कोरोनामुळे लेखक, नाट्यनिर्माते शेखर ताम्हाणे पडद्याआड

29 Apr 2021 15:19:49

Shekhar Tamhane _1 &
 
 
ठाणे : प्रसिद्ध निर्माता, नाटककार शेखर ताम्हाणे यांचे बुधवारी रात्री ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शेखर ताम्हाणे हे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी लढा देत होते. त्यांच्या जाण्याने सांस्कृतिक, सामाजिक विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. नाट्य दिग्दर्शक आणि अभिनेते राजन ताम्हाणे यांचे ते ज्येष्ठ बंधू होते. अगदी काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळे त्यांची पत्नी उमा ताम्हाणे यांचेदेखील कोरोनामुळे देवाज्ञा झाली होती.
 
 
नाट्यलेखक शेखर ताम्हाणे यांचे ‘सविता दामोदर परांजपे’ हे नाटक खुप लोकप्रीय ठरले होते. या नाटकावर आधारीत 'सविता दामोदर परांजपे' हा चित्रपटही २०१८मध्ये आला होता. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता सुबोध भावे आणि तृप्ती तोरडमल होते. या व्यतीरिक्त ‘तु फक्त हो म्हण’, ‘तिन्ही सांज’ आणि ‘वेलकम जिंदगी’ या नाटकांचेही लेखन केले आहे. मागील वर्षी कोरोना संसर्गाच्या काळात त्यांनी नाट्यकर्मीसाठी मदत निधी उभा करण्यासाठी पुढाकार घेतला होता.
 
 
शेखर ताम्हाणे यांच्या पत्नी उमा ताम्हाणे यांचही १९ एप्रिलला कोरोनाने निधन झाले होते. त्यांची कन्या आरती यांनी काही दिवसांपूर्वी आईचे निधन झाले आणि वडील व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती एका फेसबुक पोस्टद्वारे दिली होती. शेखर यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. अखेर बुधवारी रात्री त्यांनी जगाचा निरोप घेतला. संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात आली.
Powered By Sangraha 9.0