तबला वादनातील ऐश्वर्या

25 Apr 2021 21:44:10

ऐश्वर्या अजित नाडकर्णी _1



तबल्यातील फर्रूखाबाद घराण्याच्या परंपरेतील ‘थिरकवाँ’ शैलीच्या अभ्यासिका ऐश्वर्या अजित नाडकर्णी यांना तबला विषयात पी.एचडी प्रदान करण्यात आली आहे. यानिमित्ताने त्यांचा तबला वादनातील प्रवास जाणून घेऊया.



तबला हे हिंदुस्थानी संगीतात वापरले जाणारे तालवाद्य आहे. गायन-वादनाची संगत असो व स्वतंत्र वादन यात तबला हे अनिवार्य वाद्य आहे. यामुळेच ऐश्वर्या या तबलावादनाकडे वळल्या. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी तबला वादनाचे धडे घेण्यास सुरूवात केली. मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या ऐश्वर्या या पूर्वाश्रमीच्या सुवर्णा अरविंद घोलकर. त्यांचे शालेय शिक्षण खासगी शाळेतून झाले तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी शहाजी महाविद्यालयातून पूर्ण केले. इतिहास या विषयात त्यांनी पदवी संपादन केली. कोल्हापूर ही कलानगरी असली, तरी खेडेगावातील एका मुलीने तबलावादन करणे ही त्यावेळी फारशी कोणालाही रुचणारी गोष्ट नव्हती. ऐश्वर्या व त्यांच्या चार बहिणींना कोणत्या विषयाची आवड आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांच्या वडिलांनी केला. ऐश्वर्या यांना संगीताविषयी विशेष आवड असल्याने त्यांनी तबल्याची निवड केली होती. त्यांच्या वडिलांनीही तबल्याची आवड जोपासावी यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले.

ऐश्वर्या यांना तबल्याचे शास्त्रोक्त शिक्षण मिळावे यासाठी पंडित यशवंत अष्टेकर यांच्याकडे त्या जाऊ लागल्या. आठवड्यातून एक दिवस तबल्याचे प्रशिक्षण घेत असताना दोन ते तीन वर्ष निघून गेली. त्यानंतर मात्र ऐश्वर्या यांच्या तबला प्रशिक्षणात अंतर पडले. त्यांनी रियाज सुरु ठेवला होता. मधल्या काळात त्यांनी भारत सरकारची अत्यंत मानाची समजली जाणारी तबलावादनातील राष्ट्रीय शिष्यवृत्तीही मिळविली. भारतात केवळ १५० वेगवेगळ्या कलेतील पारंगत व्यक्तींनाच ही शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. अवघ्या दोन-तीन वर्षातच त्यांनी ही शिष्यवृत्ती मिळविली. एके दिवशी तबला या प्रकारातील ‘चिल्ला’ यावर कार्यक्रम करण्यासाठी पंडित नारायण गजानन जोशी हे कोल्हापूरला गेले होते. काही कारणास्तव संस्थेने त्यांचा कार्यक्रम रद्द केला होता. पण कार्यक्रम न करता परत फिरणे हे पंडित जोशी यांच्या मनाला काही फारसे रुचत नव्हते. पंडित जोशी आणि पंडित अष्टेकर यांचे घनिष्ट संबंध होते. ऐश्वर्या यांचे गुरू असलेले पंडित अष्टेकर यांच्याकडे पंडित नारायण जोशी आले होते. पंडित अष्टेकरांची गुणवान शिष्या म्हणून ऐश्वर्या यांची ओळख पंडित जोशी यांना करून देण्यात आली. पंडित जोशी यांनी ऐश्वर्या यांना तबला वादनातील एक बोल शिकवून वाजविण्यास सांगितले. हा बोल मी पुन्हा येईपर्यंत वाजविला पाहिजे.

