
मुंबई : काल ११ मार्च रोजी एमपीएससीची परीक्षा पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले होते. त्यानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता ही परीक्षा १४ मार्चऐवजी २१ मार्चला रोजी रविवारी होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुरुवारी १४ मार्च रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा केली होती.त्यामुळे पुण्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये MPSC चे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. मुळात सरकारने २१ तारखेला परीक्षा घेण्याच्यादृष्टीने तयारी केली असेल तर मग ती १४ तारखेला का होऊ शकत नाही, असा सवाल अनेक विद्यार्थी विचारत आहेत. काहीवेळापूर्वीच एमपीएससी विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे आता सरकारच्या निर्णयावर भाजप पक्ष काय भूमिका घेणार, हेदेखील पाहावे लागेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा केवळ काही दिवसांसाठी पुढे ढकलली असून १४ तारखेनंतरच्या आठ दिवसात या परीक्षा घेतल्या जातील आणि त्याची तारीख शुक्रवारीच घोषित केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली काल ११ मार्च रोजी जनतेला संबोधत देत असताना दिली होती. तसेच परीक्षा पुढे ढकलल्याने कोणत्याही विद्यार्थ्याचे वयोमर्यादेमुळे नुकसान होणार नाही हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
