कोरोनाच्या काळात जगभरातील सर्व उद्योगांना ‘ब्रेक’ लागल्यानंतर जवळपास सर्वच क्षेत्रातीलउद्योजकांना याचा आर्थिक फटका मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागला. प्रत्येक उद्योजकासमोर स्वतःच्या उद्योगाची नौका या वादळामध्ये तारण्यासाठी एक ‘कप्तान’ म्हणून मोठी जबाबदारी निभावणे आवश्यक होते. अशामध्ये आपल्या कर्मचाऱ्यांच्या मागे आणि त्यांच्या बरोबरही अगदी खंबीरपणे उभे राहत ‘मेहता प्रेसिंग कंपोनंट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तुषार मेहता यांनी कोरोनाविरोधात एक यशस्वी लढा दिला आहे. त्यांच्या लढ्याची ही कहाणी...
‘मेहता प्रेसिंग कंपोनंट’ ही मेटल शीट्सची निर्मिती आणि निर्यात करणारी एक नावाजलेली, अत्यंत प्रतिष्ठीत कंपनी. या कंपनीची स्थापना १९९४ मध्ये तुषार मेहता यांनी केली. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात भोसरी येथे ही कंपनी कार्यरत असून या कंपनीचा मेटल स्टॅम्पिंग, मोल्ड्स, वेल्डिंग, पावडर कोटिंग आणि असेंब्ली उत्पादनांमध्ये हातखंडा आहे. ऑटोमोबाईल्स, कृषी उपकरणे, विद्युत ऊर्जा प्रकल्प तसेच घरगुती उपकरणे यासाठी प्रामुख्याने मोठ्या बाजारपेठांना या कंपनीमार्फत सेवा पुरविण्यात येते. अशा या कंपनीची दरवर्षी प्रगतीकडे वाटचाल होत आहे. परंतु, फेब्रुवारी २०२० मध्ये जेव्हा कोरोनाची सुरुवात जगभरात झाली, त्यानंतर मार्च महिन्याअखेरीस भारतामध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. ‘लॉकडाऊन’ काळात आपल्या कंपनीचे काय होणार? कामगारांचे काय होणार? असेे प्रश्न उभे ठाकले होते. तुषार मेहता यांनादेखील या काळात हीच चिंता सतावत होती. पण, चिंतातूर न राहता, या आव्हानाचा नेटाने सामना करायचाच, असे त्यांनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मनाशी पक्के केले आणि ते पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले.
मार्च महिन्यात ‘लॉकडाऊन’ सुरू झाल्यावर हळूहळू सर्व प्रकारच्या सेवा बंद होण्याच्या मार्गाला लागल्या. मोदी सरकारने ’जनता कर्फ्यू’ जाहीर केला आणि एकाएकी संपूर्ण देश स्तब्ध झाला. दळणवळणाची साधने बंद झाली. सर्वच सेवासुविधांना मोठा ‘ब्रेक’ लागला. दि. २३ मार्चला सर्व कंपनीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. सर्व कामगारांच्या मागण्या लक्षात घेऊन आणि केंद्र तसेच राज्य सरकारने लादलेल्या नियमावलींचे पालन करून दि. ३१ मार्चपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सरकारने ‘लॉकडाऊन’ कालावधीत वाढ केल्यानंतर पुढे आर्थिक गाडा कसा सांभाळायचा, हा मोठा प्रश्न कंपनीसमोर उभा राहिला. या कठीण काळात कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरणही पसरले होते. अशावेळी तुषार मेहता यांनी स्वतः प्रत्येक कर्मचाऱ्याशी संवाद साधला. त्यांना याची खात्री करून दिली की, यामुळे कोणाच्याही नोकरीवर गदा येणार नाही किंवा कोणाच्याही पगारावर कुर्हाड कोसळणार नाही. असा मोठा दिलासा मेहता यांनी कामगारांना दिला होता. याचसोबत ‘लॉकडाऊन’मुळे सर्व कामगार घरीच बसून असल्यामुळे त्यांना मानसिक स्थैर्य मिळवून देण्याचा प्रयत्नही तुषार मेहता यांनी केला होता. व्हॉट्सअॅपवर एक ग्रुप तयार करून अनेक प्रेरणादायी व्हिडिओ ते कर्मचाऱ्यांना पाठवायचे. जे उच्च पदस्थ कर्मचारी होते, त्यांच्या ‘झूम मीटिंग’ घेऊन या परिस्थितीशी कसा सामना करावा, याबद्दल आखणी करत असत. अशावेळेस कर्मचाऱ्यांना धीर देण्याचे कामदेखील त्यांनी केले. कर्मचाऱ्यांशी वेळोवेळी संवाद साधल्यामुळे त्यांना एकत्र बांधून ठेवण्यामध्ये त्यांना यश आले.
