जॉर्ज फ्लॉएड : न्याय झाला, पण पुढे काय?

26 Apr 2021 21:06:22

george floyed_1 &nbs


जॉर्ज फ्लॉएड खटल्यात जर पोलीस अधिकारी डेरेक निर्दोष सुटला असता तर अमेरिका पुन्हा पेटली असती. जॉर्ज फ्लॉएडला न्याय मिळाला हे योग्यच झाले. पण, मुळात अमेरिकेत, तेसुद्धा एकविसाव्या शतकात अशा घटना घडतात, याचे फार आश्चर्य आहे.


कोरोनाचा कहर सुरू असताना इतर महत्त्वाच्या गोष्टींकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होणे स्वाभाविक आहे. म्हणूनच मागच्या आठवड्यात अमेरिकेतील एका न्यायालयाने गौरवर्णीय पोलीस अधिकारी डेरेक चौविन (जन्म : १९७६) हा दोषी असल्याचा निकाल दिला आहे. मागच्या आठवड्यात म्हणजे, २० एप्रिल रोजी खटल्याचा निकाल जाहीर झाला. डेरेक चौविनचा अपराध? मागच्या वर्षी मे महिन्यात डेरेक चौविनने जॉर्ज फ्लॉएड या कृष्णवर्णीय तरुणाचा दिवसाढवळ्या जीव घेतला होता. या घटनेने सर्व अमेरिकाच नव्हे, तर सर्व जग ढवळून निघाले होते. अमेरिका तसा साधा देश नाही, तर लोकशाही मूल्यांची प्राणापलीकडे जपवणूक करणारा देश, अशी अमेरिकेची प्रतिमा आहे. अशा अमेरिकेत एकविसाव्या शतकाच्या दुसर्‍या दशकात एका निग्रो तरुणाला हकनाक प्राण गमवावे लागतात आणि तेसुद्धा एका पोलीस अधिकार्‍याच्या अमानुष वागण्यामुळे. याचा धक्का जबरदस्त होता. डेरेक चौपिनला ४० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे. या घटनेची थोडक्यात माहिती असली म्हणजे अमेरिकेतील सामाजिक स्थिती, तेथे निग्रोंचे स्थान, तेथील न्यायपालिका वगैरे अनेक घटकांवर प्रकाश पडतो.



मागच्या वर्षी म्हणजे २५ मे, २०२० रोजी सकाळी ही घटना घडली. अमेरिकेतील मिनेसोटा राज्यातील मिनेपोलीस या शहरात सकाळी जॉर्ज फ्लॉएड या निग्रो व्यक्तीवर असा आळ ठेवण्यात आला की, त्याने एका सुपर मार्केटमध्ये खोटी नोट चालवण्याचा प्रयत्न केला. चार पोलीस अधिकार्‍यांनी फ्लॉएडला सुपर मार्केटच्या बाहेर अटक केली. अटक करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांत डेरेक होता. डेरेकने फ्लॉएडकडून कबुली जबाब मिळवण्यासाठी त्याला खाली पाडले आणि त्याच्या मानेवर गुडघा दाबला आणि दाबतच राहिला. हा प्रकार सुमारे आठ मिनिटं आणि १५ सेकंद चालला. फ्लॉएडने अनेक वेळा विनंती केली की, त्याला श्वास घेण्यास त्रास होत आहे. तरी डेरेकने गुडघा काढला नाही. शेवटी फ्लॉएडचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेत आणि जगभर अमेरिकेतील गौरवर्णीय पोलीस अधिकार्‍यांविरुद्ध निषेधाचे सूर उमटले. अमेरिकेतील अनेक शहरांत निषेधाचे मोर्चे निघाले. ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ तर्फे या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला.


दुसर्‍याच दिवशी या घटनेत अडकलेल्या चारही पोलीस अधिकार्‍यांना बडतर्फ केले. सर्व पुरावे वगैरे गोळा करून ८ मार्च, २०२१ रोजी त्यांच्या विरोधातल्या खटल्याला सुरुवात झाली. गेले तीन आठवडे सुनावणी सुरू होती. या दरम्यान, अक्षरशः हजारो लोकांनी न्यायालयाच्या बाहेर निदर्शनं सुरूच ठेवली होती. २० एप्रिलला जेव्हा डेरेकला दोषी घोषित केले, तेव्हा सर्वत्र एकच जल्लोष झाला. निकाल झाल्यावर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरीस यांनी स्वतः फोन करून जॉर्ज फ्लॉएडच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले. एवढेच नव्हे, तर दोघांनी निकालाच्या दिवशी सर्व पूर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आणि दिवसभर दूरदर्शनवर खटल्याची कारवाई बघितली. अनेक अमेरिकन वृत्तवाहिन्यांनी त्यांचे इतर कार्यक्रम रद्द करून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले. फोनवर जो बायडन जे बोलले ते फार महत्त्वाचे आहे. ते म्हणाले की, “या विजयाचा आनंद योग्यच आहे. पण, आपल्याला अजून खूप काम करायचं आहे. या देशातून वर्णद्वेष संपवायचा आहे.” अमेरिकेतील निग्रोंच्या संदर्भात हा खटला आणि आता त्या खटल्याचा आलेला निकाल फार महत्त्वाचा आहे. तेथील निग्रो समाजाला आजही भयानक वर्णद्वेषाला सामोरे जावे लागत असते. एकीकडून अतिशय श्रीमंत, सुशिक्षित, आर्थिक आणि तंत्रवैज्ञानिक क्षेत्रांत जगाचे नेतृत्व करणारा देश म्हणून अमेरिकेला सार्थ मान आहे. पण, त्याच अमेरिकेतल्या काही भागात टोकाचा वर्णद्वेष आहे, हेही अटळ सत्य उरतेच.

