माणुसकीचे ‘मूर्तिकार’

11 Mar 2021 16:37:16

Sikvera  _1  H

कोरोनामुळे जगभरामध्ये सर्व स्तरांवर हाहाकार माजल्यानंतर हातावर पोट असणार्‍या कामगारांची तर खाण्यापिण्याची तारांबळ उडाली. जगभरात च नव्हे, तर आपल्या देशातही कोरोनामुळे गोरगरिबांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान झाले. अशामध्ये स्वतःच्या कुटुंबाची तसेच सोबत काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या आणि परिसरातील काही कुटुंबाच्या मदतीला धावून जाण्याचे काम सिक्वेरा बंधूंनी केले. तसेच आपल्या व्यवसायाचा गाडाही हळूहळू पूर्वपदावर आणण्यात ते यशस्वी झाले. तेव्हा, या मूर्तिकार बंधूंच्या कोरोना काळातील एकूणच मदतकार्याचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...
 
 
लाकडापासून हुबेहूब ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या वाटाव्यात अशा मूर्ती तयार करण्याची कला सिक्वेरा कुटुंबाला तशी जन्मतःच अवगत आहे. ’सिक्वेरा ब्रदर्स’ या नावाने ते भारतातच नव्हे, तर जगभरात सुरेख, आखीव-रेखीव लाकडी मूर्तींसाठी ओळखले जातात. मायकल सिक्वेरा यांच्यापासून मिळालेला लाकडापासून सुरेख मूर्ती घडविण्याचा अद्भुत वारसा त्यांचे नातू मिंगलेश्वर सिक्वेरा आणि बेनझोनी सिक्वेरा यांनी पुढे चालू ठेवला. सुरुवातीला लाकडापासून मूर्ती घडविणारे सिक्वेरा बंधू आता फायबर आणि धातूच्यादेखील मूर्ती तयार करु लागले. त्यांच्या मूर्तींना फक्त देशभरातूनच नाही, तर जगभरातून मोठी मागणी आहे. सिक्वेरा बंधूंनी या पारंपरिक कलेला आधुनिकतेची जोड देत, हा व्यवसाय एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. केवळ येशू ख्रिस्त, मदर मेरी यांच्याच मूर्ती नव्हे, तर गौरींच्या सुंदर मूर्ती घडविण्यातही त्यांचा हातखंडा. मुंबईनजीकच्या वसईपासून सुरू झालेल्या या व्यवसायाची ख्याती आता सातासमुद्रापार मलेशिया, कॅनडा एवढेच नव्हे, तर अमेरिकेपर्यंतही पोहोचली आहे.
 
 
फेब्रुवारी-मार्चमध्ये जगभरात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण झपाट्याने आढळून येत होते. चीनमध्ये सापडलेल्या या विषाणून हळूहळू जगभरातच नव्हे, तर आपल्या देशातही वेगाने हातपाय पसरले. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले. फेब्रुवारीपासून एप्रिल ते मेपर्यंत सर्व स्तरांवरील दळणवळणाला खिळ बसली होती. कंपन्या बंद पडल्यामुळे लाखो मजूर बेरोजगार झाले, तर अनेकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. अशी परिस्थिती असताना काहींनी गरीब, बेरोजगार आणि गरजवंतांसाठी मदतीचा हात पुढे केला. अशामध्ये सिक्वेरा बंधूंनी पुढाकार घेत पहिले कुटुंब, मग कामगार आणि नंतर समाजाचे आपण देणेकरी लागतो म्हणून ‘लॉकडाऊन’च्या काळात सर्व नियम पाळून जमेल तितक्या लोकांना मदत केली.
 
 
मार्च महिन्यात जेव्हा कोरोना महामारीचा परिणाम वाढू लागला, त्यानंतर सर्वांनाच आर्थिक तसेच मानसिक समस्यांना सामोरे जावे लागले होते. सध्याच्या घडीला ही सर्वात मोठी महामारी होती. या संकटाचा सामना कसा करायचा, हा सर्वात मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला. अचानक उद्भवलेल्या या ‘लॉकडाऊन’मुळे मजूरवर्गही गोंधळला. सर्वजणं मिळेल त्या वाहनाने किंवा पायी आपल्या मूळ गावी जाण्यास निघाले. यावेळी त्यांना धीर देऊन, काम करणार्‍या मजुरांची राहण्याची सोय सिक्वेरा बंधूंनी केली. आपल्या कर्मचार्‍यांची समजूत घालून, त्यांना आर्थिक चणचण जाणवणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली. कर्मचार्‍यांशी सुसंवाद ठेवत, त्यांचे मानसिक आरोग्य जपण्याचे कामदेखील सिक्वेरा यांनी केले. यामध्ये त्यांना कुटुंबाचीदेखील चांगली साथ मिळाली. ‘लॉकडाऊन’मुळे घरच्यांकडे लक्ष देणे, तसेच मुलांशी चांगला संवाद वाढवणे या काळात शक्य झाल्याचे सिक्वेरा बंधू आवर्जून नमूद करतात.
 
