तू धैर्याची अससी मूर्ती... : वैशाली कुंभार

07 Mar 2021 20:26:15

mahila din _1  


आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगांवर धैर्याने मात करत उद्योजिका वैशाली कुंभार यांनी आज अनेक महिलांसमोर नवा आदर्शच मांडला आहे. पतीच्या निधनानंतर खचून न जाता, पतीने उभारलेले व्यवसायाचे साम्राज्य आज तितक्याच ताकदीने वैशाली सांभाळत आहेत. ’आर. के. असोसिएट्स’ या ‘आर्किटेक्ट अ‍ॅण्ड कन्सल्टिंग इंजिनिअर’ क्षेत्रातील नामांकित कंपनीच्या संचालिका वैशाली राजेश कुंभार यांनी जागतिक महिला दिनानिमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून कथन केलेला त्यांचा प्रेरणादायी प्रवास...


माझं संपूर्ण शिक्षण आणि बालपण पुण्यातलं. माझे वडील तसे मूळचे सोलापूरचे. मात्र, नोकरीच्या निमित्ताने ते पुण्यात स्थायिक झाले. पुढे भिवंडी येथे वास्तव्यास असणार्‍या राजेश कुंभार यांच्याशी विवाह झाल्यानंतर मी मुंबईकर झाले. १९९५ साली माझे पती राजेश कुंभार यांनी ‘आर. के. असोसिएट्स’ ही कंपनी सुरू करत बांधकाम क्षेत्रातील आमच्या या व्यवसायाचा पाया रोवला. लग्नानंतर मीदेखील त्यांना कंपनीच्या कार्यात थोडीफार मदत करे. २०११ मध्येच राजेश यांची किडनी निकामी झाल्याचे आम्हाला कळले. त्यामुळे या काळात मी राजेश यांना त्याच्या कामात मदत करत असे. दिवसभरात एक तास-दोन तास जसा वेळ मिळेल तसे मी त्यांच्याकडून व्यवसायातील बारकावे शिकून घेतले. माझं पदवीपर्यंतच शिक्षण वाणिज्य शाखेतून झालेलं आहे, तर पदव्युत्तर शिक्षण संगणकशास्त्रात झालं. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे, मला शालेय शिक्षण घेत असतानाच स्थापत्त्य क्षेत्रातच करिअर करण्याची इच्छा होती. मात्र, घरची परिस्थिती बेताची असल्याने मला घरून या क्षेत्रातील शिक्षण घेण्याची परवानगी मिळाली नाही. घरची आर्थिक परिस्थिती पाहता, मला दहावीनंतर लगेचच नोकरीच्या शोधात बाहेर पडावे लागले. कारण, नोकरी करून स्वतःच्या पैशांवरच पुढचे शिक्षण घ्यावे लागणार होते. अशारितीने मी नोकरी करत माझे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. मात्र, २०१६मध्ये माझे पती राजेश कुंभार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर व्यवसायाची पूर्ण जबाबदारी माझ्यावर आली. त्यावेळी आमचे एकूण ४० प्रकल्प सुरू होते.



भिवंडी भागात बांधकाम क्षेत्रात आमची कंपनी नावाजलेली आणि विश्वसनीय आहे. त्यामुळे ग्राहकांचा तो विश्वास आम्हाला कायम जपायचा होता. त्याअनुषंगानेच मी मनाशी निश्चय केला की, हा व्यवसाय आपण राजेश यांच्या पश्चातसुद्धा तेवढ्याच हिंमतीने पुढे सुरू ठेवायचा. राजेश यांच्या निधनानंतर तिसर्‍याच दिवसापासून मी पूर्णवेळ कार्यालयाचा पदभार स्वीकारला. अजूनही पुरुषप्रधान संस्कृती असणार्‍या भिवंडीमध्ये या क्षेत्रात काम करणारी मी एकमेव महिला असल्याने मला खूप मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागले. यावेळी मला खूप वाईट अनुभदेखील आले. या काळात ठाणे येथील काही बांधकाम व्यावसायिक भागीदार म्हणून सहभागी झाले आणि त्यांनीही फसवणूक केली. महिला म्हणून काही लोकांच्या घाणेरड्या नजरा, माझ्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन, एखादी महिला आपल्यापेक्षा अधिक यश संपादन कसे करू शकते, हा पुरुषी अहंकार माझ्या कार्याच्या आड येत होता. या सगळ्यांचा विचार न करता, मी माझं काम प्रामाणिकपणे करत राहिले. पती राजेश कुंभार यांची या व्यवसायातील पत इतकी मोठी होती की, त्यामुळे मला उभे राहायला व शिकून घेण्याच्या प्रक्रियेत मोठे सहकार्य मिळाले.


