इएलएसएस : गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय

25 Mar 2021 22:51:34

ELSS _1  H x W:




‘इएलएसएस’ म्हणजे ‘इक्विटी लिन्कड सेव्हिंग स्किम.’ शेअरशी संलग्न बचत योजना. यात गुंतवणूक केल्यास करही वाचू शकतो, तसेच गुंतविलेल्या रकमेत वृद्धीही होते. हे आर्थिक वर्ष संपायला फक्त पाच दिवस राहिले असून बर्‍याच व्यक्ती कर वाचविण्यासाठीची गुंतवणूक शेवटच्या क्षणी करतात, अशांनी ‘इएलएसएस’ योजनेचा विचार करण्यास हरकत नाही. ‘इएलएसएस’मध्ये दीड लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम ८० सी’ अन्वये, कर सवलत मिळते.
 
 
 
याशिवाय या कलमान्वये ‘सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी’ (पीपीएफ), ‘इक्विटी संलग्न बचत योजना’ (इएलएसएस), ‘सुकन्या समृद्धी योजना’ (एसएमवाय), ‘राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र’ (एनएससी) वरिष्ठ नागरिक गुंतवणूक योजना (एससीएसएस) योजनांतही गुंतवणूक करता येते. याशिवाय गृहकर्जाची भरलेली ‘प्रिन्सिपल’ रक्कम (व्याजाची रक्कम नाही) व ‘जीवन विमा योजने’त भरलेली प्रीमियमची रक्कम करदात्याला ‘कलम ८० सी’ अन्वये कर सवलत देते. इतर सर्व गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत ‘इएलएसएस म्युच्युअल फंड’ योजनेत केलेल्या गुंतवणुकीसाठी ‘लॉक-इन पीरिएड’ कमी आहे. ‘इएलएसएस’ फंड हा शेअराभिमुख म्युच्युअल फंड आहे.
 
 
 
यात जमा झालेल्या निधीपैकी ८० टक्के रक्कम शेअरमध्ये गुंतविली जाते व २० टक्के रक्कम ‘डेट’मध्ये गुंतविली जाते. शेअरमध्ये ८० टक्के रक्कम गुंतविली जात असल्यामुळे यातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकतो, जो करदाता सर्वाधिक प्राप्तिकर टॅक्स, ‘ब्रॅकेट’मध्ये आहे, म्हणजे ज्यास करपात्र उत्पन्नावर ३० टक्के प्राप्तिकर भरावा लागतो, अशांनी जर ‘इएलएसएस म्युच्युअल फंड’मध्ये गुंतवणूक केली, तर रुपये ४६ हजार, ८०० इतकी कराची रक्कम वाचू शकते. यातील गुंतवणुकीतून जो फायदा मिळतो, त्यावर ‘लाँग टर्म कॅपिटल गेन्स’ (एलटीसीजी) भरावा लागतो.
 
 
 
वर्षाला एक लाख रुपयांहून अधिक फायदा झाला असेल, तर दहा टक्के दराने ‘एलटीसीजी’ भरावा लागतो. या योजनेत किती गुंतवणूक करावी, याची मर्यादा नाही. या योजनेचा ‘लॉक-इन पीरिएड’ फक्त तीन वर्षे आहे व तीन वर्षांनंतर गुंतवणूकदाराने गुंतवणुकीतून बाहेर पडावे, अशी सक्ती नाही. गुंतवणुकीचा पर्याय, त्या गुंतवणुकीवर आतापर्यंत मिळालेला सर्वाधिक परतावा व प्रत्येक योजनेसाठी असलेला ‘लॉक-इन पीरिएड’ याची माहिती देणारा तक्ता क्र.१.
 
 
 
तक्ता क्र.१ वरुन हे लक्षात येईल का, ‘इएलएसएस’ फंडातील गुंतवणुकीवरील सरासरी १४-१७ टक्के परतावा मिळाला आहे. ‘नॅशनल पेन्शन स्कीम’, ‘सुरक्षित गुंतवणूक योजना’ म्हणजे ‘सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी’ या गुंतवणूक पर्यायांवर सात-आठ टक्के दराने परतावा मिळाला आहे आणि यांचा ‘लॉक-इन पीरिएड’ही जास्त आहे. ‘इएलएसएस’मधील गुंतवणूक फक्त तीन वर्षे ‘लॉक’ असते. या योजनेतील गुंतवणूक प्रामुख्याने शेअर बाजारात होते.
 
