संघर्षनायक!

12 Mar 2021 21:49:14

covid yodha _1  



कोरोना काळात उद्योगांना ‘ब्रेक’ लागल्यानंतर जागतिक बाजारपेठा आणि अर्थव्यवस्थाही एकाएकी ठप्प झाल्या. भारतीय उद्योगांनाही कोरोनाची खीळ बसली. मात्र, या परिस्थितीतही सर्व नियमांचे पालन करत, या संकटाशी दोन हात करण्याचा निर्धार ‘परफेक्ट ग्रॅफाईट अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल्स’चे सर्वेसर्वा गणपती अय्यर यांनी केला. लहानपणापासूनच रा. स्व. संघाचे स्वयंसेवक असलेल्या गणपती यांनी अगदी आपल्या नावाप्रमाणेच कामगारांचे, समाजाचा ‘दु:खहर्ता’ म्हणून काम केले. तेव्हा, या संकटावर मात करत, एस. गणपती यांनी केलेल्या कामगिरीचा आढावा घेणारा हा लेख...


'मूस’ या सोने वितळवण्यासाठी लागणार्‍या महत्त्वाच्या भागाचे उत्पादन करणारी कंपनी म्हणजे ’परफेक्ट ग्रॅफाईट अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल्स.’ या कंपनीचे सर्वेसर्वा गणपती श्रीनिवास अय्यर (एस. गणपती) यांनी काही वर्षांपूर्वी ही कंपनी सुरू केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून समाजाप्रति आपले कर्तव्य बजावत असतानाच, व्यवसायाची जबाबदारीही तितक्याच ताकदीने त्यांनी सांभाळली. समाजाशी बांधिलकी असलेले गणपती हे गेली अनेक वर्षे व्यवसाय करत आहेत.
 
 
मार्चमध्ये जगावर अचानक कोरोना महामारीचे मोठे संकट कोसळले. यावेळी संपूर्ण जग या संकटाशी लढा देत असताना संपूर्ण आर्थिक व्यवहार, छोटे-मोठे उद्योगधंदे सर्वच ठप्प झाले. सर्व जग एकाएकी थांबले. काही उद्योगांना अक्षरशः टाळे लागले. भारतामध्येही कोरोनाचे गंभीर परिणाम एव्हाना दिसू लागले होते. मार्च महिन्यात संपूर्ण देशभर ‘लॉकडाऊन’ सुरू झाल्यानंतर अनेक कामगारांचे अतोनात हाल झाले. अशामध्ये उद्योजकाला आपला व्यवसाय सांभाळणे, हे खूप मोठे आव्हान होते. महाराष्ट्रातील अनेक उद्योगांना आर्थिक फटका तर बसलाच, शिवाय या परिस्थितीमुळे अनेकांचे रोजगारही गेले. अशा परिस्थितीमध्ये कोविड काळात स्वतःचा व्यवसाय चालू ठेवण्याचे धैर्य एस. गणपती यांनी दाखवले. एवढेच नव्हे, तर कोणत्याही कामगाराला कामावरून कमी न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही त्यांनी घेतला. त्यांनी दिलेल्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याविषयी जाणून घेऊया...
 
 
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये एस. गणपती यांना कोरोना प्रादुर्भावाचा चांगलाच फटका बसला. ‘लॉकडाऊन’मध्ये कंपनीच बंद ठेवावी लागल्यामुळे उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम झाला. उत्पादनच बंद असल्यामुळे कामगारांचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. त्यात त्यांच्याकडे काम करणारे अनेक कामगार हे परगावचे आहेत. त्यामुळे ‘लॉकडाऊन’ सुरू झाल्यानंतर कंपनीतील कामगारांच्या कुटुंबीयांच्याही पोटापाण्याचा प्रश्न समोर उभा राहिला. या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा? पुढे कंपनीचे भविष्य काय? अशा असंख्य अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले. यावेळी गणपती यांनी प्रथम त्यांच्या कर्मचार्‍यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला. त्यांच्या घरातील चूल पेटती राहावी म्हणून त्यांच्या पगारामध्ये कोणतीही कपात न करण्याचा महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला. एवढेच नव्हे, तर ज्या कामगारांचे कुटुंब महाराष्ट्राबाहेर वास्तव्यास होते, त्यांच्या घरी जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्याची व्यवस्थादेखील त्यांनी केली. तसेच कामगारांची राहण्याची व्यवस्था करत, त्यांना लागणार्‍या सर्व गोष्टी पुरवण्याचा निर्धारही त्यांनी केला.