मध्यंतरीच्या काळात ‘नोटाबंदी’, ‘रेरा’, ‘लॉकडाऊन’ यांसारख्या गोष्टींमुळे बांधकाम व्यवसाय क्षेत्रासमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. मात्र, या काळातही सर्वच ग्राहकांनी व माझ्या कर्मचार्‍यांनी माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला. पूर्वीपेक्षा आज अधिक कर्मचारी माझ्याकडे कार्यरत आहेत. यात तीन ‘आर्किटेक्ट’, दोन अभियंते अशी एकूण दहा जणांची ‘टीम’ माझ्यासोबत आज कार्यरत आहे. व्यवसायात यश संपादन करणे आज मला शक्य झाले, ते केवळ माझ्या कुटुंबीयांमुळे आणि पती राजेश यांनी माझ्यावर कायम दाखवलेल्या विश्वासामुळे! राजेश यांचे निधन झाले तेव्हा माझा मुलगा १५ वर्षांचा होता. म्हणजे नुकतीच तो दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. आज तो पुण्यात शिकतो आहे. पुढच्या वर्षी तो उच्च शिक्षणासाठी परदेशात जाईल. तो माझ्या पाठीशी कायम उभा होता. माझ्या कुटुंबातील इतर सदस्य सासू, आई, माझे व्यवसायातील भागीदार जितेंद्र कर्डिले व अब्दुल माजिद, तसेच सर्व कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याशिवाय मला हे यश संपादन करणे शक्यच नव्हते.



माझ्या आजपर्यंतच्या अनुभवावरून महिलांना एवढचं सांगू इच्छिते, कोणतेही क्षेत्र असू दे, एक महिला म्हणून आपण समाजात वावरत असताना ‘मी हे काम कसे करू किंवा मला हे जमेल का?’ हा विचार न करता पुरुषांइतक्याच ताकदीने आपण एखाद्या क्षेत्रात उतरल्यास आपल्याला नक्की यश मिळते. याचे जीवंत उदाहरण मी स्वतः आहे. माझे पती जेव्हा हा व्यवसाय सांभाळत होते, तेव्हा जे ग्राहक आमच्याशी जोडले होते, त्यापेक्षा दुपटीने ग्राहक आज आमच्याशी जोडले गेले आहेत. मी आज खूप मोठ्या बांधकाम प्रकल्पांवर काम करते आहे. ५० लाख चौ.फुटांपेक्षा अधिक प्रकल्पांवर काम झालेले आहे आणि त्यापेक्षा मोठ्या प्रकल्पांवर सध्या काम सुरु आहे. मी अनेक मोठ्या प्रकल्पांसाठीची मान्यता मिळवली आहे. प्रचंड आत्मविश्वास आणि कामाप्रति निष्ठा घेऊन जर आपण एखाद्या क्षेत्रात उतरलो, तर मला नाही वाटत की कोणत्याही क्षेत्रात महिला कमी पडतील. महिलांना एकच सांगणे आहे की, कोणत्याही क्षेत्रात ताकदीने उतरा, बघा यश तुमचंच आहे...!



-
वैशाली कुंभार
Powered By Sangraha 9.0