कोरोना संकटकाळात थोडेही डगमगून न जाता, सामाजिक भान राखत गरीब, कामगार व मजुरांच्या मदतीला रवींद्र केशव जोशी आणि त्यांचे चिरंजीव गौरव जोशी धावून गेले. केवळ आपल्या कंपनीतील कर्मचारी हीच आपली जबाबदारी न समजता, जोशी पितापुत्राने सामाजिक जबाबदारीचे भान राखत गरजूंना सर्वोपरी मदतीचा हात दिला. संकटामध्ये माघार न घेता, एक पाऊल पुढे टाकून प्रगतीचा आलेख चढता ठेवला. तेव्हा, आगामी काळात आपला उद्योग-व्यवसाय ‘आत्मनिर्भरते’कडे नेण्याचा या संकटकाळात संकल्प केलेल्या ‘एन. के. जोशी अॅण्ड कंपनी’च्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
‘हीटिंग इक्विपमेंट्स मॅन्युफॅक्चरिंग’ क्षेत्रात ‘एन. के. जोशी अॅण्ड कंपनी’चे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. १९७५ साली स्थापन झालेली ही कंपनी सुरुवातीला ‘डोमेस्टिक प्रोडक्ट्स’च्या उत्पादनांवर भर देत होती. मात्र, बाजारातील उत्पादनांची मागणी लक्षात घेत आणि कुटुंबातील केमिकल इंडस्ट्रीजमध्ये कार्यरत असणार्या नातेवाईकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे काही नवीन तंत्रज्ञान कंपनीने विकसित केले. कंपनीचे संचालक रवींद्र केशव जोशी हे सध्या कंपनीचा कारभार पाहतात. दरम्यानच्या काळात मुलगा गौरव यानेही अभियांत्रिकीमध्ये आपले शिक्षण पूर्ण करत वडिलांना कामात हातभार लावण्याचे ठरवले आणि कंपनीने ‘इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स’ बनविण्यावर भर दिला.
‘औद्योगिक ड्रम हीटिंग सोल्युशन्स’शिवाय कंपनी ‘अणुभट्ट्या’, ‘स्किड हीटर्स’, ‘प्रयोगशाळेतील ओव्हन’, ‘रक्ताभिसरण हीटर्स’, ‘हॉट प्लेट्स’, ‘फ्लेमप्रूफ वेदरप्रूफ हीटिंग मेंटल’, ‘मफल फर्नेसेस’, ‘हीट ट्रेसर्स’, ‘केमिकल अणुभट्टी हीटर्स’, ‘औद्योगिक वायू हीटर्स’ आणि ‘सिरेमिक हीटिंग’ घटकांसाठी ‘हीटिंग जॅकेट्स’ही तयार करते. या काळात जागेची कमतरता भासत असल्याने जोशी यांनी मुंबईतून बाहेर पडत पनवेलमध्ये आपल्या कंपनीचा विस्तार वाढविला.
कोरोना काळात औद्योगिक क्षेत्रासमोर केवळ उत्पादननिर्मिती करणे, हेच एक आव्हान नव्हते, तर कच्चा माल मिळविणे, आपले उत्पादन बाजारात विकणे यांसारखी अनेकविध आव्हानं उभी होती. कंपनीला कोरोना काळात उत्पादनासाठी लागणारा कच्चा मालही उपलब्ध होत नव्हता. नंतर ‘अनलॉक’ झाले. काही कंपन्या टप्प्याटप्प्याने सुरूही झाल्या. मात्र, तरीही आवश्यक मटेरियल वेळेवर पोहोचत नव्हते, त्यामुळे ते मिळून पुढे त्यावर प्रक्रिया करून कंपनीने स्वतःचे उत्पादन घेणे यात मधला वेळ वाढला. मात्र, कंपनीचे दैनंदिन खर्च थांबले नव्हते. कर्मचार्यांचे पगार, वारेमाप आलेली वीजबिलं, बँकांचे कर्ज या सर्वांचं आर्थिक ओझं कंपनीवर उभं राहिलं.
“आपल्या मागच्या पिढ्या आणि सर्वच उद्योजक यातून गेले असल्याने आम्ही यातून अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करून या संकटाचे संधीत रूपांतर कसे करता येईल, यावर त्वरित विचार सुरू झाला. अशाप्रकारचे आव्हान आणि समस्या जर पुन्हा उद्भवल्या, तर आपण त्याकरिता तत्पर आणि सक्षम असले पाहिजे, यावर विचार सुरू झाला. आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. इतर देशांवर अवलंबून असणं कसं कमी करता येईल, यावर विचार सुरू झाला,” असे रवींद्र जोशी यांचे चिरंजीव गौरव जोशी सांगतात. ‘आत्मनिर्भरते’कडे वाटचाल करताना कंपनीने काही मशिनरी स्वतः तयार करण्यावर भर दिला. त्यासाठी लागणारा कच्चा माल एकतर कंपनीतच बनवायचा किंवा जास्तीचा साठवून ठेवायचा, यावर भर देण्यास कंपनीने सुरुवात केली. या काळात कर्मचार्यांनीही उत्तम साथ दिली. सर्वच स्थानिक कामगार असल्याने कोणीही कंपनी सोडून गेलं नाही, याउलट जे कामगार पनवेलवरून वसई-विरार या ठिकाणी कामासाठी जात होते, अशा लोकांना कंपनीने आपल्या कंपनीत रुजू करून घेतले.