अमेरिकेतील न्यायपालिका या संदर्भात बदनाम आहे. तिथं जर गौरवर्णीय विरुद्ध निग्रो, असा जर खटला असला किंवा गौरवर्णीय पोलीस अधिकारी आणि निग्रो असा जरी खटला असला तरी त्यात घाईघाईने न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केली जाते. यात गौरवर्णीयांवर जवळजवळ कधीही गुन्हा सिद्ध होत नाही आणि त्यांना शिक्षा होत नाही. याच्या उलट जर आरोपी निग्रो समाजातील असेल तर त्यांना हमखास शिक्षा होते. सन २००५  पासून पोलिसांनी केलेल्या गोळीबाराच्या हजारो घटनांचा अभ्यास केल्यावर असे दिसून आले की, फक्त १४० अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल केला होता आणि त्यातल्या फक्त सात व्यक्तींना शिक्षा झाली. नेमकं याच कारणांसाठी जॉर्ज फ्लॉएड खटल्याकडे अवघ्या अमेरिकेचे लक्ष लागले होते. या खटल्यात जर पोलीस अधिकारी डेरेक निर्दोष सुटला असता तर अमेरिका पुन्हा पेटली असती. जॉर्ज फ्लॉएडला न्याय मिळाला हे योग्यच झाले. पण, मुळात अमेरिकेत, तेसुद्धा एकविसाव्या शतकात अशा घटना घडतात, याचे फार आश्चर्य आहे.

अब्राहम लिंकन यांच्या प्रयत्नांनी इ. सन १८६४ साली अमेरिकेतल्या निग्रोंची गुलामगिरी संपली. या घटनेला आता १५६ वर्षे होत आहेत. तरी अमेरिकेतल्या निग्रोंची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्थिती चांगली आहे, असे म्हणवत नाही. २०१९च्या आर्थिक अहवालानुसार, अमेरिकेतील निग्रोंमध्ये दारिद्य्राचं प्रमाण १९ टक्के एवढं आहे. इ. सन १७७६ साली स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रस्तुत करणार्‍या अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वाशिंग्टन होते. आजचे जो बायडन हे अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष आहेत. या ४६ राष्ट्राध्यक्षांत एकही निग्रो व्यक्ती नाही! बराक ओबामा हे अर्ध-निग्रो होते. त्यांची आई गौरवर्णीय होती, तर वडील निग्रो होते. ते निवडून येऊ नये म्हणून किती अडथळे आणण्यात आले होते, हे एव्हाना जगासमोर आलेले आहे. जगाच्या इतिहासात लोकशाही शासनव्यवस्था सुरू झाल्यापासून ‘समानता’ हे मूल्य महत्त्वाचे मानले गेले आहे. म्हणूनच पाश्चात्त्य समाजातील देशांच्या घटनेत ‘वर्ण, भाषा, धर्म, लिंग वगैरेंच्या आधारे नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय केला जाणार नाही किंवा त्यांना कोणतीही संधी नाकारली जाणार नाही, अशी स्पष्ट शब्दांत ग्वाही दिलेली असते.

भारतीय राज्यघटना याला अपवाद नाही. असे असूनही प्रत्यक्ष व्यवहारात ‘समानता’ या तत्त्वाचा पूर्णपणे वापर होतो, असं नाही. अनेक प्रकारचे, कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष, अन्याय कधी सफाईने तर कधी अप्रत्यक्षपणे केले जातात. यासंदर्भात चटकन आठवणारे उदाहरण म्हणजे कै. बापू जगजीवनराम यांचे. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. काही काळ ते भारताचे उपपंतप्रधानसुद्धा होते. जुलै १९७९मध्ये जनता पक्षाचे सरकार कोसळले आणि राष्ट्रपती डॉ. नीलम संजीव रेड्डी यांनी चौधरी चरणसिंग यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली. पण, चौधरींना बहुमत सिद्ध करता आले नाही. परिणामी, चौधरींनी राजीनामा दिला. त्यानंतर उत्तर भारतातील दलित समाजाचे नेते जगजीवनराम यांची अपेक्षा होती की, राष्ट्रपती महोदय त्यांना सरकार स्थापन करण्याची संधी देतील. पण, राष्ट्रपतींनी काळजीवाहू पंतप्रधान चरणसिंगांचा सल्ला ग्राह्य धरला आणि लोकसभा विसर्जित केली. ही घटना एवढ्या तपशिलाने सांगण्याचा हेतू हाच की, तेव्हा जगजीवनराम उद्विग्नपणे म्हणाले होते, “इस कंबख्त मुल्क में एक चमार कभी प्राईम मिनिस्टर नही बन सकता।” हे वाक्य जरी १९७९ सालचे असले तरीही आजही परिस्थितीत फारसा फरक पडला नाही. म्हणूनच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले ते खरं आहे. जोपर्यंत मनातील वर्णश्रेष्ठत्वाची भावना कायमची जात नाही, तोपर्यंत अमेरिकेत कुठे ना कुठे जॉर्ज फ्लॉएडला जीव गमवावा लागेल. ही लढाई दोन-चार दिवसांत संपणारी नाही. यासाठी अनेक वर्षं सतत काम करावे लागेल. तरच ‘वर्णविरहित’ आणि ‘जातविरहित समाज निर्माण होईल.

Powered By Sangraha 9.0