धैर्यशील नेतृत्व

11 Mar 2021 16:42:24
jitendra lohar_1 &nb
‘लॉकडाऊन’मध्ये उद्योगधंदे बुडण्याची उद्योजकांमध्ये असलेली भीती, तणाव आणि चिंतेचे वातावरण यातून संकटात संधी निर्माण करत उद्योजक जितेंद्र लोहार यांनी आपल्या कर्मचार्‍यांसाठी एका कुटुंबप्रमुखाची भूमिका निभावली. कर्मचार्‍यांच्या कामाचे तास कंपनीने कमी केले, तरी त्यांना पूर्ण वेळचे वेतन दिले जात होते. कामगारांनीही नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आणि संपूर्ण टीमने केलेल्या कामाचे फळ त्यांना अपेक्षेप्रमाणे मिळाले. अशाचप्रकारे कोरोना काळातील इतर आव्हानांवरदेखील जितेंद्र लोहार यांनी मात केली आणि आपल्या उद्योगाचा गाडा सुरुच झाला. त्याचीच ही यथोगाथा...
 
 
डहाणू... मुंबईच्या लगबगीच्या आणि वेगवान घडामोडींपासून थोडेसे दूर आणि निवांत. आधीच रहदारी आणि वर्दळीपासून बाजूला असलेल्या या तालुक्यात ‘लॉकडाऊन’मुळे तर आणखीनच शांतता पसरली होती. दळणवळणाचाही प्रश्न निर्माण झाला. उद्योगधंदे ठप्प पडले. व्यवहार थांबले होते. जितेंद्र लोहार यांच्या ‘भागिरथी मेटल वर्क्स’ आणि ‘माऊली मेटर्ल वर्क्स’ या दोन्ही कंपन्यांमध्येही काहीशी अशीच परिस्थिती होती. अशातच कर्मचार्‍यांना नोकरी जाण्याची भीतीही निर्माण झाली होती. मात्र, लोहार यांनी ‘कुटुंबप्रमुख’ या नात्याने सार्‍या कर्मचार्‍यांना धीर दिला. त्यांचे वेतन सुरू ठेवले, शिवाय ते वेळेतही दिले आणि त्यांना नोकरी सुरक्षित राहील, याचीही हमी दिली.
 
 
ज्या काळात ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू होणार होती, तेव्हा एक एक अडचणी पुढे येत गेल्या. उद्योग पुन्हा सुरू करायचा कसा, त्यापासून त्यासाठी लागणारी गुंतवणूक पुन्हा उभी करणे, हे देखील एक मोठे आव्हान होते. कारण, कर्मचार्‍यांचा पगार आणि इतर देखभाल खर्चाचाही प्रश्न उद्भवणार होता. या काळात जितेंद्र लोहार यांच्या पत्नी व ‘भागिरथी मेटल वर्क्स’च्या भागीदार अर्चना लोहार यांनीही त्यांच्या खांद्याला खांदा लावून या आव्हानांचा नेटाने सामना केला. त्यांच्या मार्गदर्शनात कंपनीने या काळात अनेक समाजहिताची कामे केली. संस्थेमार्फत सात दिवस पुरेल इतके अन्नधान्याचे किट्स गरजूंना वाटप केले. तसेच निराधार महिलांसह काम करणार्‍या ‘इनर व्हील क्लब’तर्फेही ‘कोविड’काळातील सामाजिक कार्यासाठी मदत करण्यात आली.
 
 
  
काही काळानंतर हळूहळू ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू होत होती. मात्र, उद्योग सुरू करण्यासाठी विशेषतः एमआयडीसीची परवानगी लागणार होती. त्यामुळे त्यासाठी तयारी सुरू करण्यात आली. मार्गदर्शक सूचनांसह या संदर्भातील परवानगी मिळाली. त्यानुसार सर्व कर्मचार्‍यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. 50 टक्के कर्मचार्‍यांच्या उपस्थितीसह कंपनी सुरू झाली होती. कर्मचार्‍यांना कामावर बोलावण्यासाठी त्यांचे समुपदेशन करण्यात आले. कोरोनाची भीती बाजूला ठेवत, कर्मचारीही कामावर रुजू झाले. त्यापैकी दूरवर राहणार्‍या कर्मचार्‍यांच्या प्रवासाचीही कंपनीतर्फे सोय करण्यात आली. कारखान्यामध्ये वेळेवर निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया राबविली जात असे. या सर्व उपाययोजनांसह पुन्हा एकदा उद्योगचक्र हळूहळू रुळावर येऊ लागले होते.
 
 
 lohar_1  H x W
 

एक अडचण मात्र, अद्याप कायम होती. पैशांची चणचण हा मुद्दा अद्याप सुटलेला नव्हता. कोरोना काळातील अर्थसाहाय्य म्हणून ‘बँक ऑफ महाराष्ट्र’तर्फे लोहार यांना मदत मिळाली. आर्थिक प्रश्न सुटला म्हणजे सारंकाही सुरळीत सुरू झाले, असे नव्हते. ‘लॉकडाऊन’मध्ये वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कच्चा माल मिळविण्यात येणार्‍या अडचणी, मालवाहतूक, असे प्रश्न अद्याप सुटत नव्हते. या सगळ्या गोष्टींवर मात करून दैनंदिन कारभार सुरळीत सुरू ठेवण्याचे मोठे आव्हान लोहार यांनी लीलया पेलले होते. कामाचा ताण होताच, सोबतच कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळे चिंताही कायम होती. तसेच आपल्या कर्मचार्‍यांची जबाबदारीही कंपनीवर होती. त्यांना भेडसावणार्‍या समस्यांचे निराकरण करणेही त्यावेळी गरजेचे होते. कर्मचार्‍यांच्या कामाचे तास कंपनीने कमी केले, तरी त्यांना पूर्ण वेळचे वेतन दिले जात होते. कामगारांनीही नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आणि संपूर्ण टीमने केलेल्या कामाचे फळ त्यांना अपेक्षेप्रमाणे मिळाले.
 
