भारताच्या स्वातंत्र्य आणि सामाजिक समतेच्या लढाईत अनेक महापुरुषांनी आपले योगदान दिले. पण, एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वाधामध्ये सर्वात तेजाने चमकून गेलेले दोन तारे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. १८९१च्या १४ एप्रिलला आंबेडकरांचा जन्म, तर सावरकर २८ मे, १८८३ साली जन्मले. प्रखर प्रज्ञा, अफाट व्यासंग, कार्यावरची अढळ श्रद्धा, निर्भयपणा, गरिबांविषयी कळवळ ही दोघांमधील साम्यस्थळे. इंग्लडला ‘बॅरिस्टर’ होण्यासाठी दोघेही गेले. दोघेही उतीर्ण झाले. क्रांतिकार्याची शिक्षा म्हणून सावरकरांनी बॅरिस्टरी नाकारली आणि भारतीय स्वातंत्र्याचा प्रश्न जगाच्या वेशीवर टांगून सावरकर अंदमानामध्ये १९२१ पर्यंत कष्ट भोगत राहिले, कोलू ओढीत पिचले. इकडे विद्येच्या सागरामध्ये अथांगपणे पोहत राहिलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हजारो ग्रंथ वाचित, चिंतन करीत, मनन करीत राहिले. त्यांच्या विद्ववतेचा सन्मान म्हणून १९२७ साली मुंबईचे राज्यपाल सर लॉरेन्स यांनी बाबासाहेबांना मुंबई विधीमंडळावर नियुक्त सभासद म्हणून नेमले. फार थोड्या लोकांना हे माहिती आहे की, बाबासाहेबांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना पूर्ण बंधमुक्त करून सोडवावे, अशी विनंती याच कालखंडात केली होती.
सावरकरांच्या सुटकेसाठी लोकमान्य टिळकांपासून सुरेंद्रनाथ बॅनर्जी, जमनादास मेहेता, विठ्ठलभाई पटेल, सरोजिनी नायडू, बॅ. जयकर, याकुब हुसेन, लक्ष्मीदास तेरसी, के. नटराजन, मौलाना आझाद इत्यादींनी खटपट केली होती. त्यात आता भर पडली होती डॉ. बाबासाहेबांची. १९२४ मध्ये ‘कलम ४०१’ ‘इंडियन क्रिमिनल प्रोसिजर कोड’च्या अन्वये सरकारने सावरकारांना सशर्त बंधमुक्त करुन रत्नागिरीतली स्थानबद्धता आणि राजकारणात भाग घ्यावयाच्या नाही, या दोन अटी पाच वर्षांकरिता घातलेल्या होत्या. प्रत्यक्षात पूर्णपणे बंधमुक्त होण्यासाठी सावरकरांना आणखी १३ वर्षे बंधनात राहावे लागले, पण बाबासाहेबांनी त्यांच्यामार्फत १९२७ सालीच सरकारचे लक्ष वेधून घेतले होते, ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे.
सुरुवातीच्या काळात परळच्या ‘सोशल सर्व्हिस लीग’च्या लहान खोलीत बाबासाहेबांचे कार्यालय होते. या खोलीतच १९२४ साली नारायणराव सावरकर बाबासाहेबांना येऊन प्रथम भेटले आणि त्यांच्यात मैत्री निर्माण झाली. चर्चा, वैचारिक देवाणघेवाण होत राहिली. ‘श्रद्धानंद’चे अंक बाबासाहेबांना नारायणराव देत असत, तर ‘बहिष्कृत भारत’चे अंक सावरकर बंधूंपर्यंत जात असत.
‘बहिष्कृत भारत’च्या पहिल्या अंकांच्या शीर्षस्थानी आंबेडकरांनी ज्ञानेश्वरांची ओवी योजिलेली होती.
आता कोदंड घेऊन हाती। आरुढ पां इथे रथी।
देई आलिंगन वीरवृत्ती। समाधाने।
जगी कीर्ती रुढवी। स्वधर्माचा मानू वाढवी।
इया भारा पासोनि सोडवी। मेदिनी हे।
आता पार्था निः शंकु होई। या संग्रामा चित्त देई।
एथ हे वाचूनि काही। बोलो नये।
समाजकारण, सेवा करणार्याला किती प्रेरणादायक ओळी आहेत या!
१९३७ साली बंधमुक्त होईपर्यंत आंबेडकर-सावरकर भेट होण्याची शक्यताच नव्हती. बॅ. जमनादास मेहेतांच्या खटपटीनंतर सावरकर बंधमुक्त झाले. त्याच्यानंतरच्या कालखंडात सावरकर आणि आंबेडकरांच्या कितीतरी भेटी झाल्या. सावरकर सदनात बॅरिस्टर डॉक्टर आंबेडकर येत असत, ही गोष्टसुद्धा चालू काळातल्या समाजसौहार्द वर्धनाच्या दृष्टीने अपूर्व अशीच आहे, यात शंका नाही!
