’ योद्धे आणि मानवता जिंकेल हीच अपेक्षा...!