तेलंगणमधील सरकारचे तुष्टीकरणाचे धोरण हे या भागात जे संघर्ष होत आहेत, त्यास कारणीभूत असल्याचा आरोप प्रदेश भाजप नेत्यांनी केला आहे. तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे तेलंगणच्या एका भागातील हिंदू समाजास गेल्या अनेक वर्षांपासून कशाप्रकारे दहशतीच्या छायेखाली वावरावे लागत आहे, त्याची कल्पना यावर यावी.
महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या तेलंगण राज्यातील भैंसा परिसरातील हिंदू समाज दहशतीच्या छायेखाली वावरत असून, तेथील तेलंगण राष्ट्र समिती सरकारच्या तुष्टीकरण धोरणामुळे तेथील हिंदू समाजास सातत्याने अन्याय सहन करावा लागत आहे. याच मार्च महिन्यात त्या भागातील हिंदू समाज महाशिवरात्रीचा सण साजरा करण्याच्या तयारीत असताना रस्त्यावरील एका अपघाताचे निमित्त झाले आणि त्यावरून जी दंगल उसळली, त्यामध्ये दहा हिंदू गंभीररीत्या जखमी झाले. शुल्लक कारणावरून उसळलेल्या या दंगलीच्या वेळी हिंदू समाजावर हल्ले करणाऱ्या मुस्लीम गुंडांना रोखण्याचा प्रयत्न झाला नाही. ‘एमआयएम’शी साटेलोटे असलेल्या तेलंगणमधील सरकारने या दंगलीच्या वेळी बघ्याची भूमिका घेऊन मुस्लीम गुंडांना हवा तसा हैदोस घालू दिला. भैंसा भागातील हिंदू समाजावर हल्ले होण्याची ही काही पहिली घटना नव्हती. या आधीही तेथील हिंदू समाजावर हल्ले होण्याचे प्रकार घडले आहेत.
भैंसा येथे गेल्या ७ मार्चला जी दंगल उसळली, त्यास मोटारसायकल अपघातावरून दोन गटात झालेल्या संघर्षाचे निमित्त झाले. त्यावरून दगडफेकीस प्रारंभ झाला आणि नंतर दंगल उसळली. तेथील झुल्फिकार मशिदीच्या परिसरात उसळलेल्या या दंगलीचे लोण शहराच्या अन्य भागांत पसरले. या दंगलीत हिंदू समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दंगल घडल्याच्या घटनेनंतर त्या शहरात ६०० पोलीस तैनात करण्यात आले आणि १४४ कलम जारी करण्यात आले. तसेच त्या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. या दंगलीत काही चारचाकी वाहनांचे, दुचाकी वाहनांचे, काही घरांचे नुकसान झाले. या दंगलीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ते हिंदू समाजाचे. त्या भागातील अल्पसंख्याक समाजाकडून करण्यात आलेल्या हिंसाचारात हिंदू समाज होरपळला गेला. या दंगलीत गंभीर जखमी झालेल्यांना निजामाबाद आणि हैदराबाद येथील इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले. तेथील दंगल आटोक्यात आणण्यात आली असली, तरी तेथील हिंदू समाज सदैव दहशतीच्या छायेखाली वावरत आहे. ‘एमआयएम’च्या प्रभावामुळे तेलंगण राष्ट्र समितीचे सरकार दंगलखोरांविरुद्ध कारवाई करण्यास धजावत नसल्याचेच दिसून येत आहे. या दंगलीनंतर त्या भागास भेट देण्यास निघालेले निजामाबादचे भाजप खासदार अरविंद धर्मापुरी यांना तिकडे जाण्यापासून पोलिसांनी रोखले!
