कोकण किनारपट्टीवर समु्द्री कासवांचा जन्मोत्सव; या किनाऱ्यांवर जन्मास आली पिल्ले

06 Mar 2021 17:14:38
sea turtle_1  H

मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
यंदाच्या सागरी कासव विणीच्या हंगामात संरक्षित करण्यात आलेल्या अंड्यांमधून पिल्लांनी डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. ही पिल्लं वाळूतून मार्गक्रमण करत समुद्रात रवाना होत आहेत. या आठवड्यात दिवेआगर, श्रीवर्धन, वेळास, मुरूड आणि वायंगणीच्या किनाऱ्यावरुन समुद्री कासवाच्या ३५० हून अधिक पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले आहे.
 
 
 
 
 
राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमधील काही किनाऱ्यांवर समुद्री कासवे अंडी घालण्यासाठी येतात. यामध्ये 'आॅलिव्ह रिडले' या प्रजातीच्या माद्यांचा समावेश असतो. रायगड जिल्ह्यातील ४, रत्नागिरीमधील १३ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३ किनाऱ्यांवर समुद्री कासवे अंडी घालतात. नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम असतो. यंदाच्या या हंगामात किनाऱ्यावर आढळलेली अंडी कासवमित्रांकडून संरक्षित करण्यात आली होती. या अंड्यांमधून आता पिल्ल बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे.
 
 
 
 
यंदाच्या हंगाातील कासवाचे पहिले घरटे रायगड जिल्ह्यात आढळले होते. त्यामुळे याठिकाणी संरक्षित केलेल्या अंड्यांमधून बाहेर आलेल्या पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले आहे. दिवेआगरमधून १०३ आणि हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावरुन कासवाची १०० पिल्ले समुद्रात सोडण्यात आल्याची माहिती श्रीवर्धनचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद राऊत यांनी दिली. रत्नागिरीतील वेळासच्या किनाऱ्यावरुन ४२ आणि मुरूडमधून ४६ पिल्लांना समुद्रात सोडल्याचे दापोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव बोराटे यांनी सांगितले. तर सिंधुदुर्गच्या वायंगणी किनाऱ्यावरुन साधारण ८७ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत. येत्या काळात या संख्येत वाढ होणार असून श्रीवर्धन,मारळ, केळशी, आंजर्ले, गावखडी, कोळथरे, दाभोळ, तांबळडेक, शिरोडा इ. किनाऱ्यांवरुन कासवाची पिल्ले समुद्रात रवाना होतील.


कासव उपचार केंद्रास मान्यता
सिंधुदुर्गातील तोंडवली किनाऱ्यानजीक बांधण्यात येणारे समुद्री कासव उपचार केंद्राला 'सागरी नियमन क्षेत्रा'ची (सीआरझेड) परवानगी मिळाली आहे. महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीस हे उपचार केंद्र उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. पर्यावरण पूरक साहित्यांचा वापर करुन या केंद्राचे बांधकाम करण्याच्या सूचना देण्यात आली आहे. १,९२५ चौरस फूट जागेवर हे केंद्र बांधण्यात येणार असून त्यामध्ये शस्त्रक्रिया विभाग आणि ३० कासवांना ठेवण्याची सुविधा असेल.
 
 
Powered By Sangraha 9.0