संकटाचा धीराने सामना करणारा उद्योजक

11 Mar 2021 19:14:44

viajy lagad_1  


कोरोनाचे संकट हे जगभर फैलावले होते. आजाराचे नेमके स्वरूप काय आहे, हेच प्रथम समोर येत नव्हते, तसेच उपचार उपलब्ध नसल्याने सजगता बाळगणे हाच एकमेव पर्याय होता. त्यामुळे या संकटाचा सामना करण्यासाठी केवळ धैर्यशील वृत्ती आणि संयम हेच दोन मार्ग समोर दिसत होते. नाशिक येथील अंबड औद्योगिक वसाहतीत असलेल्या ‘सुपरनोव्हा इलेक्ट्रोटेक प्रा. लि. व सुपरनोव्हा वॉटरजेट’ या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत असलेल्या विजय लगड यांनी वरील दोन्ही मार्गांचा अवलंब करीत उद्योगभरारी घेतली. त्याची ही कहाणी...


ज्या व्यक्तीवर आपल्यासह अनेक कुटुंबांचीही जबाबदारी आहे, अशा व्यक्तींना अर्थात उद्योजकांना कोरोनाचे संकट हे हिमालयाएवढेच मोठे होते. नाशिक येथील अंबड औद्योगिक वसाहतीत असलेल्या ‘सुपरनोव्हा इलेक्ट्रोटेक प्रा. लि.’ व ‘सुपरनोव्हा वॉटरजेट’ या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत असलेल्या विजय लगड यांची स्थितीही अशीच काहीशी होती. मात्र, शांत आणि संयमी स्वभाव, परिस्थितीचे आकलन करण्याची अंगभूत असलेली क्षमता आणि धैर्यशील वृत्ती यामुळे या संकटाचा आणि यातून समोर आलेल्या आव्हानांचा सामना करणे लगड यांना शक्य झाले. हे कार्य इतके सहज नक्कीच नव्हतेच, मात्र अशक्यदेखील नव्हते. त्यासाठी आधी नमूद केल्याप्रमाणे व्यक्ती स्वभाव आणि वृत्ती यांची नितांत आवश्यकता होती.याचनुसार कार्य करत, कोरोना काळातील संकटाचा लगड यांनी धीराने सामना केला. सन १९९८ पासून उद्योग-व्यवसायात असलेल्या विजय लगड यांना आजवर अनेक आव्हानांचा उद्योगात सामना करावा लागला. मात्र, कोरोना व त्यापश्चात जाहीर करण्यात आलेले ‘लॉकडाऊन’ यामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचे स्वरूप हे काहीसे वेगळे आणि अचानक समोर आले होते.
नाशिक येथे औद्योगिकीकरण झाल्यावर येथे कामगार वसाहती निर्माण झाल्या. येथे येणारे बव्हंशी कामगार हे बाहेरगावावरून आलेले होते. त्यामुळे ते भाड्याच्या घरातच वास्तव्यास होते. ‘लॉकडाऊन’ जाहीर झाल्याने ते सर्व कामगार आपल्या गावी परतले. त्यामुळे कारखान्यात काम करण्याकामी मनुष्यबळाची मोठी वानवा जाणवत होती. त्यातच ग्राहकांचे अनेक प्रकल्प खोळंबले होते व वितरण बंद झाल्याने लगड यांना आर्थिक चणचण मोठ्या प्रमणात जाणवत होती. एकीकडे ज्या ऑर्डर हातात होत्या, त्यासाठी कच्च्या मालाची उपलब्धता नव्हती. अशा विविध आव्हानांचा सामना विजय लगड यांना या काळात करावा लागला. या आव्हानाचा सामना करण्यासाठी लगड यांनी कामगारांशी संवाद साधण्यावर भर दिला. कामगारांशी चर्चा करुन त्यांनी त्यांना कामावर हजर होण्याबाबत विचारणा केली. तसेच, अनेक कामगारांना त्यांनी आर्थिक मदत करत त्यांचा बोजा हलका करण्याचा प्रयत्न केला. तसेच आर्थिक ताण हलका व्हावा व उद्योगाचे चलनवलन सुरळीत राहावे, यासाठी त्यांनी ‘सिडबी’मार्फत कर्ज घेतले. त्यामुळे आवश्यक कामांसाठी त्यांना भांडवल उपलब्ध झाले. आर्थिक भांडवल उपलब्ध झाल्याने कच्च्या मालाच्या अनुपलब्धतेमुळे काम थांबू नये, यासाठी लगड यांनी अधिकचा कच्चा माल खरेदी करुन ठेवला. त्यामुळे आगामी काळात त्यांच्या उत्पादन प्रक्रियेत खंड पडला नाही.

