कर्मचारी आणि पर्यावरणस्नेही उद्योजक

11 Mar 2021 19:26:31

gokhale_1  H x


‘कोविड’ महामारी आणि ‘लॉकडाऊन’मुळे उद्योगधंदे ठप्प पडल्यामुळे, दळणवळण एकाएकी कमी झाल्याने पर्यावरण काहीसे सुधारल्याचे आपण वाचले, ऐकलेही असेल. पण, या महामारीच्या संकटकाळात कर्मचारी वर्गाबाबत स्नेहमय धोरण आखत असतानाच, आपण पर्यावरणाचे देखील रक्षण केले पाहिजे, असा ध्यास उद्योजक विनायक विश्वनाथ गोखले यांनी घेतला. त्या अनुषंगाने त्यांचे कार्यदेखील सुरु आहे. कोरोना काळात आपला उद्योग-व्यवसाय सुरु ठेवत, कंपनीबरोबरच आपल्या कर्मचार्‍यांची काळजी गोखले यांनी कशी घेतली, याचा मागोवा घेणारा हा लेख...


कोरोना काळात ‘सामूहिक प्रयत्न’ आणि साथ हेच खर्‍या अर्थाने या आजाराशी सामना करण्याचे साधन होते. येथे ‘सामूहिक प्रयत्न’ याचा अर्थ मानवी समूहाने आवश्यक त्या शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करणे, या अर्थी. कोरोनाच्या भीषणतेमुळे आणि ‘लॉकडाऊन’मुळे अनेकांना विविध अडचणी आणि समस्यांचा सामना करावा लागत होता. उद्योग क्षेत्रदेखील यात मागे नव्हते. त्यावेळी उद्योग क्षेत्राच्या नेहमीच्या कार्यपद्धतीत आणि कर्मचारी वर्गाच्या नियोजनाबाबत बदल होणे अगदी स्वाभाविक होते. मात्र, हा बदल कर्मचारी वर्गास अनुकूल असा होणे आणि तो मानवी मूल्यांची, भावनांची जपणूक करणारा असावा, यासाठी कटाक्ष ठेवणे आवश्यक होते. नाशिक येथील अंबड औद्योगिक वसाहतीत असलेल्या विनायक गोखले यांनी आपल्या ‘शामला इलेक्ट्रो-प्लेटर्स’ या कंपनीत कर्मचारीस्नेही धोरण आखून त्याची अंमलबाजावणी केली. तसेच कर्मचारी व कामगार वर्गास केंद्रस्थानी ठेवून संकटाचा सामना करण्याची योजना आखण्यात आली.या कंपनीच्या माध्यमातून मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल क्षेत्रातील विविध उत्पादनांसाठीच्या भागांना ‘प्लेटिंग’ करण्याचे काम केले जाते, जेणेकरून त्या भागांचे आयुष्य वाढण्यास मदत होते. तसेच, त्यामुळे उत्पादनाची कार्यक्षमतादेखील वाढण्यास मदत होत असते.


‘शामला’मध्ये मुख्यत्वे ‘जॉब वर्क’ची कामेही केली जात असतात. त्यामुळे ‘सर्व्हिस इंडस्ट्री’ या प्रकारात ‘शामला’चा खर्‍या अर्थाने समावेश होतो. सेवाक्षेत्रात ही कंपनी कार्यरत असल्याने इतर उद्योगांवर ही कंपनी आधारित आहे. त्यामुळे इतर उद्योगांना पूरक असेच कामाचे स्वरूप या कंपनीचे असल्याने कोरोना काळात जाहीर करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे मुख्य उद्योग बंद असल्याने त्याचा पूरक उद्योगास फटका बसला, तसाच फटका हा ‘शामला’लादेखील बसला. मनुष्यबळ उपलब्ध असूनदेखील त्यांच्या हाताला काम नसणे, हे एक मोठे आव्हान या काळात गोखले यांच्या समोर होते. काही कंपन्यांमध्ये जिथे मनुष्यबळाची वानवा होती, तिथे गोखले यांच्याकडे पूरक उद्योग असल्याने कामाची तत्काळ उपलब्धता नसणे, असे चित्र होते. कोणत्याही उद्योजकास अशावेळी काम न करता आर्थिक देयके अदा करण्याचे एक मोठे आव्हान पेलावे लागले. तसेच आव्हान गोखले यांना या काळात पेलावे लागले. तसेच, उपलब्ध मनुष्यबळाच्या कौशल्याचा विकास कसा करावा, हादेखील प्रश्न गोखले यांच्या समोर यावेळी उभा ठाकला होता.

उद्योग-व्यवसाय वाढवत असताना उद्योजकाने प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी कंपनीच्या मालकाने खर्च करावा. कोरोनामुळे माणसाला नेमक्या गरजा लक्षात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यातील नियोजन करताना सजगता बाळगणे आवश्यक आहे.


