चीनच्या सायबर हल्ल्यांचा वाढता धोका आणि उपाययोजना

06 Mar 2021 22:03:16

cchina_1  H x W




जसा ‘सर्जिकल स्ट्राईक’ आपण काश्मीरमध्ये केला होता, अशाच प्रकारचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ सायबर लढाईमध्ये चीनवर वेळोवेळी करण्याची गरज आहे. त्यांना हे दाखवून देणे महत्त्वाचे आहे की, जर तुम्ही आमच्यावर हल्ला करून आमच्या ‘क्रिटिकल इन्फॉर्मेशन अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर’ला धोका निर्माण केला, तर त्यापेक्षासुद्धा मोठा धोका आम्ही तुमच्या ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ला निर्माण करून तुमचेसुद्धा नुकसान करू शकतो, म्हणून असा हल्ला करायची हिंमत करू नका.
 
चीनचे भारतावर ४० हजार सायबर हल्ले
 
चीनने लडाखमध्ये भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्यानंतर गलवान खोर्‍यात संघर्ष झाला होता. त्यानंतर चीनने भारतावर सायबर हल्ले करण्यास सुरुवात झाली होती, असे वृत्त ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने दिले आहे. त्यांचा मुख्य उद्देश होता भारताला एक इशारा देणे की, तुम्ही जर लडाखमध्ये आक्रमकता दाखवली, तर आम्ही सायबर हल्ले करून पूर्ण भारतात वीजपुरवठा खंडित करु आणि तुमच्या आर्थिक व्यवस्थेला मोठा धक्का देऊ. अर्थात हे स्पष्ट आहे की, या धमकीचा काही उपयोग झाला नाही.
 
लडाखमध्ये तणाव सुरू असताना चिनी हॅकर्सकडून भारतावर सायबर हल्ल्यांची संख्याही वाढवण्यात आली. भारतासाठी महत्त्वाची असणारी दहा क्षेत्र, संस्था, कंपन्यांची निवड हॅकर्सने केली. यामध्ये चार ते पाच विभाग हे ‘लोड डिस्पॅच सेंटर’शी निगडित आहेत. त्याशिवाय भारताची दोन बंदरही चिनी हॅकर्सच्या निशाण्यावर होती. संपूर्ण भारतातील वीजपुरवठा खंडित करण्याचा डाव चिनी हॅकर्सचा होता. चिनी हॅकर्सने तब्बल ४० हजार ५०० वेळा सायबर हल्ले केले होते. गलवान खोर्‍यातील संघर्षानंतर चिनी हॅकर्सने चिनी मालवेअरने भारतात वीजपुरवठा नियंत्रित करणार्‍या प्रणालीत घुसखोरी केली. चीनशी निगडित असलेल्या ‘रेडइको’ने भारतातील विद्युत यंत्रणेत मालवेअर प्लांट केले. त्याशिवाय भारताची अतिशय संवेदनशील राष्ट्रीय पायाभूत सुविधाही चिनी हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. सिस्टीम हॅक करण्यासाठी चिनी हॅकर्स अतिशय अत्याधुनिक व्हायरसचा वापर करत आहे.
 
हॅकर्सने २०२० वर्षात सायबर हल्ले केले तीव्र
 
 
ऑनलाईन धोक्याबाबत विश्लेषण करणारी कंपनी ‘रेकॉर्डेड फ्यूचर’ने चिनी मालवेअरचा शोध घेतला आहे. अद्याप अधिक मालवेअर सक्रिय करण्यात आले नाहीत, असे आढळून आले आहे. चीन सरकारचा पाठिंबा असलेल्या या सायबर हॅकर्सने २०२० या वर्षाच्या सुरुवातील सायबर हल्ले तीव्र केले होते.
 
‘महाराष्ट्र सायबर क्राईम’ने ‘सुपरवायझरी कंट्रोल डाटा ट्रान्समिशन सिस्टीम’बाबत विश्लेषण केले आहे. त्यात त्यांनी यात ‘व्हायरस’ घुसवण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो, अशी शक्यता वर्तवली.१४ ‘ट्रोजन हॉर्सेस’ या सर्व्हिसमध्ये टाकण्यात आल्याचा पुरावा मिळाला आहे. तसेच आठ जीबी डाटा हा परदेशी कंपनीने ‘एमएसईबी’च्या सर्व्हरमध्ये ‘ट्रान्सफर’ केलेला असू शकतो, असे ‘सायबर क्राईम’ने म्हटले आहे. तसेच काळ्या यादीतील ‘इंटरनेट प्रोटोकॉल अ‍ॅड्रेस’च्या (आयपीए) माध्यमातून ‘एमएसईबी’च्या सर्व्हरमध्ये लॉगीन करण्याचा प्रयत्न झालेला असावा, असेही ‘सायबर क्राईम’च्या अहवालात म्हटले आहे.
 
