२०२० मध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत गेला आणि बघता बघता अवघे जग या महामारीने आपल्या कवेत घेतले. मानवी जीवनाच्या सर्वंकष पैलूंवर या महामारीने आघात केला. त्यात उद्योगजगताला तर या महामारीचा सर्वाधिक फटका सहन करावा लागला. अवघे विश्व, संपूर्ण देश ‘कोविड’मुळे एकाएकी थांबले असताना, जगाला आपली गरज आहे, ही बाब वेळीच ओळखून ‘लॉकडाऊन’च्या अगदी पहिल्या दिवसापासून काम करणाऱ्या उद्योजक बिपिन शाह यांच्या नेतृत्वात ‘अनूह फार्मा’ या कंपनीने अशक्य गोष्टही शक्य करून दाखवली, त्याचाच हा लेखाजोखा...
दि. २५ मार्च, २०२० रोजी संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लॉकडाऊन’ जाहीर केला. १९६० पासून स्थापन झालेल्या ‘अनूह फार्मा’ आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी गेल्या ६० वर्षांतील ही महत्त्वाची घटना होती. संपूर्ण जगभरात औषधनिर्मितीसाठी संसाधने पोहोचविणाऱ्या या कंपनीपुढे आणि शाह यांच्या टीमपुढे मोठे आव्हान उभे ठाकले होते. एकूण ४०० कर्मचारी संख्या असणाऱ्या या कंपनीपुढे कर्मचाऱ्यांना फॅक्टरी आणि ऑफिसपर्यंत आणायचे तरी कसे, हा मोठा प्रश्न होता. तसेच कंपनीची तयार उत्पादने देशाबाहेर योग्य ठिकाणी पोहोचविण्याचेही मोठे आव्हान होते. कंपनीत व्यवस्थापकीय संचालक (एमडी) असलेले बिपिन शाह आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मात्र अजिबात हार न मानता हे आव्हान स्वीकारायचे ठरवले. स्वतः बिपिन शाह हे त्यांच्या सत्तरीत असूनही कोरोनाकाळातील स्वतःच्या व्यवसायातील महत्त्व आणि दायित्व स्वीकारत त्यांनी संपूर्ण तयारी करुन उद्योगचक्र गतिमान ठेवण्याचा निर्धार केला.
‘लॉकडाऊन’ जाहीर झाल्याच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच शाह यांच्या कंपनीला कार्यरत राहण्याची परवानगी मिळाली होती. शाह यांनी या संपूर्ण प्रक्रियेत जातीने लक्ष देऊन सगळ्या सहकाऱ्यांशी संवाद साधला. सर्व कर्मचाऱ्यांशी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे कामावर पोहोचण्याची केलेली व्यवस्था, कोरोनाला हरविण्यासाठी घेण्यात येणारी काळजी व उपाययोजनांची माहिती दिली. ‘अनूह फार्मा लिमिटेड’ ही संपूर्ण ४०० जणांची टीम. प्रत्येकाला मास्क, सॅनिटायझर, फेस शिल्ड, ऑफिस आणि फॅक्टरीमध्ये निर्जंतुकीकरण आदी गोष्टींची कटाक्षाने दक्षता घेण्यात आली. विशेष म्हणजे, संपूर्ण कर्मचारी वर्गाने शाह यांच्या आदेशवजा सूचनांचे पालन करत, सरकारी व प्रशासनाच्या अटी-शर्तींनुसार फॅक्टरी आणि कार्यालये सुरू केली.
अपेक्षेप्रमाणे कार्यालये सुरू झाली. निर्जंतुकीकरणाचे नियोजनही अगदी काटेकोरपणे केले जाऊ लागले. कर्मचाऱ्यांची उपस्थिती नियमित होती. सर्वांना मास्कवाटपही करण्यात आले. ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळत सर्वांनी जोमाने कामाला सुरुवात केली. सर्वांना घरपोच मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्यात आली. विशेष म्हणजे, प्रत्येकाला विशेष प्रोत्साहन भत्ताही देण्यात आला. कोरोनाकाळात उत्पादनाची वाढलेली मागणी आणि तयार झालेला माल नियोजित ठिकाणी पोहोचविणे हे एक मोठे आव्हान होते. त्यानुसार, पुढच्या संकटावर मात करण्यासाठी त्यांचा कर्मचारीवर्ग शाह आणि कंपनीच्या अगदी खंबीरपणे पाठिशी उभा राहिला.