मी कोणालाही असेच शिकवित नाही, असे सांगून पंडित जोशी निघून गेले. त्यानंतर तब्बल १८ तासांनी ते पुन्हा ऐश्वर्याच्या घरी परतले. या १८ तासांत ऐश्वर्या यांनी तबलावादन थांबविले नव्हते. ऐश्वर्या यांचे आई-वडील त्यांना म्हणाले की, “पंडित जोशी यांनी तुझी मस्करी केली असेल. तू थोडे खाऊन घे. एवढ्या लहान मुलांना असे कुणी सांगत नाही.” मात्र, ऐश्वर्या आपल्या मतावर ठाम होत्या. त्यांनी पंडित जोशी परत येईपर्यंत तबला वादनात खंड पडू दिला नाही. पंडित जोशी परतले आणि ऐश्वर्याचे तबला वादन सुरूच आहे, हे पाहून ते थक्क झाले. त्यांनी ऐश्वर्याला गंडाबंध शागिर्द करून घेतले. पंडित जोशी हे डोंबिवलीकर असल्याने ते सहा महिन्यातून कधी कोल्हापूरला जात असत, तर कधी ऐश्वर्या आपल्या आई-वडिलांसोबत डोंबिवलीत येत असे. १५ ते २० दिवस राहून १४ ते १८ तास रियाज करीत असे. आधी जे शिकविले त्यांची उजळणी केली जात असे. त्यानंतर नवीन शिकण्याकडे वळायचे, असा क्रमच होता. अशाप्रकारे शिक्षणासाठी ऐश्वर्या यांनी कोल्हापूर ते डोंबिवली असा प्रवास केला आहे.


दरम्यान, ऐश्वर्या यांच्या विवाहाचा विषय सुरु असताना एकच स्थळ दोन ते तीन नातेवाईकांनी सुचविले होते. तबल्याचा रियाज करू देतील, अशाच व्यक्तीशी लग्न करणार अशी अटच होती. ऐश्वर्या यांचे पती अजित यांना त्यांची अट मान्य होती. अजित यांनीही ऐश्वर्या यांची कला कायम जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिले. १९९६ ला ऐश्वर्या यांचे लग्न झाले. त्या डोंबिवलीकर झाल्या. ऐश्वर्या यांच्या वडिलांचे स्वप्न होते आपल्या मुलीने पी.एचडी करावी. पी.एचडीचे बीज ऐश्वर्या यांच्या मनात वडिलांनी रुजविले होते. पण मुंबई विद्यापीठात तबल्यामध्ये पी.एचडी करण्याची कोणतीच सोय नव्हती. त्यामुळे ऐश्वर्या यांच्या वडिलांच्या हयातीत ते शक्य झाले नाही. ऐश्वर्या यांनी २०११ साली अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या तबला संगीत अलंकार परीक्षेत भारतातून प्रथम येण्याचा मान मिळविला. २०१३ साली शिवाजी विद्यापीठातून मास्टर्स ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स (तबला) परीक्षेत त्यांनी विद्यापीठातून अव्वल स्थान मिळविले. घरातील सगळ्या जबाबदार्‍या पार पाडून २०१७ साली ऐश्वर्या यांनी पी.एचडीसाठी रजिस्ट्रेशन केले. तबला विषयात त्यानी ‘स्वतंत्र तबलावादन में गत एवं उनके प्रकारों का सौंदर्यात्मक विवेचन: विश्लेषणात्मक अध्ययन’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. बडोदा येथील ‘द महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी’त नुकत्याच पार पडलेल्या 69व्या दीक्षांत समारंभात फारुखबाद घराण्याच्या परंपरेतील ‘थिरकवाँ’ शैलीतील अभ्यासक ऐश्वर्या नाडकर्णी यांना पी.एचडी प्रदान करण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना अजरडा घराण्याचे विद्वान प्रा. डॉ. अजय अष्टपुत्रे यांचे मार्गदर्शन लाभले. ऐश्वर्या यांनी ही पदवी त्यांच्या पूर्वाश्रमीच्या नावाने मिळविली आहे. ऐश्वर्या यांनी पी.एचडी मिळवून त्यांच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. या प्रवासात त्यांना त्यांचा मुलगा डॉ. नितीश यांचेही सहकार्य लाभले. ऐश्वर्या यांच्या पुढील प्रवासाला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...!

Powered By Sangraha 9.0