कुठलाही उद्योग-व्यवसाय हा एकट्याच्या बळावर वृद्धिंगत होत नसतो, तर एकूणच समूहशक्तीचे बळ उद्योगविकासाला कारणीभूत ठरते. कोरोना महामारीच्या संकटकाळात नेमकी हीच बाब हेरुन ‘सीनर्जी स्टॅम्पिंग्ज’चे निखिल ओमप्रकाश तापडिया यांनी अर्थोअर्थी आपल्या कंपनीतील ‘सीनर्जी’चे दर्शन घडविले आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसूनही आले. तेव्हा, कामगारहिताबरोबरच समाजहिताचाही विचार करुन, या महामारीच्या संकटात गरजूंना मदतीचा हात देणार्या या ‘कोविड योद्धा’ ठरलेल्या उद्योजकाची ही गौरवगाथा...
उद्योग-व्यवसाय हा कितीही मोठा असो किंवा छोटा त्याची प्रगती हे सामूहिक कार्यप्रणालीवरच अवलंबून असते. कोरोना काळात ‘लॉकडाऊन’मुळे सामूहिकरित्या एकत्र येण्यावरच निर्बंध टाकण्यात आले होते. त्यामुळे सामूहिक कार्यावर अवलंबून असणार्या उद्योगांसमोर काम कसे सुरू ठेवावे, हेच एक मोठे आव्हान निर्माण झाले होते. अशा वेळी आपल्या कामगारांना समजून घेणे, त्यांच्या पाठीशी उभे राहणे अत्यंत आवश्यक होते. नाशिक येथील अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये कार्यरत असलेल्या ‘सीनर्जी स्टॅम्पिंग्ज’ या निखिल तापडिया यांच्या कंपनीत कोरोना काळात कामगार वर्गाचे हित जोपासण्यास सर्वप्रथम प्राधान्य देण्यात आले. ‘कामगारांचे हित’ याचा अर्थ त्यांना त्यांच्या नोकरीच्या शाश्वततेची हमी देणे, त्यांना आर्थिक पाठबळ देणे आणि त्यांचे मनोधैर्य कमी होणार नाही, याची काळजी घेणे आदी प्रकारचे कार्य होय. कोरोना, ‘लॉकडाऊन’ काळात तापडिया यांनी हे कार्य अगदी निष्ठेने आणि आपुलकीने पार पाडले. ‘लॉकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर या कंपनीत काम करणारा कामगार वर्ग हा त्यांच्या मूळ गावी परराज्यात निघून गेला होता. त्यामुळे कामगारांची कमतरता तापडिया यांना प्रकर्षाने जाणवत होती. तसेच, ज्या कंपनीसाठी तापडिया यांची कंपनी काम करते, त्या कंपनीचे उत्पादन या काळात बंद असल्याने अनेकविध आर्थिक अडचणींचादेखील त्यांना सामना करावा लागला.‘लॉकडाऊन’मुळे कंपनी बंद असल्याने या काळात तापडिया यांनी आपल्या कंपनीच्या भविष्यकालीन नियोजनावर अधिक भर दिला. त्यादृष्टीने चर्चा व विचारमंथन करत, त्यांनी आपली भविष्यकालीन धोरणे आखण्यास प्राधान्य दिले. हा विचार करत असताना कोरोना काळ आणि ‘लॉकडाऊन’ यामुळे सर्वात जास्त त्रास या कामगार वर्गास होणार, याची कल्पना तापडिया यांना या काळात आली. तसेच, कामगार वर्गास येणार्या आर्थिक अडचणींची कल्पनादेखील त्याचवेळी तापडियांना आली. त्यामुळे ज्या कोणत्याही कामगारास कोणत्याही स्वरूपाची अडचण असेल, त्या कामगाराने थेट कंपनीच्या संचालकास ‘एसएमएस’ पाठवावा, असा निरोप तापडिया यांनी सर्व कामगार वर्गापर्यंत पोहोचविला.
