आम्ही घेतला ध्यास नवा!

11 Mar 2021 20:46:24


Dhamale _1  H x
 




एखादे ध्येय साध्य करण्याचे उद्दिष्ट स्वर्गीय असेल, तर त्याला दैवही साथ देते, असे म्हणतात. याची प्रचिती कोरोना महामारीच्या काळात उद्योगजगतातही प्रामुख्याने दिसून आली. कारण, कित्येक उद्योगांना आपला गाशा गुंडाळायची वेळ आली. कामगार बेकार झाले, तर कर्मचार्‍यांसमोरही जगण्याचे निर्माण झालेले आव्हान चिंतातूर करणारे होते. पण, या ‘कोविड' काळात संकटातून नियोजनबद्ध पद्धतीने मार्ग काढत, कंपनीच्या हिताबरोबरच कामगारहिताचा विचार करणार्‍या ‘सी. डी. व्हॅक्यूम इक्विपमेंट प्रा. लि.'चे संचालक सुहास ढमाले यांचा या काळातील प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.
 
 
 
 
सन १९८८ मध्ये स्थापन झालेली 'सी. डी. व्हॅक्यूम प्रा.लि.' ही कंपनी ‘हेवी इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज'ला उपयुक्त यंत्रणा पुरवते. परदेशातून आयात कराव्या लागणार्‍या मशीन्स आणि तंत्रज्ञानाला भारतीय पर्याय उपलब्ध व्हावा, या दृष्टिकोनातून नवनिर्मिती करण्यावर कंपनीचा भर असतो. कंपनीतर्फे ‘हाय व्हॅक्यूम ट्रान्सफॉर्मर फिल्टरेशन प्लांट', ‘ऑन-लाईन ट्रान्सफॉर्मर डिस्लगिंग अ‍ॅण्ड ऑईल रिजनरेशन प्लांट' आदी उत्पादनांतील अग्रगण्य कंपनी मानली जाते.
 
 
 
 
‘बीएचएल', ‘एनटीपीसी' ‘पावरग्रीड' आदी निमशासकीय व खासगी कंपन्यांसाठी उत्पादन व सेवा पुरवते. ‘लॉकडाऊन' आणि कोरोनामुळे सुहास ढमाले यांनाही इतरांप्रमाणेच उद्योगामध्ये संकटाची छाया जाणवू लागली होती. कोरोनापासून खबरदारीसाठी लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन'मुळे कंपनी बंद ठेवावी लागणार होती. ‘एमएसएमई' क्षेत्रासाठी हा मोठा धक्का होता. ढमाले यांच्याकडे एक मोठी कन्साईन्मेंट होती. ‘लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर ही ऑर्डर पूर्ण कशी करायची, हा मोठा प्रश्न होता. कंपनी बंद ठेवावी, हा विचार ढमाले यांच्यासारख्या संस्थापकाला सहन न होणारा होता. आठ दिवसांनी हळूहळू एक-एक गोष्टी स्पष्ट होत होत्या. ‘लॉकडाऊन'ची नियमावली, त्याबद्दलचे प्रारुप, मजुरांचे प्रश्न अशा असंख्य समस्या एव्हाना भेडसावू लागल्या होत्या. जर एक उद्यमी चिंतेत असेल, तर सर्वसामान्य कामगारांचे काय, याचा विचार ढमाले यांच्या डोक्यात घोळू लागला होता.
 
 
 
या कामगारांची जबाबदारी आपलीच आहे, त्यांना लागणारी सर्व मदत करण्याचा ध्यास ढमाले यांनी घेतला. एखाद्या कुटुंबप्रमुखाप्रमाणे त्यांनी सर्वांना विश्वासात घेतले. सर्वात आधी कंपनीतर्फे संपूर्ण कामगारांशी थेट संवाद साधण्यावर भर देण्यात आला. ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे कामाला सुरुवात झाली. कर्मचार्‍यांना वेगवेगळ्या कामाची जबाबदारी वाटून दिली. नवे तंत्रज्ञान शिकून ऑनलाईन पद्धतीने कुठली कामे मार्गी लावली जाऊ शकतात, याचा आढावा घेतला गेला. ‘लॉकडाऊन'च्या आठवडाभरानंतर हळूहळू कामे मार्गी लावली जाऊ लागली होती. नव्या तंत्रज्ञानाचे आकलन करण्यात आले. दैनंदिन कामाची पुनर्रचना करण्यात आली. याचा फायदा झाला असा की, जो कोविड काळातील प्रलंबित राहिलेला कामांचा टप्पा आहे तो मार्गी लागला. याचे संपूर्ण श्रेय 'सी. डी. व्हॅक्यूम प्रा. लि.'च्या कर्मचार्‍यांना जाते, असे ढमाले म्हणतात.
 
 
 
कोविड काळात कर्मचारी, मनुष्यबळ किंवा हीच ‘आपली माणसे' कंपनीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. आता टप्प्याटप्प्याने कामगारांना ऑफिसमध्ये बोलवण्याची प्रक्रिया सुरू करण्याची गरज होती. सरकारतर्फेही या परवानग्या दिल्या जात होत्या. यानंतर खरे आव्हान होते. ‘वर्क फ्रॉम होम' तर नियोजित पद्धतीने सुरू होते. मात्र, उत्पादनांच्या निर्मितीसाठी कामगारांना कंपनीत घेऊन येणे गरजेचे होते. त्यासाठी कर्मचार्‍यांचा विश्वास जिंकणे गरजेचे होते.
 
