खेला होबे की विकास होबे?

05 Apr 2021 19:58:01

Modi Mamta_1  H
 
 
 
तृणमूल काँग्रेसने निवडणुकीत ‘खेला होबे’ अर्थात ‘खेळ सुरू आहे’ अशी प्रचारबाजी केली. पण, आता बंगालमधील दोन टप्प्यांतील मतदानानंतरच तृणमूल काँग्रेसचाच खेळ झाला असून, भाजपचे विकासकमळ फुलण्याचीच दाट शक्यता आहे. त्यामुळे दीदींचा आक्रस्ताळेपणा वाढला असून आता ‘खेला होबे की विकास होबे’ हे २ मे रोजीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.
चार राज्ये आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी ६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यातील आसाम आणि प. बंगाल या राज्यांमध्ये आज मतदानाचा तिसरा टप्पा पार पडत आहे, तर केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्ये आज एकाच टप्प्यात मतदान संपन्न होत आहे. आजच्या मतदानानंतर केवळ प. बंगालमध्ये मतदानाचे उर्वरित पाच टप्पे बाकी राहणार आहेत. सर्व ठिकाणची मतमोजणी येत्या २ मे रोजी होणार असल्याने, मतदारांनी कोणत्या राज्यामध्ये कोणत्या पक्षास कौल दिला आहे, हे पाहण्यासाठी सर्वांना तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. प. बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने संपूर्ण राज्यामध्ये जो जोरदार प्रचार चालविला आहे, त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यातून त्या आता भाजप, पंतप्रधान मोदी, निवडणूक आयोग यांच्यावर खोटेनाटे आरोप करून जनमत आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पाय दुखावला असतानाही व्हीलचेअरवरून प्रचार करून मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत. पण, ममता बॅनर्जी यांच्या गेल्या दहा वर्षांच्या राजवटीला कंटाळलेले तृणमूल काँग्रेसचे त्यांचे अनेक सहकारी पक्षत्याग करून भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे हातातील सत्ता टिकविण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याचे दिसत आहे.
 
 
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदिग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. त्या मतदारसंघामध्ये त्यांच्याविरुद्ध त्यांचे एकेकाळचे सहकारी आणि आता भाजपमध्ये प्रवेश केलेले सुवेंदू अधिकारी उभे आहेत. नंदिग्राम मतदारसंघात गेल्या १ एप्रिल रोजी मतदान झाले. नंदिग्राममध्ये मतदानाच्या वेळी गैरप्रकार झाल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगास पत्र लिहून केला. नंदिग्राम मतदारसंघातील बोयल मकताब प्राथमिक शाळेतील मतदान केंद्र क्रमांक सातमध्ये मतदानाच्या वेळी गैरप्रकार झाल्याचे ममतादीदी यांनी आपल्या हस्ताक्षरात पत्र लिहून आयोगास कळविले. त्या केंद्रावर ममता बॅनर्जी या जवळ जवळ तीन तास मुक्काम ठोकून होत्या. बाहेरचे लोक आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान, तेथील मतदान प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी आयोगास लिहिलेल्या पत्रामध्ये केला होता. मात्र, निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आणि काहीही गैरप्रकार झाले नसल्याचे स्पष्टीकरण आयोगाने केले. ममता बॅनर्जी यांनी जे आरोप केले त्यासंदर्भात सर्व वस्तुस्थिती जाणून घेतली असता, त्यांचे आरोप पूर्णपणे तथ्यहीन असल्याचे आढळून आल्याचे आयोगाने ममता बॅनर्जी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे. ममता बॅनर्जी यांना पराभव दिसू लागल्याने त्या अशा प्रकारचा आक्रस्ताळेपणा करून मतदानाच्या उर्वरित टप्प्यांसाठी मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे अशा घटनांवरून दिसून येत आहे.
 
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला विविध मतदार केंद्रांवर पोलिंग एजंट मिळत नसल्याचेही दिसून येत आहे. रविवारी एका प्रचारसभेमध्ये बोलताना, भाजपच्या धमक्यांमुळे पुरुष ‘पोलिंग एजंट’ मिळत नसतील, तर महिला ‘पोलिंग एजंट’ना अशा मतदान केंद्रांवर नेमण्यात यावे, असे आवाहन त्यांनी आपल्या पक्षनेत्यांना केले आहे. असे आवाहन करण्याशी एक कारण आहे. गेल्या १ एप्रिल रोजी नंदिग्राममध्ये मतदान झाले, तेव्हा तेथील २८ मतदान केंद्रांवर त्यांच्या पक्षाला कोणी ‘पोलिंग एजंट’ही मिळाले नव्हते. त्यातूनच ममता बॅनर्जी यांनी मतदान केंद्रे सोडून निघून जाणार्‍या ‘भ्याड’ ‘पोलिंग एजंट’च्या जागी महिला ‘पोलिंग एजंट’ना नेमण्याचे आवाहन पक्षाला केले. ममता बॅनर्जी यांच्या या सूचनेचे तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी स्वागत केले असले, तरी या कामामध्ये पारंगत असलेल्या महिला ‘पोलिंग एजंट’ आणायच्या कोठून, अशी खंतही या नेत्यांनी बोलून दाखविली आहे.
 
