तरुणांपेक्षा ५० किंवा त्याहून जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये सकारात्मकतेचा स्तर हा सर्वाधिक असतो. उपचार करताना, उर्वरित आयुष्य पाहताना, ‘सेकंड इनिंग’ची सुरुवात करत असताना याच गोष्टी महत्त्वाच्या ठरत असतात.
अनुभव हाच सर्वात मोठा गुरू आहे, असे मानले जाते. कोरोना महामारीच्या काळात असाच काहीसा कल दिसून आला. जागतिक महासत्ता मानल्या जाणार्या अमेरिकेला ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. तिथे आतापर्यंत साडेपाच लाख जणांनी आपला जीव गमावला. एकूण कोरोना रुग्णांपैकी ५०वर्षांवरील व्यक्तींच्या संख्येत ५१ टक्के लोकांचा सामावेश होता. मात्र, सर्वात जास्त ताण-तणाव हा ५० वर्षांखाली असणार्या आणि तरुणांवर जाणवला. कोरोनाशी झुंज देऊनही ज्येष्ठ नागरिकांचा दृष्टिकोन सकारात्मक होता. स्टेनफोर्ड विद्यापीठात करण्यात आलेल्या एका संशोधनात हा खुलासा झाला आहे. वाढत्या वयोमानानुसार कोरोनाकाळातही सामंजस्याने परिस्थिती हाताळण्याची क्षमता ज्येष्ठ नागरिकांमध्ये दिसून आली होती. तरुणांसाठी ही बाब चिंताजनक मानली जात असली, तरीही या संशोधनातून ज्येष्ठांसाठी एक समाधानाची बाब मानली जात आहे. जगभरात पुन्हा कोरोनाची आलेली दुसरी लाट, पुन्हा एकदा ‘लॉकडाऊन’चे सावट या काळात हाच सकारात्मक दृष्टिकोन फायद्याचा ठरणार आहे. अनुभवामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या वागण्या-बोलण्यातून सकारात्मकतेचा स्तर उंचावताना दिसून आला होता. संशोधकांचे नेतृत्व करणार्या विद्यापीठातील मनोवैज्ञानिक लॉरा कार्स्टेंसन यांच्या मते, वय वाढत चालल्याने शारीरिक व्याधींचे प्रमाण वाढू शकते, मानसिक स्थितीच्या तीव्रतेचा स्तर घटत जातो. कमजोरी वाटू लागते. मात्र, त्यांच्या आनंदी स्वभावात वृद्धी होण्याचे प्रमाण तुलनेने इतरांपेक्षा अधिक असते. तरुणांपेक्षा ५० किंवा त्याहून जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये सकारात्मकतेचा स्तर हा सर्वाधिक असतो. उपचार करताना, उर्वरित आयुष्य पाहताना, ‘सेकंड इनिंग’ची सुरुवात करत असताना याच गोष्टी महत्त्वाच्या ठरत असतात.
त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या या अंगीकृत होत जाणार्या स्वभाववैशिष्ट्यांकडून तरुणांनीही शिकणे गरजेचे आहे. कोरोना संकट सुरू असताना आत्महत्या, मानसिक तणाव आदी गोष्टींचे प्रमाण अधिकाधिक वाढत चालले होते. सुशांतसिंह असो किंवा अन्य सिनेतारकांच्या आत्महत्यांची प्रकरणे फार गाजली. ‘लॉकडाऊन’च्या काळात घरात एकाच वेळी कुटुंबीयांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही आपण वाचत असतो. यापैकीही बर्याचशा व्यक्तीही पन्नाशीच्या खालीच होत्या. पन्नाशीनंतर नकारात्मकता जाणवण्याचे प्रमाण कमी होते, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. ही वेळ पैशांसाठी जीवापाड काम करणे, घराचे हप्ते किंवा भाडे देण्यासाठी काम करण्याची नसते. या काळातील व्यक्तींकडे थोडासा निवांतपणाही असतो, तसेच आयुष्यभरासाठी जमावलेली थोडीफार पुंजीदेखील असते. त्यामुळे तणाव हा नैसर्गिकरीत्या कमीच असतो. निवृत्तीचा काळ असेल किंवा निवृत्तीसाठी अवघी काही वर्षे शिल्लक असल्याने नैसर्गिकपणे ताण तितकासा नसतो. आजी-आजोबा झाल्यावर नातवंडांसह घालवलेला वेळ, सत्संग आणि इतर समवयस्क मित्रांसह घालवलेला वेळ त्यांना व्यस्त ठेवत असल्याने तणाव नगण्य होतो. अर्थात, याला काही अपवाद असूही शकतील. मात्र, या संशोधनात सरासरी ज्येष्ठांचा विचार करण्यात आला आहे. मुद्दा असा की, इतक्या गंभीर स्वरूपाची महामारीही ज्येष्ठांचे खच्चीकरण करू शकलेली नाही. कारण, ज्येष्ठांचा विचार करण्याचा दृष्टिकोन गेला.
या वयात ज्येष्ठ नागरिक भविष्यापेक्षा वर्तमानकाळात जगू इच्छितात. या भविष्यापेक्षा वर्तमानाचा आनंद जगू इच्छिणार्यांचे प्रमाण अधिक असते. याउलट परिस्थिती युवकांची असते. त्यांना भविष्याची चिंता सतावत असते. सतत करिअर आणि इतर गोष्टींचा ताण असतो. हेच कारण ज्येष्ठांना आनंदी राहण्याचा मार्ग गवसतो. कॅलिफोर्नियातील मनोवैज्ञानिक सुझॅन चार्ल्स यांनीही एका वृत्तसंस्थेकडे याबद्दल खुलासा केला आहे. कोरोना काळात ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला होता. एप्रिलमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, कित्येक राज्यांमध्ये १८ ते ७६ वर्षांचे हजार नागरिक यात समाविष्ट होते. वाढत्या वयोमानानुसार, व्यक्तींना आव्हानात्मक परिस्थितीशी सामना कसा करतात याबद्दल निष्कर्ष काढला जाणार होता. ज्येष्ठांनी काही गोष्टी स्वीकारण्याची तयारी केली आहे की, समस्यांचा सामना करण्याची तयारी कितपत आहे, याचा अंदाज घेतला जाणार होता. अमेरिकेत जेव्हा कोरोनाचा हाहाकार झाला होता, त्याच दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. याच सर्वेक्षणाचा उलटा विचार केला तर तरुणांनीही या संशोधनाचा विचार करण्याची गरज आहे.