अशा वेळी गेली अनेक वर्षे आपल्यासाठी अविरत मेहनत घेणार्‍या कर्मचारी वर्गास सांभाळण्यास गोखले यांनी प्राधान्य दिले. स्थिती सुधारताच काम येणार होते. त्यासाठी गोखले व त्यांचा कर्मचारी चमू सज्ज होता. काम येणार याची खात्री होती; परंतु, कधी येईल याची कोणतेही ठोस कालमर्यादा दिसत नव्हती. त्यामुळे गोखले यांनी बाहेरगावच्या कामगार वर्गाची निवासव्यवस्था करत त्यांना पौष्टिक अन्न उपलब्ध करून दिले, ज्यायोगे या कामगार वर्गाचे आरोग्य हे उत्तम राहण्यास मदत होईल, याची काळजी गोखले यांनी घेतली. आपल्या कारखान्यातच गोखले यांनी विविध अन्नपदार्थ उपलब्ध करून देत, आपल्या कर्मचारी वर्गाच्या आरोग्याचे रक्षण करण्यास प्राधान्य या काळात दिले. कोरोनाचे भीषण संकट घोंगावत असताना प्रचंड आर्थिक ओढाताणीचा सामना गोखले यांना करावा लागला. अशा परिस्थितीतदेखील गोखले यांनी कोणत्याही कर्मचार्‍यास कामावरून कमी केले नाही. तसेच, सर्व कर्मचारी व कामगारांचे वेतन वेळेवर अदा केले. गोखलेंचा कर्मचारी वर्गाप्रति असणारा हा स्नेहभाव लक्षात घेऊनच कर्मचारी वर्गाचेदेखील गोखलेंना सहकार्य लाभले. कंपनीस कामांची ‘ऑर्डर’ प्राप्त होण्यास सुरुवात झाल्यावर कामगारांनी दिवस-रात्र मेहनत घेत कामास सुरुवात केली. याकाळात कोणताही ‘ओव्हर टाईम’ या कर्मचारी वर्गाने गोखले यांच्याकडे मागितला नाही, हे विशेष!

gokhale_1  H x


राष्ट्रीय कर्तव्यामध्ये कोणतीही कसूर राहू नये, यासाठी ‘लॉकडाऊन’ असतानादेखील गोखले यांनी आपला सर्व करभरणा अगदी वेळेत केला. तसेच, वीजबिलाबाबत सरकारचा काय निर्णय येईल, याची प्रतीक्षा न करता, वेळच्या वेळी वीजबिलाची रक्कमही त्यांनी अदा केली. कोरोना काळात नागरिकांच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या माध्यमातून जे कार्य या काळात केले गेले, त्यास आर्थिक मदत देण्याचे कार्यदेखील गोखलेंनी या काळात केले. खात्रीशीर ठिकाणी मदत केल्यास ती मदत योग्य त्या ठिकाणी अवश्य पोहोचते, यावर गोखलेंचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे गोखले यांनी जनकल्याण समितीमार्फत मदत करण्याचे ठरविले होते. गोखलेंना या काळात एक भावनिक प्रसंग अनुभवास आला, जो त्यांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहील. त्यांचे ‘कर्मचारी प्रॉडक्शन इन्चार्ज’ राजेंद्र मोरे यांनी स्वतःहून सांगितले की, “गोखले यांनी एखाद्या कुटुंबप्रमुखाप्रमाणे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली.”

मोरे सांगतात की, “त्यांच्या पत्नींना या काळात आरोग्यसमस्यांचा सामना करावा लागला. त्यावेळी आर्थिक आणि मानसिक आधार देत गोखलेंनी आपल्यातील ‘माणसा’चे दर्शन या काळात घडविले, असेच म्हणावे लागेल. गोखले यांच्या कुटुंबातील सदस्यदेखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. गोखले यांच्या कन्या अ‍ॅड. ऊर्जिता गोखले या व्यवसायाने विधिज्ञ आहेत. त्यांनी गोखले यांना वेळोवेळी सरकारी सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वांबाबत माहिती दिली. तसेच, आवश्यक त्या विविध परवानग्या मिळवण्यासाठी त्यांनी मोलाचे सहकार्य गोखलेंना केले. कोणताही व्यवसाय हा आपल्या उत्पादनाच्या मागे ‘वेस्टेज’ मोठ्या प्रमाणात निर्माण करत असतो. त्यामुळे प्रदूषणाच्या अनेक समस्या निर्माण होत असतात. या ‘वेस्टेज’ची पुनर्प्रक्रिया होणे नक्कीच आवश्यक आहे, असे गोखले यांचे स्पष्ट मत आहे. गोखले यांच्या कंपनीत पाण्याचा वापर हा होत असतो. या पाण्याचे प्रदूषण दूर करण्यासाठी त्यांनी पाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. उद्योगविश्वाचा विस्तार करत असताना निसर्गदेखील अबाधित राखणे, हे सर्वांचे कर्तव्य आहे, असे गोखले यांचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे आपल्या कार्याच्या माध्यमातून गोखलेंनी कर्मचारी आणि पर्यावरण अशा दोहांशी स्नेहभाव वृद्धिंगत करण्याचे धोरण अंगीकारले आहे, असेच दिसून येते.
Powered By Sangraha 9.0