याशिवाय या धोक्याचे रुपांतर सकारात्मक संधीत करण्याचा विचार कंपनीने केला. यावेळी चर्चा करून कंपनीचा विस्तार कसा करू शकतो, याचादेखील विचार केला. विशेष म्हणजे, कर्मचाऱ्यांची आर्थिक बाजू सांभाळणेदेखील तितकेच महत्त्वाचे होते. कुठेही त्यांची आर्थिक आणि मानसिक परिस्थिती ढासळू नये, यासाठी त्यांच्या पगारामध्ये कपात न करण्याचा मोठा निर्णय कंपनीने घेतला. पूर्वीप्रमाणेच कर्मचाऱ्यांना त्यांचे पगार वेळोवेळी दिले गेले. कंपनीच्या लेखापालांना ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय देत सर्व आर्थिक गोष्टींचा ताळमेळ बसवण्यामध्ये त्यांनी यश प्राप्त केले. सरकारचा जीएसटी असो, आयकर असो किंवा बँकेचे ईएमआय असो, ईएसआय, ग्रॅच्युईटी फंड किंवा पीएफ फंड असो, या सर्वांच्या वेळा अगदी तंतोतंत कंपनीमार्फत पाळल्या गेल्या. सलग अडीच महिने सतत ही प्रक्रिया, जूनमध्ये हळूहळू ‘लॉकडाऊन’चे काही प्रमाणात निर्बंध उठण्यास सुरुवात होईपर्यंत कुठल्याही अडथळ्याविना पार केली. थोडक्यात, या कोरोनाच्या संकटात कंपनीला आर्थिक व्यवस्थापन करण्यात यश आले.
साधारण दि. १७ जूनला मर्यादित कर्मचाऱ्यांसह कंपनीही मेहता यांनी ‘अनलॉक’ केली. तेव्हा पहिल्यांदा सर्व साफसफाई करून दररोज दिवसांतून तीनवेळा कंपनीमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोरोना काळात सुरुवातीला काय काळजी घेतली पाहिजे, याबद्दल कंपनीने स्वतःची अशी एक वेगळी नियमावलीही तयार केली. जेवढे कामगार कामावर येतील, त्यांचे ‘थर्मल चेकिंग’ केल्याशिवाय, त्यांना काही आजार तर नाही ना, याची खात्री केल्याशिवाय त्यांना कामावर रुजू करण्यात येत नव्हते. जे कामगार परगावीगेले होते, त्यांनादेखील पुन्हा कामावर सामावून घेतले. असा एकही कामगार नव्हता, ज्याला कोरोनामुळे घरी बसावे लागले. यावेळी जुन्या कामगारांना प्रथम प्राधान्य देऊन सगळ्यांना कामावर रुजू केले. कंपनीजवळच चाकणमध्ये आगरकरवाडी म्हणून एका परिसरात कामगारांचा एक समूह एकत्र राहत होता. त्यांच्यासाठी कंपनीने तीन वर्षांपूर्वी जवळची शाळा दत्तक घेतली होती. एक सामाजिक भान म्हणून कंपनीने या शाळेलामार्चपर्यंत ‘ऑनलाईन’ अभ्यासासाठी ज्या ज्या साहित्याची मदत लागेल, ती पुरवण्याची जबाबदारी घेतली. तुषार मेहता यांनी ‘लायन्स क्लब ऑफ पुणे-सारसबाग’ या संस्थेतर्फे महर्षी नगर येथे ‘डायलिसिस सेंटर’ही कार्यान्वित केले. याद्वारे जे आर्थिक दुर्बल घटक होते, त्यांना अवघ्या २०० रुपयांमध्ये ’डायलिसिस’ची सुविधा उपलब्ध झाली. ‘लॉकडाऊन’ चालू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात ही सुविधा मोफत उपलब्ध केली होती. याशिवाय यामध्ये व्यवसायवृद्धीसाठी प्रीतमपूरमधील देवास येथेदेखील एक ‘पॉवर प्लांट’ चालू केला. आता मेहता यांचे पुढील ध्येय हे २०२२ पर्यंत तिथेही हा व्यवसाय वाढवण्याचे आहे. “पुण्यातही आमच्या उद्योगाचा विस्तार व्हावा आणि नवीन तरुणांना संधी मिळावी, अशी आमची पुढची उद्दिष्टे आहेत,” असे तुषार मेहता सांगतात. त्यांना त्यांच्या आगामी काळातील या उद्दिष्टपूर्तीसाठी आणि एकूणच प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.
"‘कोविड’कडे आम्ही संधी म्हणून पाहिले. तसेच, यामध्ये माझ्या पत्नीचीदेखील अमूल्य साथ लाभली. मीच पुढाकार घेऊन कंपनी चालू केली. चांगले कर्म करत राहिले तर नक्कीच त्याचे फळ आम्हाला मिळेल, अशी अपेक्षा ठेवून आम्ही ही सर्व पावले उचलली आणि त्याचा निश्चितच लाभही झाला."