हे दोघे परस्परांना कधी भेटले होते का, त्यांच्यात विचारविनिमय झाला होता का, याबद्दल अनेक विचारवंतांना, नेत्यांना माहिती नाही, पण तसे नाही. सत्य हे आहे की, त्यांच्यात विचारमंथन होते, भेटीही होत होत्या. साहित्यसम्राट केळकर, भोपटकर बंधू, शंकरराव दाते, श्री. म. माटे, डॉ. मुंजे, भिडे गुरूजी, नारायणराव सावरकर, पत्रकार चिटणीस, आचार्य अत्रे ही मंडळी बाबासाहेबांच्या संपर्कात अनेक वेळा होती. काही भेटींची नोंद खालीलप्रमाणे आहे.
१) २८ जानेवारी, १९३९ रोजी दादरच्या हिंदू कॉलनीत एका मंचावर येऊन बॅ. जमनादास मेहेता, बॅ. सावरकर, बॅ. आंबेडकर या तीन बॅरिस्टरांनी भाषणे केली होती. विषय होता पत्रकार तटणीस हे निवडणुकीस महापालिकेसाठी उमेदवार म्हणून...
२) ५ मे, १९३९ रोजी भारत मंत्र्यांचे सल्लागार, मध्य प्रांताचे माजी राज्यपाल डॉ. राघवेंद्र राव यांच्या सन्मानार्थ हिंदू महासभेने एक उपहार दिला होता. तेथे आंबेडकर-सावरकर उपस्थित होते.
३) १३ जानेवारी, १९४० सावरकर सदनात आचार्य दोंदे यांच्यासमवेत डॉक्टरसाहेब आले होते.
४) १८ एप्रिल, १९४० काँग्रेसेतर पक्षांची सभा सर चुनिलाल मेहता यांनी बोलावलेली होती, तेथे हे दोघे उपस्थित होते.
५) १४ मार्च, १९४० ‘हॉटेल ताज’मध्ये एक बैठक झाली. तेथे सर जगदीश प्रसाद, सर रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, लोकनायक डॉ. मुंजे, सावरकर-आंबेडकर हे बॅरिस्टरद्वयी हजर होते.
६) ५ फेब्रुवारी, १९४० रोजी पारशी समाजाने मलबार येथे एक बैठक बोलावली होती, तेथे हे दोघे उपस्थित होते.
७) २६ जुलै, १९४१ पुण्याच्या गोखले हॉलमध्ये एक बैठक संपन्न झाली. तेथे बॅरिस्टर तेज बहाद्दूर, बॅ. जयकर, सर विश्वेश्वरय्या, डॉ. राधाकृष्णन, डॉ. रघुनाथराव परांजपे यांच्याबरोबर हे दोघे होते. अध्यक्ष सावरकरच होते.
८) २८ फेब्रुवारी, १९४१ मद्रासच्या ‘हिंदू’ या दैनिकात सावरकरांची एक प्रदीर्घ मुलाखत आली होती. त्यात “आंबेडकरांचे पाकिस्तानवरच्या पुस्तकाबाबतीत आमचे दोघांचे आधी बोलणे झाले होते,” असा उल्लेख आहे. सावरकर म्हणाले की, “आंबेडकरांनी सत्यावलोकन केलेले आहे. त्याचा अर्थ त्यांचा पाकिस्तानला पाठिंबा नाही.”
९) ११ एप्रिल, १९४३ दिल्लीच्या हिंदू महासभेत सावरकर आणि आंबेडकर यांची भेट झाली होती. एक तास चर्चा झाली.
१०) त्याच दिवशी संध्याकाळी दोघांची बाबासाहेबांच्या बंगल्यात भेट झाली. चहापान झाले.
सावरकर, आंबेडकर यांना परस्परांविषयी आदर होता. त्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महाराज्यपालांच्या कार्यकारिणीचे सदस्य बनवावे म्हणून स्वा. सावरकरांनी व्हॉईसरॉय लिनलिथगो यांस तार केलेली होती. सावरकरांच्या बद्दलचे आंबेडकरांचे एक प्रांजळ मत होते. ते म्हणत, “सावरकर हे दुबळ्या हिंदू महासभेचे समर्थ नेते आहेत.” हिंदू महासभेचे महान नेते डॉ. मुंजे गोलमेज परिषदेचे अध्यक्ष असताना आंबेडकरांना ‘तुम्हीच हिंदू महासभेचे अध्यक्ष व्हा’ असे म्हणत. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. आंबेडकर हे दोन महापुरुष त्यावेळी एकत्र आले असते, तर भारताच्या इतिहास खरोखरच बदलला असता.
- अनंत ओगले