आज, दि. २९ एप्रिल हा आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. या दिनाचे औचित्य साधून, बालपणापासूनच नृत्याची कलोपासना करणार्या ठाण्यातील निधी प्रभू या तरुणीची ही चित्तरकथा...
जन्मत:च पाय दुखावल्याने ही मुलगी भविष्यात चालू शकेल का? अशी भीती डॉक्टर व्यक्त करतात. परंतु, डॉक्टरांची ही भीती फोल ठरवत ती केवळ चालतच नाही, तर वयाच्या तिसर्या वर्षी रंगमंचावर गिरकी घेत आपला नृत्याविष्कार सादर करते. वयाच्या सहाव्या वर्षी ‘नूपुर रिआलिटी शो’ची विजेती ठरते, तर अवघ्या 21व्या वर्षी ‘गिनीज बुक रेकॉर्ड’ झालेल्या ‘वर्ल्ड कल्चर फेस्टिवल’मध्ये सहभागी होण्याचा सन्मान तिला मिळतो. आपल्या दिलखेचक अदाकारीने रसिकांच्या मनावर गारूड करीत शेकडो पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवते. नृत्यक्षेत्रात स्वत:ची नवी ओळख निर्माण करणार्या ठाण्यातील चरई येथे राहणार्या निधी प्रभू हिच्या रोमांचकारी नृत्यवारीची ही चित्तरकथा.
अनादी काळापासून भारताला नृत्याची महान परंपरा लाभली असून आता कुठे नृत्यकलेला ‘अच्छे दिन’ आलेत. मात्र, कुटुंबात नृत्याची कोणतीही पार्श्वभूमी नसताना बालपणापासून निधी नृत्याचे धडे गिरवू लागली. सगळेच नृत्य प्रकार आजमावून झाल्यावर ‘कथ्थक’ हा नृत्यप्रकार तिला अधिक जवळचा वाटला. त्यामुळे वयाच्या दहाव्या वर्षापासून तिचा खर्या अर्थाने ‘कथ्थक’चा प्रवास सुरू झाला. गुरू डॉ. मंजिरी देव आणि पं. मुकुंदराज देव यांच्याकडे ‘कथ्थक’चे शिक्षण घेतले. या दोन गुरूंबरोबर भविष्यात ‘पद्मविभूषण’ बिरजू महाराज आणि विदूषी शाश्वती सेन यांचे आशीर्वाद लाभल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला मिळाल्याचे ती आवर्जून नमूद करते. ‘कथ्थक’च्या शालेय तसेच आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा गाजवल्यामुळे व त्यात मिळणार्या यशामुळे जीवनाचे ध्येय ठरलं की, भविष्यात ‘कथ्थक’मध्येच करिअर करायचं. नृत्यस्पर्धांसोबतच नाट्यशिबिरांनाही हजेरी लावणार्या निधीने काही बालनाट्यातदेखील मुख्य भूमिका साकारल्या. परिणामी, तिच्यात रंगमंचावर वावरण्याची सहजता आली. अखिल गंधर्व महाविद्यालयातून ‘कथ्थक’ नृत्यात विशेष प्रावीण्य मिळवत ‘विशारद’ पदवी प्राप्त केली. वयाच्या 11व्या वर्षी तिला मानाचा ‘कलाश्री पुरस्कार’ प्राप्त झाला. ‘कथ्थक’मध्ये पारंगत झाल्याने गंधर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही ‘कथ्थक’चे धडे दिल्याचे निधी सांगते.
अध्ययन, अध्यापन करत तिने अनेक शास्त्रीय, उपशास्त्रीय स्पर्धेत सहभागी होऊन ४५०हून अधिक स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवण्याची किमया केली आहे. मध्यंतरी घोडागाडीत पाय अडकल्याने पायाला इजा झाली असतानाही तिने मुंबई विद्यापीठाच्या ‘युथ फेस्टिवल’मध्ये रौप्यपदक पटकावले. कॉलेज पातळीवरच्या विविध फेस्टिवल्समध्ये आपल्या नृत्याविष्काराचा रंगतरंग दाखवला आहे. अनेक शाळा-कॉलेजेसच्या फेस्टिवल्समध्ये तिला परीक्षक म्हणूनही बोलवले जाते. शिवाय अनेक अल्बम्समध्येही काम करीत त्या काळात तिने खूप सारे रिअॅलिटी शो केले. ‘नूपुर’, ‘दम दमा दम’, ‘कुछ कर दिखाना हैं’, ‘नॉटी चाईल्ड’, ‘मामाच्या गावाला जाऊया’ आदी म्युझिक अल्बममध्येही तिच्या नृत्याचा आविष्कार पाहायला मिळतो. नजीकच्या काळात प्रदर्शित झालेला ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील ‘पद्मविभूषण’ पं. बिरजू महाराज यांनी नृत्यदिग्दर्शन केलेल्या ‘मोहे रंग दो लाल’ या गाण्यावर नृत्य केले होते. या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान संजय लीला भन्साली यांनी निधीचे नृत्य पाहून तिचे विशेष कौतुक केल्याची आठवण ती सांगते. नृत्याचा प्रसार करण्याच्या हेतूने ती देश-विदेशात भ्रमंती करत आहे. ‘कथ्थक’बरोबरच तिला कोरिओग्राफीमध्येसुद्धा स्वारस्य असल्याने त्या क्षेत्रातही तिने आपला विशेष ठसा उमटवला. किंबहुना, ‘भरतनाट्यम’मध्येदेखील ती पारंगत झाली आहे. नृत्यशिक्षणाबरोबरच तिने ‘एम.कॉम.’ही वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवीही प्राप्त केली आहे. तिच्या आजवरच्या प्रवासात आई-बाबा व ताईचा मोठा वाटा असल्याचे ती आवर्जून सांगते.
