माणूसपण जपणारी साहित्यप्रेमी

02 Mar 2021 20:29:14

Tanvi Devade Nashik_1&nbs
 
 
विचारशक्तीचे महत्त्व जाणून आणि त्यावर चांगले संस्कार करून अभिव्यक्त होणाऱ्या तन्वी देवडे यांच्याविषयी...
आपल्याठायी असलेल्या विचारशक्तीचा वापर करून व्यक्ती अनेक भावना जपत, जगत आणि व्यक्त करत असते. भावना व्यक्त करण्याचे आणि विचार समृद्ध करण्याची अनेक साधने आहेत. त्यापैकी एक म्हणजे वाचन आणि लेखन होय. नाशिक येथील तन्वी अमित देवडे या त्यांच्या कार्याद्वारे खऱ्या अर्थाने माणूसपण जपणाऱ्या साहित्यप्रेमी ठरतात. त्यांचे शिक्षण हे ‘बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स’ व ‘पीजीडीबीएम (एचआर अ‍ॅडमीन)’ पर्यंत झाले आहे. लौकिक अर्थाने तंत्रशिक्षणात अध्ययन केलेल्या तन्वी या उत्कृष्ट ‘ब्लॉगर’ आहेत, हे विशेष.
 
‘ऑर्कुट’च्या माध्यमातून सन २००९ मध्ये तन्वी यांनी मराठीत ‘ब्लॉग’ लिहिण्यास सुरुवात केली. तन्वी यांच्या तीन पिढ्या या शिक्षणक्षेत्रात प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे वाचन आणि कोणत्याही भाषेच्या शुद्धतेचा आग्रह यांचे बाळकडू त्यांना मिळाले. लहानपणापासून वृत्तपत्र वाचनाची असणारी सवय, यामुळे वाचनाचे संस्कार होण्याबरोबरच त्यांच्या जाणिवा समृद्ध होण्यास मदत झाली. तन्वी यांनी दहावी, बारावीपासून काव्यलेखन सुरू केले. त्या विवाहपश्चात २००७ पासून ओमानमधील मस्कत येथे वास्तव्यास होत्या. या काळात त्यांना बराच फावला वेळ मिळाला. या फावल्या वेळेत त्यांच्या मनात अनेकविध विचार येत असत. त्या विचारांना व्यक्त करण्याकामी व्यासपीठ म्हणून त्यांनी ‘ब्लॉग’ला हाताशी धरले आणि सहजच मनात उमटणाऱ्या विचारांना व्यक्त करणारे तन्वी यांचे ‘सहजच...’ नावाचे ‘ब्लॉग’ प्रसिद्ध होऊ लागले. या ‘ब्लॉग’मध्ये त्या दैनंदिन जीवनात येणारे अनुभव आणि आठवणी नमूद करत येथूनच या ‘ब्लॉग’ची सुरुवात होती. या ‘ब्लॉग’च्या माध्यमातून अनेक विचार त्या मांडू लागल्या. २०१० मध्ये जगभरातील ‘ब्लॉग’बाबत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात जगातील ‘सर्वोत्कृष्ट मराठी ब्लॉग’ म्हणून तन्वी यांच्या ‘ब्लॉग’ला गौरविण्यात आले. तसेच त्यांनी अबुधाबी येथील मराठी मंडळाच्या ‘बहर’ मासिकासाठी लेखन केले आहे. त्यानंतर विविध नियतकालिकांसाठीही लेखन कार्य तन्वी यांनी आजवर केले आहे.
 
