समाजाचा ‘आधार’ बनलेला उद्योजक

15 Apr 2021 23:47:24

Prakash Shinde_1 &nb
 
 
 
प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करणार्‍याला यश १०० टक्के मिळते हे आपल्या आजूबाजूस आपल्याला पाहावयास मिळते. प्रकाशनेसुद्धा असाच संघर्ष केला. घरोघरी पेपर टाक, फळं विक, दिवसभर काम करून रात्रशाळेत शिक असा संघर्ष त्याच्या वाटेला आला, पण तो डगमगला नाही. त्याने संघर्ष करून प्रचंड मेहनत घेऊन आपल्या जीवनातला गरिबीचा अंधार दूर केला. अनेक गरजू, पीडितांचा तो आज आधार बनलाय. तो प्रकाश एक उद्योजक, समाजसेवक म्हणून नावारुपास आला. ही संघर्ष कथा आहे, ‘व्हीपीपीएस कॉर्पोरेट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेचे अध्यक्ष प्रकाश शिंदे यांची.
 
 
 
नाशिकच्या इगतपुरीमधील वाळविहीर हे एक छोटंस खेडेगाव. या गावात धोंडिराम रोंगाजी शिंदे आणि लता धोंडिराम शिंदे हे शेतकरी दाम्पत्य राहत होतं. या शेतकरी जोडप्याच्या पदरात होती चार लेकरं. तीन मुली आणि एक मुलगा. आपल्या पोरानं आपल्यासारखं शेतकर्‍याचं जीणं जगू नये, तर त्याने शिकून सवरून मोठ्ठं साहेब बनावं, असं या नवरा-बायकोला नेहमीच वाटायचं. वाळविहीरमध्ये राहून ते शक्य नव्हतं. म्हणून या दोघांनी आपल्या मुलाला, प्रकाशना त्यांच्या मामाकडे शिक्षणासाठी पाठवलं. चौथीपर्यंत प्रकाश गावातल्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होते. मामाकडे मुलुंडला ते आले. सातवीपर्यंत तिथल्या शाळेत शिकले. सातवीत आल्यानंतर त्यांना समज आली होती. आपण आपल्या मामाकडे शिकायला आलोय, आपल्या शिक्षणाचा मामाला भार नको म्हणून त्या बालवयात प्रकाशनी काहीतरी कमावण्याचा निश्चय केला.
 
 
त्यांनी घरोघरी पेपर टाकण्याचं काम स्वीकारलं. १२० रुपये महिन्याला पगार होता. हीच त्यांची पहिली कमाई. ऊन असो की वारा, थंडी असो की पाऊस, कशाचीच तमा न बाळगता प्रकाश घरोघरी पेपर टाकू लागले. या कामामुळे त्यांच्या आयुष्याला एक शिस्त लागली. वेळेचं बंधन ते शिकले. एक वेगळाच आत्मविश्वास त्या चिमुरड्या वयात त्यांना आला. पुढे दहावीपर्यंतचं शिक्षण त्यांनी माझगावच्या एका रात्रशाळेत पूर्ण केलं. नववीत असताना प्लास्टिकच्या पिशव्या तयार करणार्‍या एका कंपनीमध्ये हेल्पर म्हणून ते काम करू लागले. पगार होता महिना फक्त तीन हजार रुपये. अशाप्रकारे त्यांचं कमावून शिकणं सुरूच होतं. अकरावी- बारावी त्यांनी बाहेरूनच दिली. पदवीसुद्धा त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून प्राप्त केली.
 
 
दरम्यान, ते एका मोठ्या बांधकाम व्यावसायिक संस्थेत ‘ऑफिस असिस्टंट’ म्हणून कामाला लागले. मासिक पगार होता अवघा साडेचार हजार रुपये. पडेल ती कामे ते करायचे. प्रामाणिक स्वभाव, कष्टाळू आणि मनमिळावूपणा यामुळे कंपनीत ते पदोन्नती मिळवत राहिले. याचवेळी त्यांनी आई-बाबांना आणि बहिणींना गावाहून मुंबईला आणले. एक छोटंसं घर भाड्याने घेतलं. आता तर ते दुपटीनं मेहनत करू लागले. ऑफिस सुटल्यावर आईसोबत ते फळंसुद्धा विकू लागले. हळूहळू प्रगती करत त्यांनी मोठ्या बहिणींची लग्न करुन दिली. छोट्या बहिणीला शिकवू लागले. २००८ मध्ये वैशाली या पदवीधर तरुणीसोबत ते विवाहबंधनात अडकले. वैशाली एका खासगी बँकेत अधिकारी होती. कालांतराने या जोडप्यास दोन अपत्ये झाली. प्रणव आणि स्वरा. सध्या प्रणव १२ वर्षांचा आहे, तर स्वरा तीन वर्षांची. वैशाली आयुष्यात आल्याने प्रकाशच्या जीवनाला कलाटणी मिळाली. आर्थिक सुबत्तासुद्धा आली. प्रकाश आता त्या बांधकाम व्यावसायिक संस्थेत व्यवस्थापक पदावर पोहोचले.
 