covid yodha _1  
 
 
‘ज्वेलरी इंडस्ट्री’ हे तसे ‘ग्लॅमरस’ क्षेत्र. त्यामुळे ‘लॉकडाऊन’चे काही महिने सोडले तरी गणपती यांचे उत्पादन थांबले नाही. त्यामुळे गणपती यांच्या ’मूस’ या यंत्राला मागणी कायम होती. कोरोनाचा प्रसार हा चीनमधून झाल्याने चिनी उत्पादनांवर बंदी टाकण्यात आली. त्यामुळे या क्षेत्रामध्ये वापरल्या जाणार्‍या चिनी मशीन्सवरदेखील बंदी घातली गेली. यामुळे या आव्हानाचेरुपांतर संधीत करण्याचा निर्धार एस. गणपती यांनी केला. त्यांच्या ’मूस’ या सोने वितळवण्यासाठी लागणार्‍या महत्त्वाच्या भागाची मागणी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढली. तसेच, जपानसारख्या देशांत या भागांची निर्यात होऊ लागली. कुठल्याही आव्हानाकडे आपण एक ’आव्हान’ म्हणून न पाहता, सकारात्मक दृष्टीने पाहिल्यामुळे या संकटावर मात करण्यासाठी त्यांच्याकडे विविध कल्पना होत्या. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी अशा अनेक आव्हानांचा सामना केला. त्यामुळे हे आव्हानही पेलण्यासाठी ते सज्ज होते. या उत्पादनासाठी काही कच्चा माल हा जपानमधून येत होता. त्यामुळे आता ‘लॉकडाऊन’ हळूहळू उघडत असताना पुढे काय करायचे, याचा अभ्यास त्यांनी ‘लॉकडाऊन’च्या दोन महिन्यांत करुन सगळे रीतसर नियोजन केले. चीनमधील उत्पादनांवर सरकारने बंदी आणल्यानंतर स्वदेशी उत्पादनांना चांगली मागणी निर्माण झाली. यामुळे एस. गणपती यांच्या कंपनीला याचा चांगलाच फायदा झाला. कंपनीची विक्री १५ ते २० टक्के वाढली. तसेच, बाजारपेठेमध्येही भारतीय उत्पादनांबाबत जागरुकता निर्माण झाली. तसेच, ’परफेक्ट ग्राफाईट’ कंपनीचे नावदेखील अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचले.
 
 
कंपनीचे कर्मचारी म्हणजे एस. गणपती यांच्यासाठी एक कुटुंबच. मागील दहा वर्षांपासून त्यांच्यासोबत हे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांची संपूर्ण जबाबदारी या काळात गणपती यांनीच स्वीकारली होती. गणपती यांनी कर्मचार्‍यांना आश्वासन दिले की, कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. त्यांनी काही स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधून त्यांच्या राहण्याची आणि इतर सर्व मूलभूत गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी उचलली. स्थानिक कामगार आणि काही उत्तर भारतीय कामगारांची एका ठिकाणी राहण्याची सोयही करण्यात आली. एस. गणपती हे तसे शालेय जीवनापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. तेव्हापासूनच ‘जनसेवा’ हाच राष्ट्रधर्म म्हणून त्यांनी पाळला. ‘कोविड’च्या काळातदेखील त्यांनी ‘लॉकडाऊन’ सुरू झाल्यापासून अनेक जणांना मदतीचा हात दिला. पालघरमध्ये आजूबाजूच्या परिस्थितीचे निरीक्षण करून त्यांनी कंपनीतर्फे काही रुग्णालयांना मदत पोहोचवली. तसेच, जवळच्या काही वनवासी पाड्यांत जाऊन त्यांना अन्नधान्याचा पुरवठा केला. यामध्ये त्यांना घरच्यांची मोलाची साथ लाभली आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ’आत्मनिर्भर भारत’च्या संदेशाचे ते गेली दहा वर्षे पालन करत आहेत. तसेच, भविष्यामध्ये आयआयटी विद्यार्थ्यांसोबत नवीन गोष्टींना सुरुवात करणार्‍यांचा त्यांचा निर्धार आहे. “देशाचा तरुण ‘आत्मनिर्भर’ झाला, की आपला देशही ‘आत्मनिर्भर’ होईल,” असे ते म्हणतात. त्यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
 
 

"माझ्यावर रा. स्व. संघाचे संस्कार असल्यामुळे आपण किमान लोकांची तरी मदत करू शकतो, हा विचार मनात आला. ज्यांच्यामुळे आपल्या घरची चूल पेटते, अशा आपल्या कामगारांच्या घराची चूल पेटती राहिली पाहिजे, असा विचार करूनच या अडथळ्याचे रुपांतर संधीत केले."
 
 
Powered By Sangraha 9.0