केरळमध्ये असेही घडू शकते...!

12 Apr 2021 22:12:11

Kerala_1  H x W
 
राज्यपाल अरिफ महंमद खान यांच्या या कृतीमागे त्यांचा काही राजकीय स्वार्थ नसला तरी या घटनेचे भांडवल करून राज्यपालांच्या या कृतीवर ‘पुरोगामी’ म्हणविणार्‍या नेत्यांकडून, जहाल मुस्लीम संघटनांकडून टीका झाल्यावाचून राहणार नाही. टीका झाली तरही राज्यपालांनी नक्कीच एक चांगली कृती केली असे म्हणता येईल.
केरळमध्ये अतिरेकी मुस्लीम संघटना समाजासमाजामध्ये फूट पाडण्याच्या प्रयत्नात असताना, केरळचे राज्यपाल अरिफ महंमद खान यांनी संपूर्ण समाजापुढे आदर्श घालून देणारी कृती नुकतीच केली आहे. राज्याचा प्रतिनिधी या नात्याने राज्यपाल अरिफ महंमद खान यांनी केलेली कृती नक्कीच कौतुकास्पद आहे. राजस्थानमधील अजमेर शरीफच्या दर्ग्यावर चादर चढविण्यासाठी जाणार्‍या विविध राजकीय नेत्यांचे फोटो आपल्या पाहण्यात येत असतात. अशी कृती करून आपण किती धर्मनिरपेक्ष आहोत, हे दाखविण्याचा त्या नेत्यांचा प्रयत्न असतो. पण, अशी कृती करताना मुस्लीम मतपेढीवर त्यांचा डोळा असतो, हेही विसरता काम नये! राज्यपाल अरिफ महंमद खान यांच्या या कृतीमागे त्यांचा काही राजकीय स्वार्थ नसला तरी या घटनेचे भांडवल करून राज्यपालांच्या या कृतीवर ‘पुरोगामी’ म्हणविणार्‍या नेत्यांकडून, जहाल मुस्लीम संघटनांकडून टीका झाल्यावाचून राहणार नाही. टीका झाली तरही राज्यपालांनी नक्कीच एक चांगली कृती केली असे म्हणता येईल. राज्यपाल अरिफ महंमद खान यांनी असे नेमके काय केले, याची उत्सुकता आपण सर्वांना लागली असेल. राज्यपाल अरिफ महंमद खान यांनी नुकतीच केरळमधील सुप्रसिद्ध शबरीमला मंदिरास भेट दिली आणि अयप्पास्वामींचे दर्शन घेतले!
 
 
 
राज्यपाल अरिफ महंमद खान हे कालच्या रविवारी शबरीमला मंदिरास भेट देण्यास गेले होते. शबरीमला मंदिराकडे जाण्यापूर्वी राज्यपाल खान यांनी पम्पा गणपती मंदिरामध्ये जाऊन, शबरीमला भक्त ‘इरुमुडी’ या नावाने ओळखली जाणारी धार्मिक सामग्रीने भरलेली जी पोतडी डोक्यावरून घेऊन जातात, तशी इरुमुडी त्यांनी डोक्यावर घेतली. तेथून स्वामी अयप्पा मार्गाने ते चालत सन्निधामकडे पायी मार्गस्थ झाले. राज्यपाल अरिफ महंमद खान यांचे ‘त्रावणकोर देवसोम बोर्डा’च्या पदाधिकार्‍यांनी स्वागत केले. सन्निधाम येथे पोहोचल्यानंतर राज्यपालांनी काही धार्मिक विधी केले आणि अयप्पा मंदिराच्या पवित्र १८ पायर्‍या चढून ते वर गेले आणि त्यांनी अयप्पास्वामींचे दर्शन घेतले! म्हटले तर ही घटना तशी छोटी; पण या घटनेमुळे राज्यपालांनी समाजापुढे एक आदर्श घालून दिला असे म्हणता येईल. राज्यपालांसमवेत त्यांचा धाकटा मुलगा कबीर महंमद खान हाही होता. शबरीमला मंदिरास भेट देऊन राज्यपाल खान यांनी समाजापुढे एक चांगला आदर्श घालून दिला, असे म्हणता येईल.
 
 
केरळमध्ये सध्या डाव्या आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. २ मेनंतर त्या राज्यात कोणत्या आघाडीचे सरकार येते, त्याची जनतेला प्रतीक्षा आहे. राज्यपाल अरिफ महंमद खान यांनी केरळमधील विधानसभा निवडणुकांसाठीचे मतदान पार पडल्यानंतर शबरीमला मंदिरास भेट दिली. राज्यपालांनी काही काळ आधी ही कृती केली असती, तर त्यावरून किती आरडाओरडा झाला असता!
 
