जेमतेम बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन ‘ऑफीस बॉय’ ते यशस्वी उद्योजक बनलेले ‘मिलिकॉन कन्सल्टंट इंजिनिअर्स प्रा. लि.’चे व्यवस्थापकीय संचालक (एम.डी) मिलिंद चंद्रकांत बेळंमकर यांची भरारी अचंबित करणारी आहे. किंबहुना, पडेल ते काम करून स्वतःचा उद्योग देश-परदेशात भरभराटीस आणल्याने ‘मिलिकॉन’चे मिलिंद बेळंमकर उद्योजकांसाठी ‘आयकॉन’ ठरले आहेत. कोरोनाच्या काळातही त्यांनी सक्षमपणे कंपनीच्या नेतृत्वाची धुरा पेलली. याकामी त्यांना आपल्या कर्मचार्यांचीही मोलाची साथही लाभली. परिणामी, उद्योगहिताबरोबरच कर्मचार्यांचे हितही जपणार्या बेळंमकर यांची ही उद्यमगाथा...
उउस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील बेळंब या दुर्गम खेडेगावात जन्मलेले मिलिंद चंद्रकांत बेळंमकर यांचे बालपण मुंबईच्या चेंबूरमधील वाशीनाका झोपडपट्टीत गेले. तेथील वातावरणाप्रमाणे मिलिंद यांचे शिक्षण सातवीपर्यंत सरकारी शाळेत आणि बारावीपर्यंत जवाहर विद्यालय, चेंबूर मुंबई येथे झाले. बारावीनंतर हलाकीच्या परिस्थितीमुळे पुढील शिक्षणाचे बारा वाजले. काही कारणास्तव शिक्षण घेऊ न शकल्याने, ‘टाटा पॉवर हाऊस लिमिटेड’मध्ये ‘ऑफिस बॉय’ म्हणून करिअरला त्यांनी सुरुवात केली. हे काम जेमतेम नऊ महिने केले आणि तिथेच त्यांच्या पुढील शिक्षणाचा व करिअरचा प्रारंभ झाला.
त्या ऑफिसमधून ‘ड्राफ्ट्समन’ म्हणजे काय, हे त्यांना समजल्याने काम करता करता ‘ड्राफ्ट्समन’चा कोर्स प्रथम श्रेणी मिळवत पूर्ण केला. कोर्स पूर्ण करत असताना ‘हिंदुस्थान पेट्रोलियम लिमिटेड चेंबूर’मध्ये जवळजवळ तीन वर्षे ‘हेल्पर’ म्हणून ‘इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर’कडे काम केले. त्यातच वडिलांचे निधन झाल्याने, किंबहुना कुटुंबात मोठा मुलगा असल्याने मिलिंद यांच्यावरच सर्व जबाबदारी आली. वडिलांच्या जागेवर त्यांना नोकरी लागली खरी. पण, त्यांचे मन काही त्या नोकरीत रमत नव्हते.
त्यांना नेहमी वाटायचे की, आयुष्यात काहीतरी वेगळे करायचे आहे. म्हणून घरच्यांचा विरोध असूनही वडिलांच्या जागेवरील ‘पर्मनंट’ नोकरी लाथाडून, त्यांनी ‘ड्राफ्ट्समन’ म्हणून कामाला सुरुवात केली आणि तिथेच त्यांच्या करिअरला कलाटणी मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. सुरतची ‘एस्सार स्टील’, ‘विक्रम इस्पात’, ‘रिलायन्स पेट्रोलियम’ याठिकाणी त्यांनी काम केले. हाताशी कुठलाही डिप्लोमा, डिग्री नसल्यामुळे प्रमोशनमध्ये आडकाठी आली. दरम्यान, सौदी अरब येथे त्यांना काम मिळाले. तिथे दोन वर्षे काम केल्यानंतर भारतात परत येऊन व्यवसाय करण्याच्या निश्चयाने सन २००० मध्ये त्यांनी आपल्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली.
२००५ साली ‘मिलिकॉन प्रायव्हेट लिमिटेड’ होऊन कंपनीला ‘आयएसओ सर्टिफिकेट’ व अनेक पुरस्कारही मिळाले. आजघडीला ‘मिलिकॉन’चा ‘टर्नओव्हर’ पाच कोटींच्या घरात आहे. उत्तरोत्तर वृद्धी होत असलेल्या ‘मिलिकॉन’ कंपनीमुळे हजारो मुलांना कतार, अबुधाबी, दुबई, सौदी अरब, नॉर्वे आदी देशांत तसेच, संपूर्ण भारतात रोजगार मिळाला असून आज ‘मिलिकॉन कन्सल्टंट इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी देश-परदेशात तंत्रकुशल मनुष्यबळ पुरविण्यात अग्रगण्य मानली जाते. ४० ते ४५ नियमित ग्राहकांना मागील कित्येक वर्षांपासून ‘मिलिकॉन’ कंपनी सेवा पुरवित असून त्यांची ‘इंजिनिअरिंग डिझाईन डिटेलिंग’सह मनुष्यबळाची निकड पूर्ण करते. ‘मिलिकॉन’ची घोडदौड सुरू असतानाच, अचानकपणे ‘कोविड-१९’मुळे सर्वत्र ‘लॉकडाऊन’ होऊन संपूर्ण उद्योग-व्यवसाय ठप्प झाले.
