आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून स्त्रियांचे भावविश्व कल्पकपणे उलगडणार्या नाशिकच्या चित्रकार मानसी सागर यांच्याविषयी...
काही वेळा समाजात स्त्रीबद्दल होणारा अन्याय, अत्याचार हा नेहमीच संवेदनशील मनाला त्रासदायक असाच ठरतो. आपल्या मनात निर्माण होणार्या भावना व्यक्त करण्यासाठी अनेक जण अनेकविध मार्गांचा अवलंब करतात. पण, अभिव्यक्त होण्याचे अनेक मार्ग उपलब्ध असताना आजही सर्वात प्रभावी माध्यम म्हणून आपण चित्रकलेची नोंद घेत असतो. अगदी पूर्वीपासून नव्हे तर मानवाच्या उत्क्रांतीपासून मानव हा चित्रकलेच्याच माध्यमातून व्यक्त होत आला आहे. विविध गुफा, लेणी, घुमट यांवर रेखाटण्यात आलेली चित्रे ही मानवी अभिव्यक्तीचीच आजही साक्ष देतात. नाशिक येथील चित्रकार मानसी सागर या आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून आपल्या मनातील भाव व्यक्त करतात. मुख्यत्वे स्त्रियांचे भावविश्व उलगडून दाखविण्याचे कार्य त्या आपल्या चित्रसाधनेच्या माध्यमातून करत आहेत, हे विशेष.
नाशिकरोड परिसरातील जयरामभाई हायस्कूलमध्ये कलाशिक्षिका म्हणून कार्यरत असणार्या मानसी सागर यांचे शिक्षण याच शाळेत झाले. त्यांचे वडीलदेखील कलाशिक्षक होते. वडील त्यांच्या विद्यार्थ्यांना चित्रकलेचे धडे देत, तेव्हा मानसी आपल्या वडिलांचे शिकविणे बारकाईने पाहत असे व काहीतरी रेखाटण्याचा प्रयत्न त्या करायच्या. त्यातूनच मानसी सागर या चित्रकलेच्या साधक बनल्या. इयत्ता दुसरीमध्ये असताना मानसी यांनी लोकमान्य टिळक यांचे चित्र सहज म्हणून रेखाटले. त्यानंतर त्यांच्यातील या गुणाची त्यांना व इतरांनाही खर्या अर्थाने ओळख झाली. घरात चित्रकलेचा वारसा होताच. तसेच, लहानपणीच प्रख्यात चित्रकार प्रफुल्ल सामंत यांची चित्रे पाहण्याचे सौभाग्यदेखील मानसी यांना प्राप्त झाले.
मानसशास्त्राची आवड असलेल्या मानसी यांनी ‘एटीडी’ व ‘जेडी आर्ट्स डिप्लोमा’पर्यंतचे कलासंगत शिक्षण घेतले आहे. नाशिकच्या चित्रकला महाविद्यालयातून हे शिक्षण घेत असताना कलेच्या समृद्ध जगाशी मानसी सागर यांचा खर्या अर्थाने परिचय होण्यास सुरुवात झाली. परिघाबाहेरील समृद्ध आणि प्रतिभाशाली अशा कलाकारांच्या सहवासाने मानसी सागर यांचे वैचारिक आणि कलेचे विश्व या काळात खर्या अर्थाने विस्तारत गेले. आधी नमूद केल्याप्रमाणे ‘मानसशास्त्र’ या विषयाची सागर यांना आवड होतीच, त्यामुळे व्यक्ती, व्यक्तीचे विविध पैलू, भावविश्व, मनःस्थिती यांची अंत:प्रेरणेतून जाणीव मानसी सागर यांना होत होती. त्यामुळे ‘पोट्रेट’ प्रकारच्या चित्रशैलीच्या माध्यमातून त्यांनी आपले आविष्कार सादर केले.
प्रख्यात डच कलाकार व्हॅनगो याची मॉडेल होती साईन होनरिक. देहविक्री करणारी ही महिला. या महिलेच्या जीवनातील दुसरी बाजू, कलेसाठी तिने दिलेले योगदान याबाबतचे चित्र मानसी सागर यांनी रेखाटले. तसेच, स्तनाचा कर्करोग असणार्या महिलांचे भावविश्व प्रकट करणारे चित्रदेखील मानसी सागर यांनी रेखाटले आहे. या महिलांना होणारा त्रास आणि त्यांची मनःस्थिती यांचे दर्शन त्यांनी आपल्या चित्रातून व्यक्त केले आहे.दिल्ली येथील ‘निर्भया कांडा’वर भाष्य करणारे चित्रदेखील मानसी सागर यांनी चितारले. या चित्राच्या माध्यमातून त्यांनी निर्भयाची मनःस्थिती रेखाटताना तिची हतबलता आणि लढवय्या वृत्ती अशा दोन्ही बाबींचा सुरेख संगम साधला. त्यांच्या या चित्राला पुणे येथे आयोजित ‘सुंबरान’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ‘रजत पदक’देखील मिळाले आहे. “चित्रकला हे अभिव्यक्त होण्याकामी उत्तम माध्यम आहे. चित्रकार हा त्याच्या मनातील भाव आपल्या चित्रातून मांडत असतो. माझ्या मनातील भाव, कोलाहल मी चित्रांच्या माध्यमातून मांडते आणि मला रिते झाल्यासारखे वाटते,” अशीच भावना मानसी सागर या व्यक्त करतात. उत्कृष्ट चित्रकार होण्याकामी नजर, हाताचा सफाईदारपणा, संवेदनशील मन आणि उत्कृष्ट आकलन क्षमता हे गुण असणे आवश्यक असल्याचे मानसी सागर आवर्जून नमूद करतात.
कलेच्या माध्यमातून व्यक्तीचे दर्शन कसे होते हे सागर यांना विचारले असता ते सांगतात की, “खरी व्यक्ती समजणे हे अवघड असते. कलेचे उपासक हे त्यांना दिलेले दायित्व निभावत असतात. त्यामुळे कलाकार खर्या जीवनात कसा आहे, हे जाणणे तसे अवघड आहे. मात्र, याला चित्रकार अपवाद आहे. कारण, कळत नकळतपणे चित्रकाराच्या मनातील भाव हे कागदावर उमटत असतात.” त्या पुढे म्हणतात की, “नवोदित चित्रकारांनी सुरुवातीच्या काळात इतरांची चित्र पाहू नये. कारण, त्याचा उलटा परिणाम हा होत असतो. मोठ्या चित्रकारांचा प्रभाव हा मोठा असतो. त्यामुळे मनावर एक पगडा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे नवोदित चित्रकारांच्या स्वतःच्या शैलीचे दमन होण्याचीदेखील शक्यता असते,” असे मार्गदर्शन त्या सर्व नवोदित चित्रकारांना करतात. लेखक, कवी असलेल्या मानसी सागर यांना आजवर राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यात ‘स्टेट आर्ट्स महाराष्ट्र’, ‘आर्ट्स सोसायटी ऑफ इंडिया’, ‘बॉम्बे आर्ट्स सोसायटी’, ‘प्रफुल्ल डहाणूकर आर्ट्स फाऊंडेशन’ आदी संस्थांचे पुरस्कार मानसी सागर यांना प्राप्त झाले आहेत. संवेदनशीलता जपत स्त्रियांचे भावविश्व रेखाटणार्या मानसी सागर यांच्या आगामी चित्र करकिर्दीस दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!