मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘वक्ता दशलक्षेषु’ आहेत, त्यांच्यासारखे भाषण तेच करू शकतात. ‘वक्ता दशलक्षेषु’ होण्यासाठी याची काही गरज नसते. बोलायला उभं राहायचं आणि ऐकणार्यांना टाळ्या पिटायला लावेपर्यंत बोलायचे, यालादेखील एक कलाकारी लागते. मुख्यमंत्री चांगले फोटोग्राफर आहेत, एवढी एक कला तरी त्यांच्याकडे आहे. या कलेत त्यांनी जबरदस्त भाषण करण्याची कला आत्मसात केली आहे. असे मुख्यमंत्री लाभले हे आपले केवढे भाग्य!
माझे मित्र सुखदेव नवले यांचा एक आवडता शब्दप्रयोग आहे, एखादी गोष्ट त्यांना आवडली, म्हणजे जेवण आवडले, लेख आवडला किंवा भाषण आवडले तर ते म्हणतात, “काहीच्या बाईच झालं!” त्यांची आठवण होण्याचे कारण असे की, महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी दि. ३ मार्च रोजी राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना जे भाषण केले, ते नवलेंच्या शब्दात सांगायचे तर ‘काहीच्या बाईच झालं!’
‘वक्ता दशसहस्रेषु असा एक वाक्यप्रयोग आहे. अर्थात, बोलतात सगळे; पण दहा हजारांत एखादाच वक्ता असतो. आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, बाळशास्त्री हरदास, नरहर कुरंदकर, शिवाजीराव भोसले, प्राचार्य शेवाळकर इत्यादी वक्ते हे ‘वक्ता दशसहस्रेषुु या प्रकारात मोडणारे होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ही उक्ती लागू होत नाही. कारण, ते ‘वक्ता दशलक्षेषु’ आहेत, त्यांच्यासारखे भाषण तेच करू शकतात. वर ज्या वक्त्यांची नावे दिली आहेत, ते साहित्यसम्राट होते, शब्दप्रभू होते आणि विचारक होते. ‘वक्ता दशलक्षेषु’ होण्यासाठी याची काही गरज नसते. बोलायला उभं राहायचं आणि ऐकणार्यांना टाळ्या पिटायला लावेपर्यंत बोलायचे, यालादेखील एक कलाकारी लागते. मुख्यमंत्री चांगले फोटोग्राफर आहेत, एवढी एक कला तरी त्यांच्याकडे आहे. या कलेत त्यांनी जबरदस्त भाषण करण्याची कला आत्मसात केली आहे. असे मुख्यमंत्री लाभले हे आपले केवढे भाग्य!
या भाग्याचा गर्व करण्याऐवजी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी मुख्यमंत्र्यांची उणीदुणीच दाखवित राहतात. त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उपस्थित करतात. कोरोना महामारी, शेतकर्यांची दैनावस्था, पिकांवर पडलेली कीड, वीजतोडणी, अवकाळी पाऊस, त्यात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती, एक ना अनेक प्रश्न. असे प्रश्न विचारून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून उत्तरांची अपेक्षा करतात, बरे झाले! उद्धवजींनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही.
प्रश्नांची उत्तरे द्यायला ते काही शाळकरी मुलगा आहेत काय? आणि देवेंद्र फडणवीस आणि मुनगंटीवार, तसेच लोढा हे काही मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आहेत काय? आपले लाडके मुख्यमंत्री प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मुख्यमंत्री झालेले नाहीत. त्यांनीच अनेक वेळा सांगितले आहे की, ‘मी शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिले होते की, ठाकरे कुटुंबातील कोणाला तरी मी मुख्यमंत्री करीन.’ एक दावेदार होता, तो बाहेर गेला. दुसरा वयाने खूप लहान, मग नाइलाजाने उद्धवजींनाच मुख्यमंत्री व्हावे लागले. वडिलांना दिलेले वचन कसे मोडायचे? ‘पितृवचना लागे रामे वनवास केला’, ही आपली परंपरा आहे. म्हणून वडिलांना दिलेल्या वचनाचे पालन झालेच पााहिजे, त्यासाठी २५ वर्षांची युती खड्ड्यात गेली तरी चालेल. ‘असंगाशी संग’ करावा लागला तरी चालेल. परंतु ‘प्राण जाये पण वचन न जाय’, याचे पालन उद्धवजींनी केले आहे.