वाढते सायबर धोके
 
 
अलीकडेच भारतीय संरक्षण दलांवर सायबर हल्ला झाला. या घटनेनंतर लष्कराने आपत्कालीन अलर्ट जारी केला. ‘संरक्षण दलांकडून नोटीस’ असे शीर्षक असलेला कोणताही मेल ओपन करू नये, असे या अलर्टमध्ये म्हटले आहे. लष्करी जवानांना एक ई-मेल पाठविण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. ‘नोटीस’ असा उल्लेख ई-मेलच्या शीर्षकात आहे. भारताच्या महत्त्वाच्या पायाभूत संरचनेवर होणारे सायबर हल्ले मुख्यत्वे चिनी किंवा पाकिस्तानी हॅकर्सकडून केले जातात. लष्कराने आपल्या सायबर शाखेला ‘अलर्ट’ राहण्यास सांगितले आहे. लष्करी दलांसाठी एक खास संरक्षण सायबर एजन्सी (डीसीए) तयार आहे. सैन्यदले आणि त्यांच्याशी संबंधित मुद्द्यांवरच ही यंत्रणा लक्ष केंद्रित करेल. या विभागाचे मुख्य काम पाकिस्तान आणि चीनकडून वाढत असलेल्या सायबर हल्ल्यांचा प्रतिकार करणे, हेच असेल.
 
१२ ऑक्टोबर, २०२० ला झालेल्या हल्ल्याचे वृत्त १ फेब्रुवारी, २०२१ का?
 
गलवान खोर्‍यामध्ये रक्तबंबाळ झाल्यानंतर चीन भारतावर चालवलेले ‘हायब्रीड वॉर’ अजून तीव्र करेल यामध्ये काहीच आश्चर्यजनक नाही. चीन सायबर हल्ले करू शकतो, हेसुद्धा सगळ्यांनाच माहिती आहे. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, १२ ऑक्टोबर, २०२०ला झालेल्या हल्ल्याचे वृत्त १ फेब्रुवारी, २०२१ला कसे प्रकाशित होते? ‘न्यूयॉर्क टाईम्स’सारखी मोठी वर्तमानपत्रे ज्या वेळेला असा लेख लिहितात, त्या वेळेला भारतातली मीडिया त्यांच्याकडे जास्त लक्ष देते. खरे म्हटले तर हा ‘सायबर वॉर’पेक्षा मानसिक युद्ध म्हणजे ‘प्रपोगंडा वॉर’चा प्रकार आहे. ही बातमी भारतावर ‘प्रपोगंडा वॉर’ करण्यासाठी चीनने ‘न्यूयॉर्क
टाईम्स’मध्ये प्रकाशित केली का? या लेखात असे सांगण्यात आले आहे की, ‘भारतात मुंबईवर झालेल्या सायबर हल्ल्याचा शोध एका अमेरिकन कंपनीने लावला.’ हे सत्य आहे का? अशा हल्ल्यांचा शोध लावायला आपल्याला अमेरिकेच्या संस्थेची मदत जरुरी आहे का? तर त्याचे उत्तर आहे, अजिबात नाही.
 
‘नॅशनल क्रिटिकल इन्फॉर्मेशन अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटर’चे काम
 
भारताची ‘नॅशनल टेक्नोलॉजी रिसर्च ऑर्गनायझेशन’(एनटीआरओ) ही तंत्रज्ञानाच्या मदतीने गुप्तहेर माहिती काढणारी महत्त्वाची संस्था आहे. तिच्या अंतर्गत भारताच्या दोन संस्था ‘नॅशनल क्रिटिकल इन्फॉर्मेशन अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटर(National Critical Information Infrastructure Protection Centre) आणि म्हणजे ‘सायबर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम,’ (सीईआरटी) सायबर हल्ल्यांवर किंवा हॅकिंग हल्ल्यावर लक्ष ठेवून असतात.
 