 
 
‘लॉकडाऊन’मध्ये तग धरून राहिल्याने आता जितेंद्र लोहार यांनी नव्या योजनांचे स्वप्नही पाहिले आहे. भविष्यात उद्योग अधिकाधिक निर्यातक्षम कसा ठरेल, यासाठी ते प्रयत्नशील असतील. तसेच कोरोना काळातील अनुभवांमुळे अत्याधुनिक तंत्रप्रणालीनुसार, उत्पादनाचा वेग वाढवणे व व्यवसायवृद्धीकडे वाटचाल करणे, असे लक्ष्य त्यांनी निर्धारित केले आहे. कोरोनाकाळात लोहार यांनी सुरू ठेवलेल्या दोन्ही कंपन्यांचा वाटा हा वैद्यकीय क्षेत्रासाठीही तितकाच महत्त्वाचा होता. त्यांनी निर्मिती केलेल्या उत्पादनांपैकी बरेचसे घटक वैद्यकीय साहित्यनिर्मितीसाठी वापरले जातात, त्यामुळे एखाद्या ‘कोविड योद्ध्या’प्रमाणेच संपूर्ण टीमने आपली भूमिका निभावल्याचे लोहार अभिमानाने सांगतात.
 
 
 
‘लॉकडाऊन’च्या काळात अनेकांच्या कर्जाचे हप्ते थकले होते. मात्र, ‘माऊली मेटल वर्क्स’ आणि ‘भागिरथी मेटल वर्क्स’ या दोन्ही कंपन्यांनी एक आदर्श निर्माण करत बँकेची देणी, करभरणा आदी गोष्टींचा हिशोब तंतोतंत पाळला होता. भविष्यात कोरोनासारख्या महामारीला रोखण्यासाठी आणि अशा संकटांचा सामना करण्यासाठी आता आपणही सक्षम असायला हवे, उद्योजकांनी अशा आव्हानांना पेलण्यासाठी एका निधीची तरतूद करून ठेवावी, असे मत लोहार यांनी व्यक्त केले. उद्योगपती रतन टाटा यांनी ‘कर्मचारी ही आपली संपत्ती आहे. इतकी वर्षे त्यांनी आपल्या यशात योगदान दिले आहे, त्यांना विसरू नका,’ असे आवाहन केले होते. त्यानुसार लोहार यांनी आपली संपूर्ण टीम आपलीच जबाबदारी मानत, एका कुटुंबप्रमुखाप्रमाणे त्यांची काळजी घेतली. वडील कै. कमलाकर हरिश्चंद्र लोहार यांनी सुरू केलेल्या या 28 वर्षे जुन्या कंपनीतील कामगारांच्या पाठीशी संकटकाळात खंबीरपणे ते उभे राहिले. भावी उद्योजक किंवा तरुणांनी अशा कुठल्याही संकटाशी दोन हात करण्याचे धैर्य उराशी बाळगावे, आपल्या बँका, कर्जदार, मदत करणार्‍या व्यक्तींशी प्रामाणिक राहावे, असा संदेश त्यांनी दिला आहे.
 
 
 
कोरोनाचे सावट असताना, दररोजची वाढत जाणारी आकडेवारी आणि येणार्‍या बातम्यांमुळे सार्‍यांचीच चिंता वाढत होती. लोहार आणि त्यांचे कुटुंबीयही याला अपवाद नव्हते. मात्र, या अडचणीच्या काळात घरातूनही त्यांना पूर्णपणे पाठिंबा मिळाला. त्यांच्या आई सुमनताई लोहार, पत्नी अर्चना लोहार यांच्यासह संपूर्ण परिवाराने एक विश्वास दाखवला. उद्योगचक्र सुरू राहावे यासाठी लागेल तो पाठिंबा घरच्यांनी दिला. पुण्यातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्‍या त्यांच्या कन्या श्रेया लोहार यांनी ‘फाईव्ह एस सिस्टीम’ या व्यवस्थापनाशी निगडित प्रणालीचा वापर करून उद्योगात सुलभता आणण्यात वडिलांची मदत केली. सध्या त्या अमेरिकेत उच्चशिक्षणासाठी स्थायिक आहेत. तसेच त्यांच्या धाकट्या कन्या श्रुती लोहार यांनी अकाऊंट्स सांभाळण्यासाठी वडिलांना मदत केली. सोबतच या काळात मदतकार्य करण्याचे प्रोत्साहनही घरच्यांनीच दिले.
 
 
 
"कोरोना योद्ध्यांकडून मला काम करण्याची प्रेरणा मिळाली होती. वैद्यकीय क्षेत्रातील आरोग्य कर्मचार्‍यांचा काम करण्याचा उत्साह मी पाहिला होता, त्यामुळे आपणही या युद्धजन्य परिस्थितीत कामी यावे, ही प्रेरणा मला यातून मिळाली."

Powered By Sangraha 9.0