भैंसा हे तेलंगणमधील तसे संवेदनशील शहर. या शहरात या आधीही हिंदू आणि मुस्लीम समाजात संघर्ष होण्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या तीन दशकांमध्ये या शहराने अनेक जातीय दंगलींचा अनुभव घेतला. १९८४ मध्ये होळीच्या वेळी येथे दंगल उसळली होती. होळी साजरी करणाऱ्या हिंदू समाजाच्या लोकांना मुस्लीम समाजाच्या लोकांकडून आक्षेप घेण्यात आल्याने त्यावेळी दंगल उसळली होती. त्यानंतर १९८९ मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवरून दंगल झाली होती. तेथे २००८ मध्ये दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीच्या वेळीही दंगल उसळली होती. तेथील एका मशिदीच्या परिसरातून ही मिरवणूक जात असताना मशिदीतून आलेल्या काही लोकांनी त्यास आक्षेप घेतला. त्यावरून उसळलेल्या दंगलीमध्ये शेकडो घरे, दुकाने जाळण्यात आली. या दंगलीचे पडसाद संपूर्ण राज्यामध्ये उमटले. ही दंगल आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये तीन जण ठार झाले. या दंगलीची सर्वाधिक झळ पोहोचली ती हिंदू समाजालाच. पण, या दंगलीच्या आधीपासूनच पोलिसांनी जर प्रतिबंधात्मक उपाय योजले असते तर दंगल उसळली नसती, असे स्थानिक जनतेचे म्हणणे राहिले. २००८ पासून या परिसरात दंगलीची तशी मोठी घटना घडली नव्हती. पण, गेल्या वर्षी जानेवारीमध्ये मकर संक्रांती आणि पोंगल सणाच्या वेळी दंगल उसळली होती. त्या सणाच्या दरम्यान तबलिगी जमात संघटनेने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या दरम्यान, मुस्लीम तरुणांनी मोटारसायकलवरून मिरवणूक काढून दहशत निर्माण केली. त्यास हिंदू समाजाने आक्षेप घेतल्यानंतर दंगल उसळली. त्या दंगलीत हिंदूंच्या अनेक घरांचे आणि अन्य मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दंगलीनंतर तेलंगणमधील भाजप आमदार राजसिंह हे त्या भागास भेट देण्यास निघाले असता त्यांना तेथे जाऊ देण्यात आले नाही. मात्र, तेलंगण राष्ट्र समिती आणि एमआयएमच्या नेत्यांना मात्र तिकडे जाऊ देण्यात आले. यावरूनच तेलंगण राष्ट्र समिती सरकार दुजाभाव करीत असल्याची प्रचिती आली.
अलीकडे झालेल्या दंगलीनंतर भाजप खासदार अरविंद धर्मापुरी यांना त्या भागास भेट देण्यापासून रोखण्यात आले. त्यांच्याप्रमाणेच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनाही तेथे जाऊ देण्यात आले नाही. तेलंगणमधील सरकारचे तुष्टीकरणाचे धोरण हे या भागात जे संघर्ष होत आहेत, त्यास कारणीभूत असल्याचा आरोप प्रदेश भाजप नेत्यांनी केला आहे. तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे तेलंगणच्या एका भागातील हिंदू समाजास गेल्या अनेक वर्षांपासून कशाप्रकारे दहशतीच्या छायेखाली वावरावे लागत आहे, त्याची कल्पना यावर यावी.
‘हिंदू नसलेल्यांना मंदिरात प्रवेश नाही’ : बॅनरवरून वादंग
हिंदू मंदिरांमध्ये केवळ हिंदू समाजातील व्यक्तींनाच प्रवेश असल्याचे फलक लावल्याबद्दल उत्तराखंडमध्ये ‘हिंदू युवा वाहिनी’च्या नेत्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अन्य धर्मीयांच्या धार्मिक स्थळामध्ये सरसकट सर्वांना प्रवेश दिला जात नसल्याची उदाहरणे असताना असा फलक लावल्याबद्दल खरे म्हणजे आक्षेप कशासाठी घ्यायचा? पण, रंधवा नावाच्या त्या नेत्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. आपण काहीही चुकीचे केले नाही, असे रंधवा याचे म्हणणे आहे. त्यामुळे यापुढेही असे फलक आपण मंदिरांच्या बाहेर लावणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. राज्यातील मंदिरांच्या चालकांनी ‘गंगा-जमुनी तेहजिब’चे प्रदर्शन करून आपण धर्मनिरपेक्ष असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करू नये, असेही या संघटनेने म्हटले आहे. हिंदू सोडून अन्य कोणी मंदिरांमध्ये प्रवेश केल्यास त्यास मंदिर समितीने पोलिसांच्या ताब्यात द्यावे किंवा आम्हाला कळवावे, असेही या संघटनेने म्हटले आहे.
एक अल्पवयीन मुस्लीम मुलगा, गाझियाबादमध्ये दासनादेवी मंदिरात पाणी पिण्यासाठी गेल्यावरून अलीकडेच वादंग निर्माण झाला होता. त्यानंतर ‘हिंदू युवा वाहिनी’ने हे पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे. अन्य धर्मीयांच्या अनेक धार्मिक स्थानी अन्य कोणास प्रवेश दिला जात नाही. पारशी समाजाच्या अग्यारीत अन्य कोणी जाऊ शकत नाही. तसे करण्याचा प्रयत्नही कोणी करीत नाही. उत्तराखंडमधील ‘हिंदू युवा वाहिनी’ने जे पाऊल उचलले, त्यावरून स्वतःस ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणविणाऱ्या कथित पुरोगामी मंडळींकडून या घटनेचे भांडवल करण्याचा प्रयत्न केला जाईलही. पण, असंख्य हिंदूंना या कृतीमध्ये काही चुकीचेही वाटणार नाही!