 
‘नॅशनल क्रिटिकल इन्फॉर्मेशन अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटर’ ही संस्था देशातील राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या संस्थांच्या ‘सायबर नेटवर्क’चे रक्षण करते. वेळोवेळी या संस्थांचे सुरक्षा ऑडिट करते आणि संस्थांमध्ये असलेल्या त्रुटी या त्यांना सांगितल्या जातात. याशिवाय योग्य वेळी जसा दहशतवादी हल्ल्याचा इशारा मिळतो, असाच सायबर हल्ल्यांचा इशारा दिला जातो आणि सुरक्षेची पातळी अजून जास्त वाढवली जाते. या संस्थेला भारताच्या ‘क्रिटिकल इन्फॉर्मेशन अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर’चे रक्षण करण्यामध्ये बर्‍यापैकी यश मिळाले आहे.
 
‘कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’चे काम
 
 
मात्र, ज्या वेळेला चीन किंवा पाकिस्तान सायबर हल्ला करण्यामध्ये यश मिळवतात, त्यावेळेला दुसरी संस्था म्हणजे ‘कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ ही लगेच कारवाई करते आणि जशी सैन्याची ‘क्विक रिअ‍ॅक्शन टीम’ दहशतवादी हल्ल्याला लगेच प्रत्युत्तर देते, तसेच काम ही टीम करते. यांचा ‘रिस्पॉन्स’ किंवा प्रतिक्रिया ही अतिशय वेगवान किंवा तत्काळ असते. कारण, शत्रूचा हल्ला काही सेकंदांमध्ये केला जातो, म्हणूनच यांना सदैव तयार राहावे लागते.
 
 
‘व्हर्च्युअल’ दहशतवाद, घुसखोरी, गोपनीय माहिती लीक होण्याच्या घटना
 
आपल्या पंतप्रधान कार्यालयापासून संरक्षण, परराष्ट्र मंत्रालय, भारतीय दूतावास, क्षेपणास्त्र प्रणाली, ‘एनआयसी’, एवढेच नव्हे, तर ‘सीबीआय’सारख्या गुप्तचर संस्थांपर्यंत सर्व ठिकाणी असलेल्या संगणकांवर सायबर हल्ले करण्यात आले असून, नजर ठेवण्याचे प्रकार घडले आहेत. ‘व्हर्च्युअल’ दहशतवाद, घुसखोरी तसेच लष्करीदृष्ट्या गोपनीय माहिती लीक होण्याच्या घटनांवरून असे दिसून येते की, इंटरनेटच्या मायाजालात लपलेल्यांना आवर घालण्यात अपयश आले, तर त्याची मोठी किंमत मोजावी लागते.
 
 
स्वतःचे सदैव रक्षण करणे हे फार मोठे आव्हान
 
यापुढील निर्णायक युद्ध हे सायबर युद्ध असेल. कारण, देशाची सर्व प्रकारची माहिती आज संगणकांमध्येच एकत्रित केलेली असते. सायबर क्षेत्रांमध्ये रोज काहीतरी नवनवीन संशोधन केले जाते, म्हणूनच आपल्याला जसे अ‍ॅण्टिव्हायरस’वर रोजच संशोधन करून आपल्या संगणकाची सुरक्षा करावी लागते, तशीच कामगिरी या संस्था करत असतात. चीन भारतावरती हल्ले करण्याकरिता रोजच नवनवीन प्रकारांचा वापर करतो आणि आपण आपले रक्षण करण्याचा प्रयत्न करतो. परंतु, कुठल्याही रक्षा पद्धतीला स्वतःचे सदैव रक्षण करणे हे फार मोठे आव्हान असते.
 
म्हणूनच, जसा ‘सर्जिकल स्ट्राईक’ आपण काश्मीरमध्ये केला होता, अशाच प्रकारचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ सायबर लढाईमध्ये चीनवर वेळोवेळी करण्याची गरज आहे. त्यांना हे दाखवून देणे महत्त्वाचे आहे की, जर तुम्ही आमच्यावर हल्ला करून आमच्या ‘क्रिटिकल इन्फॉर्मेशन अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर’ला धोका निर्माण केला, तर त्यापेक्षासुद्धा मोठा धोका आम्ही तुमच्या ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ला निर्माण करून तुमचेसुद्धा नुकसान करू शकतो, म्हणून असा हल्ला करायची हिंमत करू नका. कारण, जसे आम्हाला आमच्या ‘इन्फ्रास्ट्रक्चर’चे रक्षण सदैव करणे हे अशक्य असते, तसेच आव्हान तुम्हाला पण आहे, म्हणूनच आक्रमक ‘सर्जिकल सायबर स्ट्राईक’ चीनला जशास तसे उत्तर देण्याकरिता वेळोवेळी वापरले गेले पाहिजे.



Powered By Sangraha 9.0