त्यांचा आदर-सत्कार करायचा सोडून देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी किती तोफा डागतात! प्रश्नांची किती सरबत्ती करतात, बरे झाले उद्धवजींनी त्यांना ‘घणाघाती’ उत्तर दिले. (घणाघात, हा शब्द ‘सामना’चा!) आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत. पण, त्यांना देशाची चिंता भारी. प्रश्न महाराष्ट्राचे आहेत. पण, देशाचे प्रश्न त्यांना त्याहून महत्त्वाचे वाटतात. ‘हा देश कुणाचीही खासगी मालमत्ता नाही’, किती सुंदर वाक्य आहे, टाळ्या पडल्याच पाहिजेत. महाराष्ट्राचं वाटोळं होतंय, शेतकरी मरतोय, कोरोना विळखा घालतोय, यापेक्षा मोदींनी थाळी वाजवायला सांगितली हा विषय महत्त्वाचा, दिल्लीत शेतकरी आंदोलन करतात, २६ जानेवारीला त्यांनी हिंसाचार केला, त्यांच्या मार्गावर खिळे ठोकणे, उद्धवजींना आवडलेले नाही. इकडे अकोला, विदर्भात बोंडअळीमुळे शेतकर्यांचे भयंकर नुकसान झाले, चालायचेचं. अळी काय खिळ्यासारखी असते. खिळे कारखान्यात तयार होतात आणि अळी निसर्गात तयार होते, त्यामुळे अळीच्या प्रश्नावर ‘आळी मिळी गुपचिळी!’
महाराष्ट्राच्या प्रश्नांवरून आपले लाडके मुख्यमंत्री एकदम ‘आरएसएस’वर कधी घसरले कळलेच नाही. ते म्हणाले की, “ ‘आरएसएस’ तुमची मातृसंस्था आहे, ती कधीही स्वातंत्र्यलढ्यात नव्हती.” देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हाच त्यांना उत्तर दिले. आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी फडणवीस-ठाकरे वादात संघाला का ओढले? संघाला खेचणे हा काँग्रेसचा अजेंडा आहे आणि आता तर काँग्रेसबरोबर त्यांचा घरोबा आहे, मग त्यांना खूश करायला नको का? तिकडे राजपुत्र राहुल गांधी संघावर सतत काही ना काही तरी बोलत असतात. मग ज्यांच्याशी घरोबा केला आहे, त्यांच्या विषयसूचीवर बोलायला नको का? विरोधी पक्षनेत्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे होते. अखेर ‘मजबूरी का नाम उद्धव ठाकरे हैं’ पण त्यांनी असाही प्रश्न करायला पाहिजे होता की, औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रात लाखोंची फौज घेऊन आला, तेव्हा संघ कुठे होता? १९६२ साली चीनने आक्रमण केले, तेव्हा दंड घेऊन स्वयंसेवक का नाही सीमेवर गेले? पुढच्या वेळेस हे प्रश्न त्यांनी जरूर विचारावेत, अशी एक सूचना.
‘भारतमाता की जय’ म्हटल्याने देशप्रेम सिद्ध होत नाही, असे आपले लाडके मुख्यमंत्री म्हणाले. त्यात त्यांचे चुकले काय? देशप्रेम सिद्ध करण्यासाठी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, म्हणायला पाहिजे का, हे उद्धवजींनी सांगितले नाही. ते जर असे बोलले असते तर काँग्रेसीही खूश झाले असते की, ‘वंदे मातरम्’ कशाला बोलायचे? “आम्हाला कसले हिंदुत्व शिकवता”, असेही ते म्हणाले. “सावरकरांना ‘भारतरत्न’ का दिले जात नाही,” हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. “राम मंदिर उभारण्याचे श्रेय कसले घेता?” असा त्यांचा पुढचा प्रश्न आला. मूळ प्रश्न होता, “औरंगाबादचे संभाजीनगर कधी करणार?” या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ते काही शाळकरी मुलगा नव्हेत. प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी प्रतिप्रश्न करायचे. असे अनेक प्रतिप्रश्न त्यांनी केल्यामुळे अगोदर म्हटल्याप्रमाणे ते ‘वक्ता दशलक्षेषु’ झाले आहेत.
फडणवीसांना शिवसेनेविषयी हे नक्कीच माहीत आहे की, रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात शिवसेना कुठेच नव्हती. देवेंद्रजी कारसेवेला गेले होते. ‘विवेक’च्या ‘राष्ट्रजागरण’ मालिकेत त्यांचे अप्रतिम भाषण आहे. त्यांना तिथे कुणी शिवसैनिक भेटला नाही. ६ डिसेंबरला बाबरी ढाँचा जमीनदोस्त झाला. तो संतप्त कारसेवकांनी तोडला. तेव्हा १०० मैलांच्या परिघातही शिवसैनिक नव्हता. म्हणून उद्धव ठाकरे यांची रामभक्ती किती उच्च दर्जाची आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. ‘समर्पण निधी’ उपक्रमास माननीय मुख्यमंत्र्यांचे समर्थन नाही. म्हणून त्यांचे पिठ्ठू म्हणतात की, “हा खंडणी वसूल करण्याचा कार्यक्रम आहे.” खंडणी वसूल करता करता ज्यांची हयात गेली, त्यांना सर्वच ठिकाणी खंडणीच दिसू लागणार यात नवल ते काय!