 
‘भारतास हिंदूराष्ट्र घोषित करावे’
 
 
राज्यपाल अरिफ महंमद खान यांच्या या कृतीमुळे असंख्य लोकांना नक्कीच आनंद झाला असणार! केरळमध्ये अशीच एक विधायक मागणी पुढे आली आहे. ती मागणी विद्यमान स्थितीमध्ये उचलून धरली जाण्याची शक्यता नसली तरी अशी मागणी करणार्‍या या लोकप्रतिनिधींचे कौतुक करायला हवे! ही मागणी केली आहे, त्या राज्यातील अपक्ष आमदार पी. सी. जॉर्ज यांनी. त्यामुळे या मागणीस आणखी महत्त्व आले आहे. एखाद्या हिंदू नेत्याने अशी मागणी केली असती तर ते समजू शकले असते. पण, जॉर्ज या ख्रिस्ती आमदाराने अशी मागणी केल्याचे आश्चर्य वाटते! काय केली पी. सी. जॉर्ज यांनी मागणी?
 
 
एका कार्यक्रमामध्ये बोलताना, जॉर्ज यांनी भारतास ‘हिंदूराष्ट्र’ म्हणून घोषित करावे, अशी मागणी केली आहे. ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधतेला आळा घालण्यासाठी असे पाऊल उचलायला हवे, असे त्यांचे म्हणणे आहे. भारत हे २०३० पर्यंत मुस्लीम राष्ट्र व्हावे, या हेतूने विरोधी पक्षांनी धर्मांध मुस्लीम संघटनांशी हातमिळवणी केली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. जॉर्ज यांनी आणखी एक मुद्दा मांडला. नोटाबंदी केल्यामुळे राष्ट्रविरोधी शक्तींच्या कारवायांना खीळ बसली, असे मत त्यांनी मांडले आहे. राज्यघटनेत केलेला धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख आणि सध्या दिसून येत असलेली धर्मनिरपेक्षता यात महदंतर असल्याचे भाष्य त्यांनी केले आहे. आमदार पी. सी. जॉर्ज यांनी खरोखरच जे वक्तव्य केले आहे , ते धाडसी मानावे लागेल. पण, देशातील एकंदरीत परिस्थितीचे, केरळमधील परिस्थितीचे अवलोकन केल्यानंतर त्यांचे असे मत बनले आहे. जॉर्ज यांना अलीकडेच असा जो साक्षात्कार झाला आहे, तशी सद्बुद्धी सर्वांनाच झाल्यास भारत ‘हिंदूराष्ट्र’ असल्याचे घोषित करण्यास विलंब लागणार नाही!
 
 
तामिळनाडूमध्ये विवेकानंद आश्रमाची नासधूस
 
 
 
ज्या तामिळनाडू राज्यामध्ये विवेकानंद शीला स्मारक डौलाने उभे आहे, त्याच तामिळनाडूमध्ये कन्याकुमारी जिल्ह्यात वेलीमलयम परिसरात असलेल्या श्री विवेकानंद आश्रमाची नासधूस करण्याचा आणि त्या आश्रमाचे पावित्र्य भंग करण्याचा प्रकार अलीकडेच घडला. सदर आश्रम हा रामकृष्ण मठाचा एक भाग असून, त्या आश्रमाची स्थापना माता शारदादेवी यांचे अनुयायी अंबिकानंद यांनी केले आहे. तामिळनाडूमध्ये गेल्या ६ एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झाले. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे, ५ एप्रिल रोजी तामिळनाडू सरकारच्या एका भरारी पथकाने त्या आश्रमावर छापा टाकला. तालुका पुरवठा अधिकारी मेरी स्टेला आणि अन्य आठ जणांनी हा छापा टाकला. छापा टाकताना आश्रमाच्या पावित्र्याचा भंग होणार नाही, याचे भानही मेरी स्टेला आणि तिच्यासमवेत आलेल्यांना राहिले नाही. या पथकाने पादत्राणांसह आश्रमाच्या परिसरात प्रवेश केला आणि तेथील अनेक वस्तूंची नासधूस केली. छापा टाकणार्‍या या भरारी पथकाच्या हाती काहीच लागले नाही. या भरारी पथकाने छापा टाकण्याची जी कृती केली त्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू मुन्ननी या संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. या घटनेसंदर्भात संघाच्या आणि हिंदू मुन्ननी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन या घटनेबद्दल तीव्र निषेध नोंदविला आणि आश्रमावर छापा टाकून त्या वास्तूचे पावित्र्य भंग करणार्‍या आणि तेथील आश्रमप्रमुखांशी आणि अन्य साधकांशी उद्धट वर्तन करणार्‍या ख्रिस्ती पुरवठा अधिकारी मेरी स्टेला आणि तिच्या सहकारी कर्मचार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तामिळनाडूमध्ये रामकृष्ण मठाच्या आश्रमावर झालेल्या या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. शासकीय सेवेतील ख्रिस्ती कर्मचारी किती मुजोरीने वागतात, याची कल्पना या उदाहरणावरून येऊ शकते!
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0