तसेच कामगारांना येणारी आर्थिक अडचण लक्षात घेत, आपल्या कंपनीतील कामगार वर्गास एक तृतीयांश पगार तापडिया यांनी महिना पूर्ण होण्यापूर्वीच अदा केला. त्यामुळे येथील कामगार वर्गास आपल्या गरजांची पूर्तता करणे सहज शक्य झाले. कामगार वर्गाप्रति अशा प्रकारे आपुलकीचे आणि पालकत्वाचे धोरण तापडिया यांनी अंगीकारल्यामुळे जेव्हा कंपनी सुरू झाली, तेव्हा हाच कामगार वर्ग तातडीने कामावर रुजू झाला. या काळात तापडिया यांनी आपल्या कोणत्याही कर्मचार्यास कोरोनाची बाधा होणार नाही, याची दक्षता घेत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले. तसेच आपल्या कंपनीत कार्यरत ५१ कामगारांना तापडिया यांनी दोन भागात विभागले आणि त्यांचे वेळेनुसार कार्यनियोजन आखले. आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी तापडिया यांनी स्वतःच्या वैयक्तिक बचतीतून कर्मचारी वर्गास वेतन अदा केले. तसेच, आपल्या कर्मचार्यांच्या घरातील चूल पेटती राहावी, यासाठी तापडिया यांनी आपल्या कर्मचारी वर्गास अन्नधान्याचेदेखील वाटप या काळात केले. तसेच, पहिले दोन महिने ५० टक्के पगाराचे वाटप करत, त्यांचे आर्थिक चलनवलन सुयोग्य पद्धतीने सुरू राहील, याची दक्षतादेखील तापडिया यांनी घेतली. साधारण ‘लॉकडाऊन’च्या तिसर्या महिन्यानंतर तापडिया यांना बँकेचे आर्थिक सहकार्य मिळण्यास सुरुवात झाली.
वाईट परिस्थितीत आपण जे कार्य करतो, त्याकडे आपण कायम लक्ष ठेवल्यास कालांतराने तीच गोष्ट आपणास नवीन संधीचे दालन खुले करुन देते. संकटांचा सामना विवेकाने आणि धैर्याने करावा.
संकट हे जरी त्रासदायक असले तरी, त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास ते एक संधी म्हणून समोर येत असते. तसेच, संकट काळात सर्वांना समजून घेतल्यास तेच लोक संकट पश्चात आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत असतात. तापडिया यांच्या बाबतीत नेमके हेच घडले. संकट काळात त्यांनी भविष्याचे नियोजन करत संकटाचे संधीत रूपांतर केले. तसेच, तापडिया यांनी या काळात आपल्याशी संलग्न कंपन्यांना विश्वासात घेतल्याने, त्या कंपन्या आता तापडिया यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या आहेत. त्यामुळे तापडियांना प्राप्त होणार्या ऑर्डर्सची संख्यादेखील द्विगुणित होण्यास सुरुवात झाली आहे. तापडिया हे जसे आपल्या कर्मचारी वर्गाप्रति कणव भावना राखून होते, तसेच ते त्या काळातील सामाजिक दृश्य पाहूनदेखील व्यथित झाले. अनेक अन्य राज्यातील कामगार रोजगार गमवावा लागल्याने या काळात पायी प्रवास करत आपल्या गावी निघाले होते. त्यावेळी हा जत्था नाशिक शहरातूनदेखील मार्गक्रमण करत असे. अनवाणी चालणार्या या पावलांना पादत्राणांच्या रूपाने ऐन उन्हाळ्यातील चटके हलके होण्यास यामुळे मदत झाली. यावेळी सुखवस्तू कुटुंबातील अनेक नागरिक हे अनवाणी चालत आहेत, हे पाहून तापडिया यांचे मन अक्षरश: हेलावले होते.
कंपनी बंद असल्याने तापडिया यांची प्राप्ती जवळपास शून्य अशीच होती. मात्र, खर्च तुलनेने दुप्पट होते. स्वतःची बचतदेखील कामगार वर्गाला अर्थसाहाय्य करण्यासाठी खर्ची करण्यात आली होती. अशावेळी तापडिया यांच्या कुटुंबाने त्यांना मोलाची साथ दिली. त्यांच्या लहान मुलाने आपला पैशांचा गल्ला फोडत, त्यातील रक्कम तापडिया यांना मदतीसाठी देऊ केली. कोरोना काळात केलेल्या भविष्यातील विचारानुसार सध्या चालू असलेल्या आपल्या व्यवसायात वृद्धी करण्याचा मानस तापडिया यांचा आहे. त्यादृष्टीने नाशिक जवळील सिन्नर येथे ते आपला उद्योग-व्यवसायाचा विस्तार करणार आहेत. त्यासाठी एका मोठ्या भागीदार समवेत त्यांची करार प्रक्रिया सुरु असल्याचे तापडिया सांगतात.आपला कामगार हा आपल्या कुटुंबातील एक भाग आहे, याच जाणीवेतून तापडिया यांनी कामगारांची काळजी घेतली. तसेच, केवळ आपल्या उद्योगापुरते सीमित न राहता, त्यांनी पादचार्यांनादेखील मदत केली. घरातील मोठ्या व्यक्तीचे वर्तन हे लहानग्यांसाठी कायमच अनुकरणीय ठरत असते. तापडिया यांचे काम त्यांचा मुलगा या काळात सांभाळत होता. त्यानेदेखील आपले योगदान म्हणून खारीचा वाटा उचलण्याचा मनोदय व्यक्त केला. एकंदरीतच संस्कार आणि मानवी मूल्यांची जोपासना करणारा तापडिया यांचा पाया भक्कम असल्याने, ते खर्या अर्थाने मानवी भावनांची जोपासना करणारे उद्योजक आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.