 
 

Dhamale _2  H x 
 
 
परराज्यांतील मजुरांचा प्रश्न हा ढमाले यांनाही भेडसावणारा होता. प्लांटमध्ये कार्यरत असणार्‍या अनेकांना आपल्या मूळ राज्यात जाण्याचे वेध लागले होते. अचानक लागलेल्या ‘लॉकडाऊन'मुळे काही दिवसांचे वेतन थकले होते. त्यांची समस्या जाणून घेत ढमाले यांनी या प्रकारात जातीने लक्ष घातले. त्यांना दोन वेळचे जेवण, अन्नधान्याचे किट्स व नाश्त्याची सोय करून दिली. दोन महिन्यांचे वेतनही दिले. त्यानंतर या कर्मचार्‍यांनी पुन्हा गावी जाण्याचा आपला निर्णय बदलला. यामुळे ‘लॉकडाऊन'च्या काळात कंपनीला अपुर्‍या मनुष्यबळाचा सामना करावा लागला नाही.
 
 
ढमाले व संचालक नितीन ढमाले यांनी स्वतः पुढाकार घेऊन कार्यालयात उपस्थिती लावली. कोरोना काळ असला तरीही घरी बसून वाट पाहणे शक्य नव्हते. त्यामुळे ज्या काही आवश्यक परवानग्या घेऊन कार्यालये सुरू करता येतील, त्यानुसार हा दिनक्रम ठरवण्यात आला. हळूहळू कर्मचार्‍यांनी कार्यालयात येण्यासाठी विचारणा केली होती. दि. ४ मे, २०२० पासून कंपनी नियमांनुसार सुरू करण्यात आली. दोन दिवस आधीपासून सॅनिटायझेशन, ‘सोशल डिस्टन्सिंग'ची व्यवस्था, मास्क आणि ऑक्सिमीटर आदी यंत्रणांनी कार्यालये, प्लांट सुसज्ज ठेवण्यात आले.
 
 
या सर्व गोष्टींचे चित्रीकरण करून कर्मचार्‍यांपर्यंत पाठवण्यात आले. सुरक्षा हेच प्रमुख उद्दिष्ट ठेवून काम सुरू करण्यात आले. यानंतर हळूहळू स्वतःहून कामावर येणार्‍यांची उपस्थिती वाढत गेली. सर्वांच्या प्रवासाची व्यवस्था कंपनीतर्फे करण्यात आली. ‘सोशल डिस्टन्सिंग'चे पालन करण्यात आले. त्यामुळे सर्व कर्मचार्‍यांनी आपली जबाबदारी ओळखून या काळातील आव्हाने यशस्वीपणे पेलली. अशाप्रकारे संकटातून संधी शोधून ‘आत्मनिर्भर भारत', ‘व्होकल फॉर लोकल' हा मंत्र ढमाले यांनी जपला.
 
 
महत्त्वाची बाब म्हणजे, कोरोनापूर्वीचा कालखंड व कोरोनानंतरचा काळ अशा दोन टप्प्यांमध्ये विभागणी करत विचार केला असता, आताचा काळ हा कंपनीसाठी फारच उत्साह देणारा ठरला. कोरोनासोबत काम करण्याची सवय प्रत्येक कर्मचार्‍याने लावून घेतली. याच काळात राज्यात रक्ताचा तुटवडा भासू लागला होता. राज्य सरकारतर्फे रक्तदान करण्याची मागणी वाढू लागली होती. कंपनीतील सर्व कर्मचार्‍यांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबीर राबविले. यामुळे या भागांमध्ये जाणवणार्‍या रक्ताच्या तुटवड्याचा प्रश्न मिटवण्यासाठी हातभार लावता आला.
 
 
वडील सोपानराव ढमाले, आई सुमन ढमाले, पत्नी सुजाता ढमाले व वहिनी डॉ. नीलम ढमाले आदी कुटुंबीयांचा या संकटकाळात खंबीर पाठिंबा लाभला. कोरोना आकडेवारी वाढत होती. मृत्यू पावणार्‍यांच्या संख्येने अनेकांच्या मनात चिंतेचेवातावरण होते. या सगळ्यात कुटुंबाचे पाठबळ महत्त्वाचे ठरले.
 
 
"मनात जिद्द असेल तर कुठल्याही संकटावर मात करता येते. ध्येयनिश्चिती असलेल्या व्यक्तीला मेहनत केल्यावर ईश्वरही मार्ग दाखवतो. त्यानुसार तरुणांनी व नवउद्यमींनी या वाटेवर चालायला हवे, तरच यश तुमच्या पायाशी लोळण घालेल. देशाप्रति आपली जबाबदारी ओळखून त्यासाठीही योगदान द्यायला हवे, असा संदेश ढमाले यांनी दिला आहे.कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले देशाचे नेतृत्व, देशवासीयांना दिलेला आधार, त्यांनी उद्योगांसाठी दिलेले पाठबळ व ‘आत्मनिर्भर भारत' निर्माण करण्याचे स्वप्न या गोष्टींमुळे कोरोना काळातही कार्यरत राहण्याची प्रेरणा मिळाली."





Powered By Sangraha 9.0