भाजपची घोडदौड रोखणे हाच एककलमी कार्यक्रम!

01 Mar 2021 19:19:50

West bengal_1  
 
 
सध्या देशातील राजकारण पाहता, केंद्रातील भाजप सरकारला सर्व बाजूंनी कसे घेरता येईल, असा प्रयत्न चालला असल्याचे दिसून येते. आपल्या अपयशाचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचे प्रयत्न काही राज्यांचे चालले आहेत. आपली पापे झाकण्यासाठी केंद्र सरकारवर आरोप केले जात असले, तरी भाजपची ही घोडदौड रोखणे शक्य आहे का?
 
 
प. बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम या राज्यांमध्ये आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर निराशेच्या गर्तेत सापडलेल्या विरोधी पक्षांमध्ये काहीसा उत्साह संचारला आहे. या निवडणुका लक्षात घेऊन युत्या- आघाड्या यांच्या घोषणा होऊ लागल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने प. बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या हातातून सत्ता हिसकावून घेण्याचा निर्धार केला असून, त्यासाठी भाजपने आपली ताकद लावली आहे, तर केरळमध्ये भाजपने काढलेल्या विजययात्रेमुळे त्या राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. केरळमध्ये भाजपचा वाढत असलेला प्रभाव लक्षात घेऊन तेथील डाव्या सरकारकडून हिंदू मतदारांना चुचकारण्याचे प्रयत्नही सुरू झाले आहेत. संघ विचारांचा प्रभाव वाढत असल्याने संतप्त झालेल्या डाव्या आणि मुस्लीम संघटनांकडून संघाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करण्याचे प्रकार चालू आहेत. पण, या सर्वांना कणखरपणे तोंड देत त्या राज्यात भाजपने डावी आघाडी आणि काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीपुढे आव्हान उभे केले आहे. प. बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष रॉयटर बिल्डिंगवर आपला ध्वज फडकविण्यासाठी जोमाने कामाला लागला आहे. भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे हादरून गेलेल्या ममता बॅनर्जी यांनी, ‘आपण बंगालची कन्या असल्याने’ आपल्या पक्षास पुन्हा निवडून देण्याचे भावनिक आवाहन मतदारांना केले आहे. भाजप हा ‘बाहेरचा’ पक्ष असल्याचा अपप्रचार ममतादीदी रात्रंदिन करत आहेत ते वेगळेच! दुसरीकडे, भाजपचा प्रभाव वाढत असल्याचे पाहून चिडलेल्या तृणमूल काँग्रेसच्या गुंड कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले करण्याचे प्रकार घडतच आहेत. या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने भाजपला कसे रोखता येईल, असा एककलमी कार्यक्रम विरोधी पक्षांचा आल्याचे दिसून येत आहे.
 
तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक आणि भाजप यांच्यात आघाडी करण्यासाठी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या शनिवारी तामिळनाडूमध्ये येत आहेत. दरम्यान, तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक आणि पीएमके यांच्यामध्ये जागावाटपावर मतैक्य झाले आहे. येत्या ६ एप्रिल रोजी त्या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पीएमके पक्षासाठी २३ जागा सोडण्याची तयारी अण्णाद्रमुकने दर्शविली आहे, तर द्रमुक आणि काँग्रेस यांची युती अण्णाद्रमुककडून सत्ता कशी खेचून घेता येईल, या प्रयत्नात आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी तामिळनाडूच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले असता, त्यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून, आपण अजूनही किती पोरकट आरोप करीत आहोत हे दाखवून दिले! एकीकडे काँग्रेस पक्षामध्ये कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, अशी अवस्था असताना, पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते पक्ष नेतृत्वावर नाराज असताना आणि पक्षाची घडी व्यवस्थित बसवायची सोडून राहुल गांधी भाजप आणि संघ परिवारावर खोटेनाटे आरोप करून स्वतःचे हसे का करून घेताहेत, ते समजत नाही. आपल्या तामिळनाडूच्या दौऱ्यामध्ये राहुल गांधी यांनी, शिक्षणाचा एक वस्तू समजून सरकारने बाजार मांडला असल्याची टीका केली. शिक्षणाचा उपयोग करून जनतेचे सबलीकरण करण्याऐवजी आपल्या विचारधारेचा प्रसार करण्याचे शस्त्र आणि एक व्यापारी वस्तू म्हणून मोदी सरकार शिक्षणाकडे पाहत असल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेसच्या माजी अध्यक्षाने जी टीका केली, ती किती गांभीर्याने घ्यायची हाही प्रश्नच आहे! राहुल गांधी यांनी आपल्या दौऱ्यामध्ये भाजप, संघ यांच्यावर जोरदार टीका केली. “आम्ही ब्रिटिशांना पराभूत केले. त्या ब्रिटिश सत्तेचा विचार करता त्यापुढे मोदी कोण लागून गेले आहेत? मोदी यांना आम्ही नागपूरला परत पाठवून देऊ,” अशी गर्जना राहुल गांधी यांनी केली. ज्या काँग्रेस पक्षाच्या हातातील एकेक राज्ये जात चालली आहेत, ज्या पक्षाच्या नेत्यास आपला पक्ष धड सांभाळता येत नाही, त्या पक्षाचा माजी अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नागपूरला रवानगी करण्यास निघाला आहे? ते शक्य तरी आहे का?
 
प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी या भाजपवर रोज खार खात आहेतच. प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला पुन्हा विजयी करण्याची स्वप्ने पाहत असलेल्या प्रशांत किशोर यांनी, “प. बंगालमधील जनतेला केवळ आपली कन्या हवी आहे,” असे ट्विट करून या राज्यामध्ये ‘बाहेरच्यांना’ जागा नसल्याचे अप्रत्यक्षपणे दाखवून दिले आहे. “मी जे म्हटले आहे तसेच ते येत्या २ मे रोजी दिसून येईल,” अशी बढाईही प्रशांत किशोर यांनी मारली आहे. प. बंगालमधील भाजप नेते, प्रशांत किशोर यांचे दात त्यांच्याच घशात घातल्याशिवाय राहणार नाहीत! प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने जसा भाजपची घोडदौड रोखण्याचा प्रयत्न चालविला आहे, तसाच प्रयत्न डावी आघाडी, काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीत सहभागी झालेल्या ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’ यांनी चालविला आहे. या कथित महाआघाडीची एक प्रचंड सभा कालच्या रविवारी कोलकाता येथे झाली. त्यामध्ये डाव्या पक्षाचे, काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित असले तरी त्या सभेवर प्रभाव दिसून आला तो ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’चे संस्थापक असलेल्या मुस्लीम धर्मगुरू अब्बास सिद्दीकी याचाच. या सभेमध्ये प. बंगालमधील काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी बोलत असताना, त्यांच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी करून व्यत्यय आणण्यात आला. त्यामुळे अधीररंजन चौधरी यांनी आपले भाषण मध्येच थांबविले. चौधरी यांचे भाषण सुरू असतानाच अब्बास सिद्दीकी या मुस्लीम धर्मगुरूचे आगमन होताच त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करून जोरदार स्वागत केले. त्यामुळे अधीररंजन चौधरी यांना भाषण थांबवावे लागले. ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’चा संस्थापक असलेल्या अब्बास सिद्दीकी याला महाआघाडीच्या सभेत मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून, आपल्या पक्षाचे या आघाडीत कसे काय जमणार, अशी शंका नक्कीच अधीरदांच्या मनात उपस्थित झाली असणार! कोलकातामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सभेतील नेत्यांच्या भाषणांचा सूर पाहता, आगामी लढत तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यासमवेत असल्याचे सभेतील नेत्यांकडून अधोरेखित करण्यात आले! अब्बास सिद्दीकी या धर्मगुरूने ममता बॅनर्जी, तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यावर तोंडसुख घेतले. “आगामी निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या हातून बंगालची सत्ता खेचून घेतली पाहिजे,” असे सिद्दीकी यांनी भाषणात सांगताच उपस्थित समर्थकांनी जोरदार प्रतिसाद दिला. भारतीय जनता पक्ष म्हणजे तृणमूल काँग्रेसची ‘बी टीम’ असल्याचा आरोपही सिद्दीकी याने केला. महाआघाडीच्या सभेला अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहिले असले, तरी सभेवर प्रभाव राहिला तो ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’चा संस्थापक असलेल्या अब्बास सिद्दीकी याचा! ते पाहता वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत याची कल्पना यावी! आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने प. बंगालमध्ये कसे वातावरण आहे त्याची थोडीशी कल्पना यावरून यावी!
 
 
सध्या देशातील राजकारण पाहता, केंद्रातील भाजप सरकारला सर्व बाजूंनी कसे घेरता येईल, असा प्रयत्न चालला असल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांचे आंदोलन असो वा देशापुढील महत्त्वाच्या प्रश्नासंदर्भात केंद्र सरकारवर दोषारोप करण्यामध्येच विरोधक धन्यता मानत आहेत. आपल्या अपयशाचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचे प्रयत्न काही राज्यांचे चालले आहेत. आपली पापे झाकण्यासाठी केंद्र सरकारवर आरोप केले जात असले, तरी भाजपची ही घोडदौड रोखणे शक्य आहे का? केंद्र सरकार देशाच्या विकासाच्या दृष्टीने योग्य पावले टाकत आहे. पण, काही तत्कालिक मुद्द्यांवरून जनतेला चिथविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. पण, त्यातून विरोधकांच्या हाती काही लागण्याची शक्यता दिसत नाही. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने भाजपने आपली घोडदौड चालूच ठेवली असल्याचे जनतेला दिसून आल्यावाचून राहणार नाही!
 
 
Powered By Sangraha 9.0