अनेक कंपन्यांनी पगारकपात केली, कामगार कपात केली, मोठमोठी हॉटेल या काळात बंद राहिली, अशा ठिकाणी काम करणारे मॅनेजर, कामगार यांनी आम्हाला काम द्यावं, अशी विनंती केली. त्यांनाही माणुसकीची साथ देत जोशी यांनी कंपनीमध्ये रुजू करून घेतले. कंपनीतील कामगारांना तीन महिने ५० टक्के वेतन देण्यात आले. मात्र, कंपनी सुरू होताच सर्व कर्मचार्यांना पूर्ण वेतन देण्यात आले. आजूबाजूचे वातावरण आणि आर्थिक आव्हान पाहता, कंपनीने व वैयक्तिक जोशी यांनीही जमेल तशी मदत व सहकार्य करण्याचे प्रयत्न या काळात केले. “सामाजिक भान न जपता कोणत्याही उद्योजकाला प्रगती करता येत नाही. सामाजिक भान व सामाजिक दायित्व प्रत्येक उद्योजकाला पूर्ण करावंच लागतं,” असे जोशी सांगतात.
कोरोना काळात अनेक वाड्या-वस्त्यांवर ‘लॉकडाऊन’नंतर बराच काळ कोणतीही मदत पोहोचत नव्हती. लहान-मोठे विक्रेते आणि त्यांच्यासोबत काम करणारे कामगार १५ ते २० दिवस घरीच थांबून होते. त्यांच्या उत्पन्नाची सर्व साधने बंद झाली आणि या स्थितीमुळे या कामगारांचे मानसिक स्वास्थ्य व आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत गेली. यामुळे त्यांनी ठरवलं की, मे महिन्यात आपण गावी परत जायचं. पनवेल टर्मिनसवर या कामगारांचे मोठे मोठे लोंढेच्या लोंढे या काळात येत होते. जोशी यांची कंपनी स्थित असलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वे-वरूनदेखील मोठी गर्दी चालत गावी निघालेली गौरव जोशी यांच्या नजरेस पडत. त्यांना जोशी थांबवत. या मजुरांना, कामगारांना अन्न आणि पाण्याची सोय जोशी यांनी केली. हे मजूर अत्यंत गंभीर परिस्थितीत होते, भरकटलेल्या अवस्थेत असतं. त्यांना कुठे जायचं, याचा मार्गही ठाऊक नसे. अशांना योग्य दिशा दाखवण्याचे काम जोशी यांनी केले.
मोठ्या प्रमाणात धान्यवाटपही या काळात जोशी यांच्या मुलाने मित्रांच्या सहकार्याने केले. आपल्या संपर्कातील इतर उद्योजक व मित्रांशी संपर्क साधत धान्यासाठी लागणार्या राशी जमा करण्याचे बहुमोल कामही जोशी यांनी केले. काही नवीन इंडस्ट्रीजना डॉक्युमेंटेशन कसं करावं, एमआयडीसीसोबत कसा पत्रव्यवहार करावा, एनओसी कुठे मिळतात, याची माहिती नव्हती. अशांना मार्गदर्शन करण्याचे काम जोशी यांनी केले.
यावेळी तरुण उद्योजकांच्या एकजुटीचे उत्तम उदाहरण सांगणारा एक प्रसंग गौरव जोशी यांनी सांगितला. पनवेलपासून २० ते २५ किमी अंतरावर १०० ते १२५ सिमेंटचे ट्रक परराज्यातून आलेले होते. अचानक घोषित झालेल्या ‘लॉकडाऊन’मुळे ते जागीच अडकून पडले. या प्रत्येक ट्रकमध्ये एक वाहनचालक याप्रमाणे २०० ते ३०० व्यक्ती अडकून पडल्या होत्या. या सर्वांना जेवण देण्याचे आवाहन प्रांत ऑफिसकडून जवळपासच्या उद्योजकांना करण्यात आले. अशावेळी त्या भागात जर रोज एक व्यक्ती गेली असती, तर कोरोनाची लागण होण्याची जोखीम होती. त्यामुळे यासाठी सर्व तरुणांनी एकत्र येत एक साखळी नियोजन करून रोज चार जण जाऊन त्या सर्व चालक व मजुरांना जेवण पोहोचवत होते. कोरोनाची जोखीम लक्षात घेऊन फक्त तरुणांनी यात सहभाग घेतला. पन्नाशीच्या पुढील एकही नागरिक यात सहभागी नव्हता. हे कार्य सलग तीन ते चार महिने अविरतपणे सुरू होते. भविष्यात कंपनी ‘आत्मनिर्भर’ होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. जास्तीत जास्त उपकरण व मटेरियल भारतातच कसं बनवता येईल, यावर कंपनी भर देते आहे.
"तरुणांनी ‘मी स्वतः कष्ट करेन आणि व्यवसायवृद्धीसाठी काम करेन,’ असे मनाशी ठरवले पाहिजे. ही प्रेरणा व निश्चयच त्याला यशस्वी होण्यासाठी मार्ग दाखवू शकतो. जेव्हा प्रत्येक तरुण हे ठरवेल, तेव्हा देश नक्कीच प्रगतिशील होईल."