एकदा ‘कथ्थक’ सादरीकरणाची सुरुवात झाली. मग बडोदा, नाशिक, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, केरळ, थायलंड आदी दौरे सुरू झाले. ‘पद्मश्री’ व ‘गोपीकृष्ण संगीत महोत्सव’, ‘चंद्रधर समारोह’, ‘किंकणी’ आणि अनेक महोत्सवात सादरीकरण करून वाहवा मिळवली. देशाचे पंतप्रधान व वित्तमंत्री यांच्यासमोर गोव्यात सादरीकरणाची संधी तिला मिळाली. पं. बिरजू महाराज यांच्यासमोर एकटीने कला सादर करण्याची तिची इच्छादेखील ‘पंचतत्त्व फेस्टिवल’मध्ये पूर्ण झाली. इस्रायल दौर्यात विश्वविख्यात ‘कथ्थक’ नृत्यकार अनुज मिश्रा यांच्यासमोरही निधीला नृत्याविष्कार सादर करण्याची संधी लाभली. हादेखील मैलाचा दगड ठरल्याचे ती मानते. संगीत मार्तंड जसराज यांच्या निर्मिती संस्थेत जोधपूरला सादरीकरण केले. हरीश भिमानी, गजलसम्राट अनुप जलोटा यांचा ‘व्हॉईस ओवर’ असलेल्या ‘कृष्णशरणम्’मध्येही निधीचेच नृत्य आहे. माधुरी दीक्षितच्या एका इव्हेंटमध्ये सहनृत्यदिग्दर्शकाची तसेच अनेकींसाठी कोरिओग्राफीची संधी मिळाल्याचे ती सांगते. लहान वयात एक-एक गोष्टी मिळत असल्याने प्रत्येक सादरीकरणादरम्यान भरपूर शिकायला मिळाल्याचे ती सांगते.
‘लॉकडाऊन’च्या आधी तिने स्वतःच्या ‘नादनिधी’ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर कोरोना आल्याने ‘लॉकडाऊन’ लागले. मात्र, यामुळे जग आणखी जवळ आल्याचे ती मानते. ‘ऑनलाईन’ माध्यमातून कलेचा विस्तार करण्यासह ‘नादनिधी’अंतर्गत युएस, युके, ऑस्ट्रेलिया, चेन्नई, दिल्ली, बंगळुरू, चंदिगढ, मथुरा, त्रिपुरा आदी अनेक ठिकाणांहून शिष्या शिकत आहेत. त्यामुळे कोरोनाकाळातदेखील निधीचा नृत्यनाद जोमदारपणे सुरूच आहे. अनेक दिग्गज कलाकारांना घेऊन ‘नृत्यसाधना’ हा प्रोजेक्ट पूर्ण केल्याचे ती सांगते. स्पर्धेच्या या युगात मानाचे असणारे ‘मेनका ट्रॉफी’, ‘पं. विष्णू दिगंबर पलुस्कर पुरस्कार’, ‘स्वरसाधना समिती’ सरकारची ‘सीसीआरटी स्कॉलरशीप’ व तेव्हाचा ‘नृत्यरत्न अवॉर्ड’, ‘कलानैपुण्य गुणगौरव, युवारत्न, ‘कलाश्री’, ‘वर्णम’ अशा अनेक मानाच्या पुरस्कारांचीही ती मानकरी ठरली आहे. दूरदर्शनवर देखील ती मानांकित कलाकार ठरली. गुरूंचे मार्गदर्शन आणि पालक व रसिकांची भक्कम साथ यामुळे हे यश मिळवू शकले. तेव्हा, एक जन्म अपुरा पडेल, एवढं आपल्याकडे असून आपली संस्कृती व आपला ठेवा जपून ठेवणं गरजेचं असल्याचे सांगणार्या निधीला ‘पीएचडी’चा ध्यास लागला आहे. तिच्या भावी वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा.