‘विद्रोही संमेलना’आधीच विद्रोह!

09 Feb 2021 10:36:35


sahitya sammelan_1 &

 

दहशतवादी वृत्तीच्या लोकांना आमंत्रित करणे हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गैरवापर



 ग्रेटा थनबर्गच्या आमंत्रण प्रस्तावावर नाशिकमधून उमटल्या संतप्त प्रतिक्रिया

 
 
नाशिक: नाशिकमध्ये होणार्‍या ९४ व्या लअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनादरम्यान ‘विद्रोही साहित्य संमेलना’चे आयोजन करण्यात येणार आहे. सदर संमेलन दि. २६ व २७ मार्च दरम्यान आयोजित करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या ‘विद्रोही साहित्य संमेलना’च्या उद्घाटनास ‘नोबेल पुरस्कार’ विजेते व सध्या दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाप्रश्नी टीकेची धनी झालेली स्वीडिश नागरिक ग्रेटा थनबर्ग हिला आमंत्रित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यावर येत्या दि. १४ फेब्रुवारीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
 
 
 
याबाबत दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वतीने नाशिकमधील मान्यवरांशी संवाद साधला असता, अनेकांनी ग्रेटा थनबर्गसारख्या दहशतवादी वृत्तीच्या लोकांना आमंत्रित करणे हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गैरवापर असल्याचे मत व्यक्त केले. तसेच, ‘विद्रोह’ म्हणजे नेमके काय आणि तो कशाशी करावा, याची नेमकी जाणीव ‘विद्रोही साहित्य संमलेना’च्या आयोजकांना असावी. ग्रेटा थनबर्ग हिने मांडलेल्या अजेंड्यावर ‘विद्रोही साहित्य संमेलना’तील कार्यकर्ते आगामी काळात आपली कार्यदिशा आखणार आहेत का? असेदेखील मत काहींनी व्यक्त केले. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे कार्यवाह डॉ. शंकर बोर्‍हाडे यांनी ‘विद्रोही साहित्य संमेलन’ हे प्रागतिक विचारांनी होत असल्याचे मत व्यक्त केले.
 
 
 
साहित्य क्षेत्राशी संबंधित मान्यवरांशी संवाद साधला असता एकंदरीतच अ. भा. साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘विद्रोही साहित्य संमेलना’मुळे आगामी काळात नाशिकमधील सांस्कृतिक वातावरण ढवळून निघण्याची शक्यता दिसून येत आहे.
 
पोलीस परवानगीसाठी पत्रच नाही
‘विद्रोही साहित्य संमलेना’च्या आयोजकांनी ग्रेटा थनबर्ग यांना बोलविण्याचे जवळपास निश्चित केले आहे. मात्र, या संमलेनाच्या आयोजनाची माहिती किंवा परवानगी अजून पोलीस प्रशासनाकडे मागण्यात आलेली नाही. याबबत आयोजन सदस्य राजू देसले यांना विचारले असता त्यांनी अ. भा. साहित्य संमेलनाला परवानगी मिळते, तेव्हा आम्हाला का मिळणार नाही. अजून वेळ आहे आम्ही लोकशाही मार्गाने परवानगी मागणार असल्याचे सांगितले. थनबर्ग हिच्याशी संभाषण करणारे, शहरात पोलीस परवानगीसाठी मात्र वेळ घेत आहेत. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
 
 
‘विद्रोही साहित्य संमेलन’ हे प्रागतिक विचारांचे प्रतीक
‘विद्रोही साहित्य संमेलन’ हे प्रागतिक विचारांचे प्रतीक आहे, त्यामुळे ते व्हावे. ग्रेटा थनबर्गबाबत मला काहीही माहिती नाही. त्यामुळे तिच्याबाबत प्रतिक्रिया देणे संयुक्तिक नाही. मात्र, अ. भा. मराठी साहित्य संमेलन आणि ‘विद्रोही साहित्य संमेलन’ हे पूर्णत: वेगवेगळे विषय आहेत. साहित्य संमेलनाच्या आयोजनामुळे नाशिकमध्ये अनेक छोटी-मोठी साहित्य संमेलने होत आहेत. यामुळे शहराचे सांस्कृतिक वातावरण अधिक चांगले होण्यास मदत होईल. जितकी साहित्य संमेलने होतील तितकी शहराची सांस्कृतिक समृद्धता वाढण्यास मदत होईल.
                                                                                                                                       - प्रा. डॉ. शंकर बोर्‍हाडे,
कार्यवाह, 94 वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन
 