 
समाजाचे आपल्यावर ऋण आहेत, याची परतफेड केली पाहिजे या भावनेने त्याने २०१२ साली ‘प्रणव आधार एनजीओ’ सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून सरकारी योजनांचे लाभ सर्वसामान्यांना मिळवून देण्याचे काम ते करू लागला. आधार कार्ड, पॅन कार्ड यासोबतच अनेक सरकारी योजना ज्या सर्वसामान्यांना माहीतदेखील नाहीत, त्या त्याने त्यांच्यापाशी आणले. त्याचे लाभ मिळवून दिले. वृद्धांसाठी कट्टा, सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालय, गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप, विधवा-निराधार महिलांसाठी सरकारी पेन्शन चालू करून देणे, महिलांसाठी शिलाई यंत्रांचे वाटप, बेरोजगारांना रोजगार शिबीर अशा अनेक उपक्रमांना वाव दिला. या सगळ्याचा लाभ त्या घटकांना झाला.
 
 
व्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना प्रकाश शिंदे यांना ७० हजार रुपये मासिक वेतन मिळत होते. मात्र, आता हीच वेळ आहे आपला व्यवसाय सुरू करण्याची असं त्यांनी ठरविले. त्यासाठी नोकरीचा राजीनामा देण्याचे निश्चित केले. त्यांचा हा निर्णय घरच्यांना जराही पसंत पडला नाही. एवढी सोन्यासारखी नोकरी सोडून बिनभरवशाचा व्यवसाय करणे कुटुंबीयांना मान्य नव्हते. कारण, शिंदे कुटुंबात कुणीच व्यवसाय केला नव्हता. उद्योगाची मक्तेदारी काय फक्त गुजराती-मारवाड्यांकडेच नाही. अनेक मराठी तरुण व्यवसाय करतात. दुसर्‍या चाकरी करण्यापेक्षा आपल्या मालकीचा व्यवसाय बरा. प्रकाश शिंदेंच्या या युक्तिवादापुढे घरचे नमले.
 
 
स्वत:जवळची जमापुंजी आणि बँकेचे कर्ज असे करून शिंदेंनी भांडवल उभारलं आणि सुरू झाली ‘व्हीपीपीएस कॉर्पोरेट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड.’ नाशिकजवळच त्यांनी गाड्यांना सुटे भाग पुरवणारा कारखाना सुरू केला. २०१८च्या आसपासचा तो काळ. कोणताही व्यवसाय पूर्णपणे सक्षम होण्यासाठी किमान तीन वर्षे तरी आवश्यक असतात. जवळपास ४० कामगार कार्यरत होते. सारं काही सुरळीत चाललंय, असं वाटत असताना कोरोनाचा राक्षस आला. वाहन उद्योगाचे या राक्षसाने अक्षरश: कंबरडंच मोडलं. शिंदेंना तब्बल दीड कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले. एवढं होऊनही त्यांनी हार मानली नाही. ते पुन्हा उभे राहिले. सध्या या कारखान्यात २५ कर्मचारी कार्यरत आहेत. नाही म्हणता कारखाना या कोरोनाच्या आपत्तीमध्येसुद्धा सुरू आहे.
 
 
 
सध्या त्यांच्याकडे ‘टाटा मोटर्स’चा एक मोठा प्रकल्प आहे. ‘टाटां’च्या गाड्यांसाठी पार्किंगमध्ये ‘चार्जर इन्स्टॉलेशन’चा प्रकल्प ते राबवत आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे या विभागात ते कार्यरत आहेत. यासोबतच काही शासकीय प्रकल्पांवरदेखील ते काम करत आहेत. भारत सरकारच्या दीव-दमण आणि महाराष्ट्राच्या जनगणनेचे काम त्यांच्या संस्थेमार्फत सध्या सुरू आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील विविध ख्यातनाम विकासकांसाठी, बांधकाम व्यावसायिकांसाठी ‘लायझनिंग सल्लागार’ म्हणूनसुद्धा ते काम पाहतात.
 
 
समाजातील काही वृद्धांचा वृद्धापकाळ हा अत्यंत वाईट असतो. त्यांना पडत्या काळात कोणीच आधार देत नाही. या वृद्धांसाठी आधार बनण्याचा निर्धार ‘प्रणव आधार एनजीओ’ने केला. या वृद्धांना आधार म्हणून प्रकाश शिंदेंनी आपल्या गावी, वाळविहीर मध्ये एक जागा विकत घेतली. तिथे आता ‘आधार वृद्धाश्रम’ आकारास येत आहे. प्रकाश शिंदेंच्या या सामाजिक तळमळीतून निर्माण केलेल्या कार्यास सलाम म्हणून त्यांना ‘समाजभूषण पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले होते.
 
 
कोणताही व्यवसाय छोट्यातून मोठा होतो. तुमचा प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी, जिद्द या गुणांमुळेच तो व्यवसाय मोठा होता. अनेक शासकीय योजनांच्या माध्यमातूनसुद्धा अर्थार्जन करता येऊ शकते. यासाठी काहीही मदत हवी असल्यास ती करण्याची तयारी आहे, असे प्रकाश शिंदे आवर्जून सांगतात. उद्योग-व्यवसाय सगळेच करतात. मात्र, व्यवसाय करत असताना सामाजिक बांधिलकी जोपासत जो उद्योजक समाजाचा ‘आधार’ बनतो तोच खरा उद्योजक. प्रकाश शिंदे खर्‍या अर्थाने समाजाचा आधार बनलेले उद्योजक आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0