 
शेअर बाजारात सातत्याने चढ-उतार होत असतात. या चढ-उताराचा परिणाम जेवढा शेअर बाजारात थेट गुंतवणूक करणार्‍यांना जाणवतो, सहन करावा लागतो, तेव्हा तो ‘इएलएसएस’मध्ये गुंतवणूक करणार्‍यांना जाणवत नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करणार्‍या योजनांमध्ये तर दीर्घ कालावधीसाठी म्हणजे पाच ते सात वर्षे या कालावधीसाठी गुंतवणूक केली, तर शेअर बाजारातील चढ-उतार अशा गुंतवणूकदारांना विशेष परिणाम करीत नाहीत. ते गुंतवणूकदार शेअर बाजारात थेट गुंतवणूक करीत नाहीत, अशांसाठी ‘इएलएसएस’ फंड हा चांगला पर्याय आहे.
 
 
 
यात गुंतवणूक करताना सामान्य गुंतवणूकदाराने या गुंतवणुकीत जोखीम किती आहे, याचा विचार करावा. यात जमा होणार्‍या निधीपैकी ८० टक्के निधी शेअरमध्ये गुंतवला जाणार असल्यामुळे जोखीम जास्त आहे. या योजनेतून परतावा किती मिळेल व या फंडाचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ जाणून घ्या. बर्‍याच ‘म्युच्युअल फंड’ कंपन्यांच्या या योजना आहेत, त्यातून योग्य योजना निवडावी. दोनपेक्षा जास्त कंपन्यांच्या ‘इएलएसएस’ फंडात गुंतवणूक करू नये. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत सर्व गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत ‘म्युच्युअल फंडा’तील गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळत आहे. परिणामी, ‘म्युच्युअल फंड योजनां’मध्ये गुंतवणूक करण्याची भारतीयांची संख्या वाढली आहे. इतर ‘म्युच्युअल फंड योजनां’प्रमाणे ‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट’ दरात ‘एसआयपी’नेच ‘इएलएसएस’ फंडात गुंतवणूक करावी.
 
 
 
‘एसआयपी’ने दर महिन्याला ‘म्युच्युअल फंड’ योजनेत ठराविक रक्कम गुंतविता येते. तुम्हाला जर कर वाचविण्यासाठी मोठी रक्कम गुंतवायची असेल, तर दि. ३१ मार्चपर्यंत म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत थांबू नका. ‘सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ उर्फ ‘सेबी’च्या नव्या नियमांप्रमाणे जर गुंतवणूक दि. ३१ मार्चला केली तर तो धनादेश २ एप्रिलपर्यंत ‘क्लिअर’ होणार नाही व तोपर्यंत ‘नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू’ (एनएव्ही) जाहीर होणार नाही. तसेच ही गुंतवणूक दि. ३१ मार्चपर्यंतच्या आर्थिक वर्षासाठी ग्राह्य मानली जाणार नाही.
 
 
 
दि. १ एप्रिलपासून सुरू होणार्‍या आर्थिक वर्षासाठी ग्राह्य मानली जाईल व परिणामी, आयकरात सवलत दि. ३१ मार्च रोजी संपणार्‍या वर्षासाठी न मिळता, दि. १ एप्रिलपासून सुरू होणार्‍या आर्थिक वर्षासाठी मिळेल. ‘सेबी’च्या नव्या नियमानुसार गुंतवणुकीवर ज्या दिवशी ‘एनएव्ही’ जाहीर होईल, ती गुंतवणुकीची तारीख समजली जाईल. आज दि. २६ मार्चपर्यंतच गुंतवणूक करा. दि. २७ मार्चला चौथा शनिवार, दि. २८ मार्चला रविवार व दि. २९ मार्चला ‘धुलिवंदन’ हे तीन दिवस बँका बंद आहेत. त्यामुळे गुंतवणुकीसाठी शुक्रवार, दि. २६ मार्च हीच तारीख निश्चित करावी. यामुळे ‘एनएव्ही’ची तारीखही दि. ३१ मार्च पूर्वीची मिळेल.
 
 
 
यात गुंतवणूक करताना त्या ‘म्युच्युअल फंड’ योजनेचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ तपासावा, पण भूतकाळात सदर फंडने चांगला परतावा दिला असेल, तर तो भविष्यातही त्याच दराने परतावा देईल, अशी समजूत करून घेऊ नये. यातील परतावा हा शेअर बाजारातील परिस्थितीवर अवलंबून असतो. शेअर बाजारातील परिस्थितीत सातत्याने बदल होत असतात. त्यामुळे त्या-त्या वेळच्या परिस्थितीनुसार परतावा मिळेल. बँकांच्या मुदत ठेवींवर जसे निश्चित दराने व्याज मिळते, तसे या गुंतवणुकीत मिळत नाही. पण, बँकांच्या मुदत ठेवींवर मिळणार्‍या सध्याच्या परताव्यापेक्षा या गुंतवणुकीवर परतावा, नक्कीच जास्त मिळणार!
 
 

Pin  _1  H x W: 

Powered By Sangraha 9.0