महातिघाडी सरकारच्या कार्यकाळात कट्टरपंथीयांच्या ‘मालवणी पॅटर्न’मुळे अनेक हिंदूंना घरदार सोडून पलायन करावे लागले. असेच सुरू राहिले तर मुंबईतील अनेक भाग हिंदूविहीन होऊ शकतात आणि तसे होऊ नये, म्हणूनच मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारला जाब विचारत डरकाळी फोडली.
"मुंबईच्या मालवणीत हिंदू अल्पसंख्य होत असून ‘मालवणी पॅटर्न’मुळे तशीच अवस्था मानखुर्द, चेंबुर, मुंब्रा आणि नंतर संपूर्ण मुंबई महानगराचीही होऊ शकते. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी ‘कलम ३७०’ रद्द करून काश्मीर खोऱ्यात हिंदू पंडितांना वसवण्याचे काम सुरू केले, त्याचप्रकारे आम्ही मालाड-मालवणी परिसरातून पलायन केलेल्या हिंदूंनाही पुन्हा वसवू आणि इथला ‘मालवणी पॅटर्न’, इथला ‘राजकीय पॅटर्न’ बदलू,” अशा शब्दांत मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे आमदार व मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी विधानसभेत डरकाळी फोडली. दरम्यान, मंगलप्रभात लोढा मालवणीतील हिंदूंच्या पलायनाचा विषय मांडतेवेळीच मुंबईचे पालकमंत्री व मालाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अस्लम शेख यांनी सातत्याने व्यत्यय आणण्याचे काम केले. त्या अडथळ्यामुळेच मंगलप्रभात लोढा यांनी अतिशय संतप्त होत अस्लम शेख यांना प्रत्युत्तर दिले आणि याचवेळी मंगलप्रभात लोढा यांचे निराळे आक्रमक रूप आपल्याला पाहायला मिळाले. वस्तुतः एक यशस्वी व्यावसायिक व गेली कित्येक वर्षे अनेक राजकीय उलथापालथीत महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचणारे व्यक्तिमत्त्व म्हणून आमदार मंगलप्रभात लोढा यांना संपूर्ण देश ओळखतो. तथापि, इतक्या मोठ्या राजकीय व व्यावसायिक यशानंतरही मंगलप्रभात लोढा ओळखले जातात ते त्यांच्या मितभाषी स्वभावामुळे व विनम्र मांडणीमुळे. असा सात्त्विक लौकिक असलेला माणूस जेव्हा इतका आक्रमक होतो आणि जनसामान्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विधानसभेत गर्जना करतो, तेव्हाच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या हातमिळवणीने महातिघाडी सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रातील हिंदूंची स्थिती किती बिकट झाली असेल, हे कळते.
देशात अपवाद वगळता सातत्याने आणि २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे काँग्रेसच्याच नेतृत्वातील सरकार होते, तर विविध राज्यांतही काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावी आघाडी, अशांची सरकारे होती. त्याच काळात आसाम व पश्चिम बंगालमधील हिंदूबहुल क्षेत्रांचे हिंदू विहिनीकरण सुरू झाले. बांगलादेश आणि म्यानमारमधील घुसखोर मुस्लिमांना ठिकठिकाणी वसवून त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली, तर तिथल्या स्थानिक हिंदूंना दहशतीच्या माध्यमातून पलायनासाठी अगतिक केले गेले. काश्मीर खोऱ्यातही असेच झाले व लाखो काश्मिरी हिंदूंना आपली घरेदारे सोडून परागंदा व्हावे लागले. उत्तर प्रदेशातील कैरानातही त्याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली व आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात-मुंबईत-मालवणीतही मुस्लीम कट्टरपंथीयांच्या धमक्या, दमबाजी, अवैध बांधकामे, फ्लॅट जिहादमुळे तोच प्रकार होताना दिसतो. मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या भाषणावेळी या सगळ्याचा दाखला दिला आणि मालवणीत हिंदूंचे दमन पोलिसी व सामाजिक पातळीवर कशाप्रकारे केले जात आहे, हे सोदाहरण सांगितले. गेल्या वर्षी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीस्थळी श्रीराम मंदिराचे भूमिपूजन झाले आणि त्यानंतर श्रीराम मंदिरासाठी निधी संकलन अभियानाचाही प्रारंभ झाला. पण, त्याच निधी संकलन अभियानाचे मालवणीत उभारलेले फलक थेट पोलिसांनीच फाडून टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तिथल्या हिंदूंनी त्याविरोधात दाद मागण्याचा प्रयत्न केला, तर त्या हिंदूंवरच उलटा ‘एफआयआर’ नोंदवण्यात आला. हिंदूंच्या विरोधाचा मुद्दा इथपर्यंतच मर्यादित नाही, तर मालाड-मालवणीतील मतदारयांद्यातील हिंदू मतदारांची संख्या सातत्याने कमी होत आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीवेळच्या मतदारसंख्येतील १५ हजार हिंदू मतदार कमी झाल्याचे व १२ हजार मुस्लीम मतदार वाढल्याचे चालू पंचवार्षिक निवडणुकीवेळी आढळले होते. अर्थात, हिंदूंच्या मतदारसंख्येतील घट व मुस्लिमांच्या मतदारसंख्येतील वाढ, हा आपोआप झालेला प्रकार नाही, तर त्यामागे सुनियोजित षड्यंत्र आहे. इथे बांगलादेशी व रोहिंग्यांना आणून वसवले जाते व त्यांना ड्रग्जचा व्यवसाय दिला जातो, सरकारी जमिनी बळकावू दिल्या जातात, हिंदूंची घरे, फ्लॅट कमी किमतीत लाटण्याचा प्रकार राबवला जातो आणि त्याचाच हा परिणाम असल्याचे मंगलप्रभात लोढा विधानसभेत म्हणाले.