ममता बॅनर्जी यांनी आपल्या राज्यात केंद्र सरकारच्या काही योजना राबविण्यास नकार दिल्याचे सर्वविदित आहे. ते लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचारसभांमध्ये, ‘पंतप्रधान किसान सन्मान’ योजनेअंतर्गत ज्यांना लाभ मिळू शकतो, अशा सर्व शेतकर्‍यांची सूची बनविण्यात यावी, म्हटले होते. प. बंगालमध्ये आपले सरकार सत्तेवर आल्यानंतर जे शेतकरी या लाभांपासून वंचित राहिले आहेत, त्यांना त्यांचे सर्व लाभ मिळण्यास प्रारंभ होईल, असे पंतप्रधांनी म्हटले होते. त्यावर देशाचा पंतप्रधान आमच्या सरकारच्या अधिकार्‍यांना अशी सूची बनविण्याचे आदेश कसा काय देऊ शकतो? तसेच आदर्श निवडणूक आचारसंहिता असताना पंतप्रधान असे कसे बोलू शकतात, असे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. असे आदेश देणारे पंतप्रधान मोदी स्वतःस परमेश्वर समजतात की सुपरमॅन, असा प्रश्नही त्यांनी विचारला. प्रत्यक्षात केंद्राच्या अनेक योजनांपासून ममता बॅनर्जी यांच्या सरकारने शेतकर्‍यांना दूर ठेवले. केंद्राच्या योजनांचे लाभ त्यांना दिले, तर आपली लोकप्रियता घसरेल, अशी भीती वाटत असल्यानेच प. बंगालच्या शेतकर्‍यांना त्यांनी अशा योजनांपासून दूर ठेवले, हे उघड आहे. हे सर्व लक्षात घेऊन, आपले सरकार सत्तेवर आल्यानंतर आगामी दुर्गापूजेपूर्वी शेतकर्‍यांना त्यांचे सर्व लाभ मिळतील, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले, तर त्यात ममतादीदी यांना गैर का वाटावे? एवढ्या मिरच्या नाकाला का झोंबाव्यात? ममता बॅनर्जी यांच्या डोळ्यांपुढे पराभव दिसू लागल्याने त्यांच्याकडून कधी निवडणूक आयोगावर, तर कधी पंतप्रधान मोदी यांच्यावर आरोप केले जाऊ लागले आहेत. हे कशाचे द्योतक म्हणायचे? आजच्या मतदानानंतर प. बंगालमध्ये मतदानाच्या पाच फेर्‍या बाकी राहणार आहेत. त्या दरम्यानच्या प्रचारसभांमधून ममतादीदी काय काय तारे तोडतात, ते दिसून येईलच!
 
 
केरळ : भाजपला पराभूत करण्यासाठी मागितला डाव्यांचा पाठिंबा!
 
केरळमध्ये आज एकाच टप्प्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या राज्यात भाजपने आपला जोरदार प्रचार केल्याने संतापलेले विरोधक भाजप कार्यकर्त्यांवर हिंसक हल्लेही करीत आहेत. पण, तरीही त्यामुळे न डगमगता भाजप उमेदवारांनी आपला प्रचार सुरू ठेवला होता. भाजपने उभे केलेले आव्हान लक्षात घेऊन काही मतदारसंघांत काँग्रेस आघाडीस पराभव दिसू लागला आहे. केरळमधील मंजेश्वर या मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन हे निवडणूक लढवीत आहेत. त्यांना मिळत असलेला वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन यांना, डाव्या पक्षांना, मुस्लीम लीगच्या उमेदवारास मतदान करण्यास आपल्या पक्षाच्या समर्थकांना सांगावे, असे आवाहन करावे लागले. विविध माध्यमांनी, मंजेश्वरमध्ये भाजप निवडून येण्याची शक्यता वर्तविल्याने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना, भाजपला पराभूत करण्यासाठी डाव्या पक्षांना साद घालावी लागली. २०१६ साली झालेल्या निवडणुकीत याच मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार के. सुरेंद्रन यांचा अवघ्या ८९ मतांनी पराभव झाला होता. या मतदारसंघामध्ये ‘एसडीपीआय’ने या आधीच ‘मुस्लीम लीग’च्या उमेदवारास आपला पाठिंबा देऊ केला आहे. काँग्रेसनेही ‘मुस्लीम लीग’साठी डाव्यांचा पाठिंबा मागितला आहे. भाजपचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून काँग्रेस, डावे पक्ष कोणत्या थरापर्यंत जात आहेत, याची कल्पना मंजेश्वर मतदारसंघावरून यावी!
Powered By Sangraha 9.0