इंडस्ट्रीच बंद झाल्याने त्याचा फटका ‘मिलिकॉन’लाही बसला. सगळे कर्मचारी-तंत्रज्ञ घरी बसले. असे वाटलेच नव्हते की, इतक्या प्रदीर्घ काळ हे कोरोनाचे संकट भारतावर घोंगावेल, एक-दोन महिन्यांनंतर कर्मचारी वर्गाला शक्य होईल तितका घरी बसून पगार दिला. यासाठी घरातील पुंजीही वापरली. कोणत्याही कर्मचार्याला आर्थिक अडचण येणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यासह दूरध्वनीवरून मिलिंद यांनी सर्वांची आपुलकीने विचारपूस सुरूच ठेवली. एक-दोन महिन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू करण्यासाठी सर्वांना घरी लॅपटॉप देण्याची व्यवस्था केली. त्यामुळे कोविड काळातही कंपनीतील कामांनी पुन्हा वेग पकडला.
कोरोनामुळे एकप्रकारे दहशत व भीतीचे वातावरणही पसरले होते. मात्र, कुटुंबीय, मित्रपरिवार आणि कंपनीतील सहकार्यांनी उत्तम साथ दिल्याने ‘मिलिकॉन’चा डोलारा सदैव डौलात ठेवण्यास मदत झाली. हे सर्व करत असताना मिलिंद यांनी कुटुंबाकडेसुद्धा दुर्लक्ष होऊ दिले नाही. हळूहळू कुटुंबीयांनाही मानसिक आधार देऊन त्यांच्या मनातीलकोरोनाबद्दलची भीती नष्ट करण्याचे काम मिलिंद बेळंमकर यांनी केले.
‘कोविड’ काळात आर्थिक चणचण भासत होती. तेव्हा, बँक ऑफ बडोदा यांनी चांगली साथ दिली. त्यामुळे कंपनीतील ७२ कर्मचार्यांना वेळेवर पगार देणे, सरकारी करभरणा, घराचे, गाडीचे कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे शक्य झाल्याचे बेळंमकर सांगतात.अशाप्रकारे ‘लॉकडाऊन’मध्येदेखील व्यवसायाची आर्थिक घडी बसवणे त्यांना शक्य झाले. जमाखर्चाचा मेळ घालण्यासाठी प्रसंगी बँकेकडून कर्जदेखील घेतले, पण कर्मचार्यांना त्यांनी कोणतीही तोशीस पडू दिली नाही.
एक उद्योजक म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असताना मिलिंद बेळंमकर यांनी सामाजिक चळवळीतही काम केले. २००३ पासून राजकारणाचेही धडे गिरवण्यास सुरुवात केली. परिणामी, त्यांचे वास्तव्य असलेल्या कल्याण क्षेत्रातून त्यांनी तीन वेळा आमदारकी, तर एका खेपेला खासदारकीच्या निवडणुकीत नशीब आजमावले. मात्र, पैशांशिवाय राजकारण नाही, हे उमगल्याने त्यांनी केवळ व्यवसाय आणि सामाजिक कार्याला वाहून घेतले.
कोरोनाच्या काळात सामाजिक बांधिलकी जपून त्यांनी जमेल तशी मदत केली. अनेक गरजूंना वेगवेगळ्या प्रकारे मदत करत असताना कोरोनाची लागण होण्याची भीतीही मनात होती. कारण, त्याकाळात सर्वजण भीतीने ग्रासलेले होते. तरीही, जीवाची पर्वा न करता, मिलिंद व त्यांच्या सहकार्यांनी मास्क, सॅनिटायझर, अन्नधान्य, रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी होमियोपॅथीक ‘आर्सेनिक’च्या गोळ्यांचे वाटप केले. तसेच, गरजूंना रुग्णवाहिकेची मोफत व्यवस्था व आर्थिक साहाय्य करून आपणही या समाजाचे काही देणे लागतो. याचा प्रत्यय आणून दिला.
भविष्यामध्ये ‘मिलिकॉन’ कंपनी विदेशात झेप घेण्यास सज्ज झाली असून काही बड्या कंपन्यांसोबत ‘टायअप’ करणार आहे. याद्वारे कंपनी ‘लिमिटेड’ करण्याचाही ध्यास मनी बाळगला असून कंपनीची वार्षिक उलाढाल २० कोटींवर नेण्याचा मनोदय मिलिंद बेळंमकर यांनी व्यक्त केला.
"एक उद्योजक म्हणून जबाबदारी पार पाडत असताना मिलिंद यांना असे जाणवले की, स्वतःचा व्यवसाय असल्यानेच आपण हे करू शकलो. तेच जर का एखादी नोकरी करत बसलो असतो, तर इतक्या मोठ्या प्रमाणात सामाजिक मदत करणे शक्यच नव्हते. त्याकरिता, आजच्या सुशिक्षित तरुणांना उद्योजक बनण्याचे आवाहन ते करतात.यशस्वी उद्योजक बनण्यासाठी हिंमत ठेवा. कोरोनानंतरचा येणारा काळ हा उद्योजकांसाठी आणि संपूर्ण इंडस्ट्रीसाठी एक चांगली सुवर्णसंधी आहे. जो जास्त मेहनत घेईल आणि योजना आखेल, त्यालाच अशा संधीचे सोने करता येईल."