मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट अधिक वेगाने फैलावत आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात होळीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी निर्बंध अधिक कडक करण्यात येत आहेत. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मुंबईतील रूग्ण मृत्यूदराचा दर कमी झाला असला तरी रूग्णवाढीचा वेग मात्र जास्त आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने होळी आणि धुलिवंदन साजरा करण्यासाठीची नियमावली जारी केली आहे. यानुसार सार्वजनिकरित्या होळी सण साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेकडून परिपत्रक जारी होळी आणि धूलिवंदन/ रंगपंचमी हा उत्सव खासगी किंवा सार्वजनिक जागेत साजरा करण्यात मनाई करण्यात येत आहे. तसेच मी जबाबदार या मोहिमेतंर्गत वैयक्तिरित्याही हा सण साजरा करणे टाळा, असे आवाहन करण्यात आले आहे. ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी दिवसभरात मुंबईत तब्बल ३ हजार ५१२ नवे करोनाबाधित सापडले असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण १२०३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून रिकव्हरी रेट आता ९० टक्क्यापर्यंत आला आहे. त्यामुळे करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकारने याआधीत थिएटर्स, नाट्यगृहे, कार्यालये या ठिकाणी ५० टक्के क्षमतेनेच प्रेक्षक किंवा कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यासंदर्भात नियमावली जारी केली आहे. मुंबईत होळी किंवा धुलिवंदन या उत्सवांदरम्यान जागोजागी गर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळेच पालिका प्रशासनाने सार्वजनिक आणि खासगी अशा दोन्ही ठिकाणी हे उत्सव साजरे करण्यास मनाई केली आहे.