 
कोविडच्या या काळात पैसे उभे कसे करायचे? आपला व्यवसाय कसा सुरळीत ठेवायचा? यासाठी दोन्ही बंधूंनी एकत्र विचार केल्यानंतर एक मार्ग काढला. कोविडमुळे ग्राहकांच्या ऑर्डरचे कामही ठप्प पडले होते. तेव्हा सर्वप्रथम त्यांनी त्या-त्या ग्राहकांशी संपर्क साधला. या काळात त्यांच्या ग्राहकांनीही सहकार्य करत जमेल तेवढी मदत केली. ‘लॉकडाऊन’च्या दरम्यान फोनवर ग्राहकांशी संपर्क साधून, ऑनलाईन त्यांचीशी संवाद साधून डिझाईन वगैरे तयार करून घेतले. याचा परिणाम असा झाला की, ‘कोविड’नंतर जेव्हा ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरु झाली, तेव्हा पुन्हा एकदा काम सुरू करण्यास पुरेसे भांडवल आणि ऑर्डर होत्या. त्यामुळे पुन्हा त्यांना शून्यापासून सुरुवात करावी लागली नाही. ‘कोविड’मध्ये ‘डिजिटल प्लॅटफार्म’चा त्यांना चांगला उपयोग झाला. ग्राहकांशी ऑनलाईन संपर्क साधून त्यांना हव्या तशा डिझाईन्स बनवून घेणे, सर्व बँकेचे व्यवहार हे ऑनलाईन करणे, यामुळे कोरोना काळात सर्व नियमांचे पालन करत, त्यांना आपला व्यवसाय सुरळीत ठेवण्यात यश आले.
 
 
त्यानंतर वाहनांची सोय करून ग्राहकांना त्यांच्या मूर्ती घरपोच पोहोचविण्यात आल्या. तसेच, कर्मचार्‍यांनादेखील ऑनलाईन बँकिंगचा फायदा घेत पगार देण्यात आले. ऑनलाईन व्याप्ती वाढल्यामुळे परदेशातूनही त्यांना काही ऑर्डर मिळाल्या. व्यवसायवृद्धीसाठी कोरोना काळात डिजिटल प्लॅटफार्म, ग्राहकांचे तसेच कर्मचार्‍यांचे सहकार्य हे अतिशय महत्त्वाचे ठरले. आजोबांनी चालू केलेला हा व्यवसाय पुढे चालू ठेवण्यासाठी दोन्ही भावांनी संघटित होऊन कुठल्याही लोभाच्या आहारी न जाता, प्रगतिपथावर घेऊन जाण्याचा निर्धार केला. नव्या पिढीनेदेखील त्यांच्या या ध्येयाचा आदर्श घेणे गरजेचे आहे. याशिवाय, आलेल्या संकटांवर मात करून पुढे आपला व्यवसाय कसा उत्तम होईल, हेदेखील आत्मसात करणे महत्त्वाचे आहे.
 
 
कोणत्याही व्यवसायात अडचणी या न सांगताही येणारच. त्यामुळे त्या अडचणींना घाबरून न जाता, त्यांचा एकत्रितरीत्या सामना करायला हवा. या विचारांनी या दोन बंधूंनी आपला व्यवसाय सुरू ठेवला. ग्राहकांची मागणी, कर्मचार्‍यांचे वेळोवेळी पगार देऊन कुटुंबाकडेही लक्ष देण्याचे काम त्यांनी पार पाडले. या संकटकाळात एकाही कर्मचार्‍याला कामावरून कमी न करता त्यांच्या कुटुंबापर्यंत योग्य ती मदत पोहोचविण्याचे कामदेखील त्यांनी केले. याव्यतिरिक्त त्यांनी परिसरातील काही गरीब आणि गरजवंत कुटुंबांना जमेल, तशी मदत पोहोचविली. अशावेळेस कोरोना काळात माणुसकीचे दर्शन घडवणारे कौतुकास्पद काम सिक्वेरा बंधूंनी केली. विशेष म्हणजे ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मूर्ती बनवून देण्याची मागणी वाढली. मागणी वाढल्यानंतर व्यवसायही वाढला. शिवाय कोरोनामुळे बेरोजगार तरुणांना रोजगारही मिळाला. कोविड काळात त्यांनी केलेली ही कामगिरी म्हणजे कौटुंबिक व्यवसाय चालवणार्‍या, तसेच नवीन काहीतरी करू पाहणार्‍या नव्या पिढीसमोर हे एक उत्तम उदाहरण आहे.
 


VV_1  H x W: 0  
 
 
"‘लॉकडाऊन’मध्ये अनेक हातावर पोट असलेल्या कामगारांचे हाल झाले. तसेच, अनेक कुटुंबे रस्त्यावर आली. ज्यांच्या कामगिरीवर आपले घर चालते, त्यांच्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, असा विचार करून आम्ही सर्वप्रथम त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली.”




Powered By Sangraha 9.0