बरे झाले आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी हे सर्व विषय भाषणात आणले. त्यांनी एक घोषणा दिली होती, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी.’ त्यावर कुणीतरी खट्याळ नेटकर्याने भाष्य केले होते की, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी, जनता सारी झकमारी’ अशा प्रकारचे कमेंट करणं आणि तेही लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर, हे नेटकर्यांना शोभत नाही. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे जर आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या परिवारापुरते तंतोतंत पाळले असले, तर त्यावर टीका कशाला करता? त्यांचा आदर्श गिरविला पाहिजे आणि आताही त्यांनी ‘मी जबाबदार’ ही घोषणा दिली आहे. पुन्हा एखादा नेटकरी त्यावर काहीतरी कमेंट टाकेल. तो म्हणेल, “महाराष्ट्राच्या विकासाला, आरोग्याला, रोजगाराला सोडून, मी सगळ्या देशाला जबाबदार आहे.”
महाराष्ट्रात काय चालले आहे, याची चिंता देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्यांनी करावी. आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी आपल्यापुरता एक विषय निश्चित केला आहे, तो विषय आहे, काहीही करून नरेंद्र मोदी शासनावर संधी मिळाली, तर संधी निर्माण करून, संधी खेचून आणून घणाघाती टीका करीत राहायचे. ‘मराठी भिकारी आहे का’, ‘आम्ही कटोरा घेऊन दिल्लीच्या दारात उभे आहोत का’, ‘चीनची घुसखोरी चालू आहे’, ‘अहमदाबादच्या स्टेडियमचे नरेंद्र मोदी नामकरण झालेले आहे’, असे सगळे विषय ‘मी जबाबदार’ या सगळ्या घोषणेत येतात. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्यांनी थोड्या सहानुभूतीने आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचा विचार केला पााहिजे. त्यांना हे का समजत नाही की, लोकांना सांगण्यासारखे, आश्वासन देण्यासारखे, त्यांचा पुरुषार्थ जागवेल असे काही सांगण्यासारखे नसल्यामुळे, संघ, मोदी, दिल्ली, बंगाल, चीन, बिहारचे नितीशकुमार, हे सर्व विषय महत्त्वाचे ठरतात. कोरोनामुळे सध्या प्रवासावर खूप बंधने आहेत. पण, आपले लाडके मुख्यमंत्री चीन सीमेपासून बंगालच्या उपासागरापर्यंत आणि बिहारपासून ते बारामतीपर्यंत सर्वत्र फेरफटका आपल्याला मारून आणतात.
म्हणून त्यांचे भाषण दहा लाखांत एक भाषण म्हटले पाहिजे. असे भाषण करायला हिंमत लागते. घणाघाती टोले मारण्यासाठी इकडून-तिकडून माहिती गोळा करावी लागते. कोणत्याही प्रश्नाला कसलेही उत्तर न देता ज्या प्रश्नांशी मुंबईतील, पुण्यातील, औरंगाबादमधील किंवा नागपूरमधील माणसाशी काहीही संबंध नाही, असले प्रश्न उपस्थित करण्यासाठीदेखील हिंमत लागते. देवेंद्र फडणवीस यांनी मनाची तयारी करून ठेवायला पाहिजे की, आता जर त्यांनी आणखी काही प्रश्न विचारले तर उद्धवजी ठाकरे त्यांना आंतरराष्ट्रीय पर्यटन घडवून आणतील. ते म्हणतील, हाँगकाँग-तैवान, फिलिपाइन्स या सामरिक क्षेत्रात मोदी काय करत आहेत? रशियाची युरोपमध्ये लुडबुड चालू आहे? मोदींनी काय केले? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रम्पची धोरणे बदलायला सुरुवात केली आहे, ट्रम्पच्या समर्थनार्थ मोदी का गेले नाहीत? या प्रश्नांची उत्तरे आपले लाडके मुख्यमंत्री मागतील, तेव्हा तयारी ठेवा. प्रश्न तुम्हालाच विचारता येतात असे नाही, प्रश्न मीदेखील उपस्थित करू शकतो, असे आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी सिद्ध केलेले आहे, हे लक्षात ठेवलेले बरे!