विश्वास हा मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. संस्थात्मक कार्य करत असताना आपल्या सहकारी वर्गावर आपण विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. प्रखर आत्मविश्वास असल्यास व्यक्ती अशक्यही शक्य करू शकतो.


विजय लगड हे आपल्या कर्मचारीवर्गाकडे आपली कौटुंबिक जबाबदारी म्हणूनच पाहतात. त्यामुळे आपल्या कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी त्यांनी आरोग्यविषयक काळजी घेतली. तसेच कामगारांचे आर्थिक नुकसान होऊ नये व त्यांना त्यांचे जीवनमान व्यवस्थित व्यतीत करता यावे, यासाठी सर्व कामगारांना वेळेत व ‘लॉकडाऊन’च्या काळातील वेतनही देऊ केले. सर्व काळजी घेऊनसुद्धा त्यांच्या कारखान्यातील पाच कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली. त्या कर्मचार्‍यांना आवश्यक ती सर्व प्रकारची वैद्यकीय साहाय्यता मिळविण्याकामी लगड यांनी प्रयत्न केले. त्यांना मानसिक व आर्थिक आधार दिला, ते कर्मचारी आजही लगड यांच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. तसेच या काळात शासनाच्या सर्व करांचा भरणा वेळेत करत, त्यांनी या काळात राष्ट्रीय कर्तव्यही बजावले.कर्मचारी हे आपले कुटुंब आहेच, मात्र आपण समजाचेही काही देणे लागतो, ही जाणीव विजय लगड यांच्या मनात कायम होती. याच भावनेतून त्यांनी अनेक सेवाभावी संस्थांना आर्थिक मदत केली. तसेच कामगार हादेखील एक नागरिक आहे आणि तोदेखील समाजात वावरतो. त्यामुळे त्यांचे समुपदेशन करण्यावर व त्यांना कोरोनाबाबत माहिती देण्याचे कार्यदेखील विजय लगड यांनी केले. त्यांच्या या कार्यामुळे कामगार कुटुंबाचा आत्मविश्वास वाढला व हा अनुभव त्यांना सद्गतीत करणारा ठरला. उद्योग-व्यवसाय सांभाळणार्‍या उद्योजकाचे कौटुंबिक भावविश्वही असतेच. संकट काळात कुटुंबाचा मिळणारा पाठिंबा हा सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. विजय लगड यांच्या पत्नी शिल्पा लगड यांनी कारखान्याचे उत्पादन व जबाबदारी सांभाळली. त्यामुळे त्यांच्या पत्नीची त्यांना उत्तम साथ या काळात लाभली. कारखान्यात कामगार कमी असल्याने आणि काम करणे आवश्यक असल्याने वेळप्रसंगी लगड यांनी कारखान्यातील यंत्र स्वत: चालवत कारखान्याचे काम सुरळीत सुरू ठेवण्यास प्राधान्य दिले.


lagad_1  H x W:

कोरोना काळाने जगाने अनेक बाबी शिकविल्या. त्यातच भारत आता आत्मनिर्भरतेकडे जात आहे. त्यामुळे आगामी काळात संपूर्ण भारतीय बनावटीच्या उत्पादनाची निर्मिती करण्याचा लगड यांचा मनोदय आहे. हा केवळ मनोदय नसून, असे उत्पादन येणार्‍या वर्षभरात साकारण्यात येणार असल्याची माहिती लगड देतात. यामागे मनस्वी असणारे देशप्रेम आणि भारतीय उद्योगांना चालना देणे हीच भावना असल्याचे ते आवर्जून नमूद करतात. संवादात्मक पद्धतीने कामगारांशी हितगुज करून लगड यांनी मोठ्या धीराने कोरोनामुळे निर्माण झालेल्या ‘लॉकडाऊन’मधील अडचणींवर मात केली. तसेच, केवळ स्वहित न जोपासता, कामगारांना आपल्या कुटुंबातील एक सदस्य मानून त्यांना मदत केली, तसेच रखडलेले व्यवहार सुरळीत आणण्याबरोबरच ‘आत्मनिर्भरते’कडे वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे. धीराने आणि संयमाने मोठ्यात मोठ्या अडचणीवर मात करता येते, हेच विजय लगड यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. त्यामुळे आगामी काळात विजय लगड हे अनेकांसाठी पथदर्शक म्हणून उत्तम उदाहरण ठरतील, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.


Powered By Sangraha 9.0