‘लॉकडाऊन’ म्हणजे मोकळे रस्ते, जागोजागी पोलीस बंदोबस्त आणि अन्य अडचणी यातून मार्ग काढत, आता तयार माल निर्यातीसाठी पोहोचविण्याचे मोठे आव्हान शाह यांना पार करायचे होते. बंदरे, विमानतळावर उत्पादन निर्यातीसाठी पोहोचविण्याचे आव्हानही त्यांनी लीलया पेलले. तारापूर-बोईसर येथून परदेशात हा माल पाठवायचा होता. वाहतुकीसाठी नेहमीच्या यंत्रणा उपलब्ध होऊ शकत नव्हत्या. त्यासाठी कंपनीतर्फे एक सक्षम पर्यायी व्यवस्था उभी करण्यात आली. नेहमीपेक्षा दुप्पट विमान प्रवासखर्च करून उत्पादने इच्छित स्थळी पोहोचविण्यात आली. हे खरंतर एक मोठे यश होते. आता हळूहळू परिस्थिती रुळावर येऊ लागली होती. ज्याप्रमाणे ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ योद्ध्यांप्रमाणे कोरोनाशी लढत होते, त्याप्रमाणे पडद्यामागे बिपिन शाह यांच्या नेतृत्वात औषधांसाठी लागणाऱ्या सर्व उत्पादनांचा पुरवठा कंपनीमार्फत जगभरात केला जात होता. उल्लेखनीय म्हणजे, पहिले ‘लॉकडाऊन’ जाहीर झाले असतानाच, शाह यांच्या नेतृत्वात त्यांच्या कंपनीने चपळता दाखवत आघाडी घेतली होती.
१९६० पासून सुरू झालेल्या ‘अनूह फार्मा लिमिटेड’ने आजवरच्या वाटचालीत अनेक चढ-उतार अनुभवले. पण, कोरोनाच्या स्थितीतही तावून-सुलाखून ही कंपनी बाहेर पडली. इतक्या वर्षांतील शून्य कर्ज आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या या ‘अनूह फार्मा लिमिटेड’ने हे दिव्यही पार केले. या काळात कंपनीने आपला करभरणा उदा. जीएसटी, आयकर आणि इतर देणीही चुकती केली आणि उद्यमींपुढे एक नवा आदर्श निर्माण केला. आपले कर्तव्य पार पाडत असतानाही, सामाजिक भान जपण्याचे कामही साऱ्यांनी केले. शाह यांच्या मार्गदर्शनात कंपनीच्या ‘सीएसआर’ धोरणांतर्गत गरजूंसाठी अन्नदान उपक्रम राबविण्यात आला. कोरोनाकाळात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्यांच्या पोटाची भूक शमविण्याचा प्रयत्न शाह यांनी केला.
कोरोना काळात अशाप्रकारे ‘ग्राऊंड झिरो’वर उतरून काम करायचे म्हणजे संपूर्ण कुटुंबाचे पाठबळ हवेच. त्यात वयाच्या सत्तरीतही बिपिन शाह यांनी आपली इच्छाशक्ती अधिक बळकट केली. त्यांच्या कामात त्यांचे दोन्ही चिरंजीव रितेश शाह आणि विवेक शाह यांनीही मोलाचे सहकार्य केले. रितेश आणि विवेक दोघेही कंपनीमध्ये पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसेच कुटुंबाचाही पाठिंबा लाभल्याचे शाह सांगतात. योगासने, कोरोना काळात घ्यावयाची खबरदारी असे सगळे नियम ते आजही अगदी नित्यनेमाने पाळतात आणि प्रत्येकाला आपुलकीने आपापली काळजीही घ्यायला सांगतात. त्यांची हीच ऊर्जा ‘अनूह फार्मा’च्या संपूर्ण टीममध्ये परिवर्तित झाली आणि कंपनीचे जोमाने काम सुरू झाले. भविष्यात आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आणखी सुविधा देऊन सुसज्ज अशा टीमसोबत उत्पादनवृद्धी करण्याचे लक्ष्य शाह यांनी निर्धारित केले आहे. कोरोना काळातील व्यवसायाच्या संधी शोधून त्यावर काम करण्याचा शाह यांचा मानस असून त्यानुसार पुढील ध्येय-धोरणेही आखली आहेत. तसेच उत्पादन सुलभता हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. याच काळात आजघडीला घेतल्या जाणाऱ्या उत्पादनाच्या दुप्पट लक्ष्य त्यांनी निर्धारित केले आहे. तसेच त्यामुळे कंपनीत आणखी ४०० जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास शाह यांना आहे.
" ‘कोविड’काळामुळे खचून न जाता, नव्या संधी शोधून त्यातून मार्ग काढण्याचा संदेश ते नवउद्यमी व उद्योजकांना देतात. ‘फोर एम थिअरी’ (4 M Theory) ‘मॅन’, ‘मटेरिअल’, ‘मशीन’ आणि ‘मनी’ यामध्ये ‘मॅन’ हा एक अतिमहत्त्वाचा घटक आहे, हे विसरून चालणार नाही, असा संदेश ते देतात. अशा या उद्योगातील एक जाणकार, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आणि ‘कोविड योद्धा’ उद्योजकाला सलाम!"