सोबतच, मालाड-मालवणीतील छेडानगर परिसर हिंदूविहीन करण्याचा पॅटर्नही त्यांनी उलगडून सांगितला. इथे पाच वर्षांपूर्वी १०८ परिवार राहत होते व आजही तितकेच परिवार राहतात, फक्त त्यातील १०१ परिवार अहिंदू आहेत आणि केवळ सात हिंदू परिवार इथे उरलेत. कारण इथल्या खुल्या जागांवर बांगलादेशी-रोहिंग्यांनी बेकायदेशीर कब्जा केला, मशिदी उभारल्या, दिवसरात्र अजानच्या बांग दिल्या गेल्या आणि त्यांची तक्रार करणाऱ्या हिंदूंचाच आवाज दाबण्याचे उद्योग झाले. हे सांगतानाच आपण स्वतः याविरोधात केलेल्या तक्रारीचीही पोलिसांनी दखल न घेतल्याचे मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले. अर्थात, “पोलीसदेखील धर्म पाहूनच कारवाई करायची अथवा नाही, याचा निर्णय घेतात, असे यातून दिसते. मालवणीतल्याच एका गल्लीतील चाळीत एकेकाळी ५८ हिंदू दलित परिवार राहत होते. पण, आज तिथे केवळ सहा हिंदू दलित परिवार आहेत नि ५२ परिवारांना पलायन करावे लागले. कारण, चाळीतल्या रहिवाशांसाठी सामायिक स्वच्छतागृह असून तिथे अजानच्या वेळी नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या महिलांना बाहेरून कडी लावून कोंडून ठेवण्याचे संतापजनक प्रकार घडले. त्याची नोंद मालवणी पोलीस ठाण्यातही केलेली आहे. पण, कारवाई शून्यच, म्हणजेच हिंदूंनी श्रीराम मंदिराचे फलक लावायचे नाहीत, हिंदूंनी मालवणी परिसरात राहायचे नाही, हिंदूंनी अवैध बांधकाम व मशिदीविरोधात तक्रारी करायच्या नाहीत, हिंदूंनी फक्त धर्मांधांची दडपशाही, दमदाटी सहन करायची आणि आपापल्या घरादारातून जीव वाचवून परागंदा व्हायचे, असे एकंदरीत संपूर्ण परिसर हिंदूविहीन करण्याचे षड्यंत्र इथे सुरू असल्याचे स्पष्ट होते. पण, स्वतःला हिंदुत्ववादी आणि शिवाजी महाराजांचे पाईक म्हणवणारा पक्ष सत्तेत असतानाच हिंदूंची ही अवस्था असेल तर ‘मालवणी पॅटर्न’चे लोण मुंबईच्या अन्य भागात पसरायला वेळ लागणार नाही,” असे मंगलप्रभात लोढा म्हणाले. यावरही अस्लम शेख यांनी व्यत्यय आणला. पण, “आमचा आवाज थांबणार नाही, आम्ही झुकणार नाही आणि काश्मिरी हिंदूंना त्यांच्या घरी पुन्हा वसवण्याचे जे काम सुरू आहे, त्याच धर्तीवर मालाड-मालवणीतील हिंदूंनाही आम्ही न्याय देऊ. कारण महाराष्ट्र हिंदूंचा आहे, भारत हिंदूंचा आहे,” अशा भाषेत मंगलप्रभात लोढा यांनी अस्लम शेख यांना ठणकावले. हिंदुत्ववादी प्रतिमेच्या बळावर मुंबईपासून महाराष्ट्रभर वाढलेली सत्ताधारी शिवसेना मात्र या प्रकरणात निपचित पडलेली दिसते आणि या पार्श्वभूमीवर मंगलप्रभात लोढा यांच्या विधानसभेतील जाहीर भूमिकेचे नक्कीच अभिनंदन केले पाहिजे, असे वाटते.