‘ब्लॉग’वर आधारित ‘सहजच उमटले...’ हा ललित संग्रह, ‘निष्पर्ण फांदीवरचे पक्षी’ हा कवितासंग्रह आदी त्यांची साहित्यसंपदा प्रकाशित झाली आहे. लेखनाबरोबरच तन्वी यांना चित्रकलेचीही आवड. त्या निसर्गचित्राबरोबरच भारतातील विविध प्रांतातील जनजाती कलांचा अभ्यास करून त्यांना रेखाटण्याचे कार्य मोठ्या निपुणतेने करताना दिसतात. तसेच मागील पाच वर्षांपासून त्या ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’च्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’, ‘बाल ग्रंथालय’ व ‘माझं ग्रंथालय’च्या समन्वयक म्हणूनदेखील कार्यरत आहेत. या माध्यमातून ‘वाचन चळवळ’ उभी करण्याचे कार्य त्या करत आहेत.
 
‘साहित्य’ हा तन्वी यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग. साहित्य लिहिताना आपण आपल्या आकलनाला समजू शकतो. आपल्या कक्षा रुंदावत जातात, असे तन्वी यांचे स्पष्ट मत आहे. तन्वी यांच्या कविता वाचून अनेक जण कविता वाचण्यास, लेखन करण्यास प्रेरित झाल्याचेही त्या सांगतात. त्यांचे ‘ब्लॉग’ वाचणारा एक विद्यार्थी हा सनदी लेखापाल परीक्षेत दोनदा अनुत्तीर्ण झाला. तेव्हा देहत्याग करण्याचा विचार त्याच्या मनात घोळत होता. अशा वेळी तन्वी यांच्याशी त्याने संपर्क साधत संवाद केला. तेव्हा तन्वी यांच्याशी झालेल्या संवादामुळे त्या विद्यार्थ्याने आपला विचार बदलला व तो आज एक यशस्वी जीवन जगत आहे. तसेच, तन्वी यांनी आपल्याला नवीन जन्म दिला म्हणून तो विद्यार्थी त्यांना चक्क ‘आई’ म्हणून संबोधतो. अशा या ‘ब्लॉग’मुळे आईपण प्राप्त झालेल्या तन्वी या एक उत्कृष्ट समुपदेशिकाही आहेत. साहित्याचे आपल्या सर्वांच्या जीवनातील महत्त्व काय हे सांगताना तन्वी आवर्जून नमूद करतात की, “साहित्यामुळे मनाच्या लाटांना योग्य दिशा मिळत असते. त्यामुळे साहित्य हे आपल्या सर्वांच्या जीवनात दीपस्तंभासमान भूमिका बजावत असते. तसेच, तरुणांना त्यांच्या कलेने साहित्यरूपी अमृत पोहोचविण्याचे काम आपण केले तर समाजात साहित्याचा जागर होण्यास आणि चांगल्या साहित्यकृती सर्वांपर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल,” अशी भूमिका तन्वी यांची आहे. ‘गीता इंडस्ट्रीज’ या आपल्या कंपनीचे संचालन करणाऱ्या तन्वी यांना आपल्या औद्योगिक जीवनात कामगार व कर्मचारी वर्गाच्या समस्या सोडविण्याकामी साहित्याची मोठी मदत झाली. कार्यस्थळावरील वातावरण हे हलकं-फुलकं ठेवण्यात आणि कर्मचाऱ्यांत स्नेहभाव वृद्धिंगत करण्यात तन्वी यांना साहित्यामुळे मोठी मदत झाल्याचे त्या आवर्जून नमूद करतात. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या माणसात असतात. व्यक्तीला व्यक्ती म्हणून न पाहता ती एक वृत्ती आहे. असे आपण गृहीत धरले, तर हे सुंदर आयुष्य सहजतेने जगणे शक्य होते. विचारातील क्षुद्रपणा कमी होऊन साहित्य व्यक्तीला प्रगल्भ करते, अशी तन्वी यांची ठाम धारणा आहे. विचारशक्तीचे महत्त्व जाणून आणि त्यावर चांगले संस्कार करून अभिव्यक्त होण्याचे काम तन्वी करत आहेत. अभियंता ते लेखिका ते साहित्यचळवळ रुजविणाऱ्या कार्यकर्ता असणाऱ्या तन्वी यांच्या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
Powered By Sangraha 9.0