 
 
‘विद्रोही साहित्य संमेलन’ हे भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ!
आमचे ग्रेटा थनबर्ग यांच्याशी संभाषण सुरू आहे. आम्ही त्यांना उद्घाटनाचे निमंत्रणदेखील देणार आहोत. ‘विद्रोही साहित्य संमेलन’ हे भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ होत असून ते लढणार्‍या शेतकर्‍यांना अर्पण केले आहे. या साहित्य संमेलनात अभिव्यक्तिस्वातंत्र्य, भारतीय संविधान आणि आज बळीराजाची असणारी अवस्था याबाबत विचारमंथन करण्यात येणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता थनबर्ग यांचे नाव पुढे आले आहे.
-राजू देसले,
‘विद्रोही साहित्य संमेलन’ आयोजन समिती सदस्य.
 
 
 
थनबर्गचा अजेंडा वापरणार का?
कोणत्या सेलिब्रिटीला बोलवावे यावर नक्कीच बंधन नाही. मात्र, काही सेलिब्रिटी या आमंत्रित मंचाचा वापर स्वत:चा उद्देश पूर्ण करण्यासाठी वापरत असतात. भारतात बंडाळी माजविण्याचे काम ग्रेटा थनबर्गच्या माध्यमातून होत आहे. अशावेळी विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजक ग्रेटा थनबर्ग यांनी दिलेला अजेंडा आपल्या कार्यात वापरणार काय? हाच आमचा प्रश्न आहे. विद्रोही साहित्य हे कायम हिंदू धर्म व समजुती याला विरोध करते. इतर धर्मावर भीतीपोटी भाष्य करत नाही. थनबर्गचे विषय हे संविधानविरोधी आहे. तेव्हा संविधानाचा सन्मान या विषयाबाबत तिची बांधिलकी कशी असणार हादेखील एक प्रश्न आहे. विद्रोह हा बनववट असून ते एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करत असते.
- प्रमोद पाठक, वेदविद्यातज्ज्ञ
 
 
 
हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गैरवापर
ग्रेटा थनबर्गसारख्या दहशतवादी वृत्तीच्या लोकांना आमंत्रित करणे हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गैरवापर आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींना निमंत्रित करून सामाजिक समतोल बिघडवू नये. आपण विवेकी असावे. आग्रहाने आपल्या भूमिका जरूर मांडाव्यात. मात्र, थनबर्गसारख्या वृत्तींना बोलावणे उचित नाही.
-प्रकाश पाठक,
विश्वस्त, सेन्ट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक
 
 
 
 
विद्रोहाची पातळी देशविघातक दिशेने नको...
“विद्रोह हा नेमका कशाच्या विरोधात करावा, हे ठरविणे आवश्यक आहे. विद्रोहाची पातळी देशविघातक दिशेला जात असेल. मात्र, त्याचा देशाला किंवा समाजाला काहीही उपयोग नाही. विद्रोह हा वाईट चालीरीतींच्या विरोधात करायचा की आपल्याच देशातील नागरिकांच्या विरोधात, याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. विद्रोहाच्या नावाखाली संस्कृती, देश, धर्म, राष्ट्रीय भावना, रुजलेल्या रूढी-परंपरा, नीतिमूल्य यांना विरोध करणे म्हणजे विद्रोह नाही. विद्रोहाच्या नावाखाली देशविघातक वृतींची पाठराखण होत असेल, तर त्याला समाजाच्या प्रत्येक घटकाने विरोध करावा. साहित्य संमेलन हे सर्वांचे आहे. तो मंच सर्वांसाठी आहे. अशा वेळी मुख्य मंचास सोडून दुसरा मंच उभारणे याचा अर्थ मुख्य मंचावर अशा चुकीच्या विचारांना स्थान नाही. तेथून आपल्यास हाकलून दिले जाईल. याची जाणीव ‘विद्रोही साहित्य संमेलना’च्या आयोजकांना झाली आहे. कारण, त्यांची मानसिकता या देशाच्या नाळेशी जोडलेली नाही. त्यांनी फ्रान्सिस दिब्रिटो त्यांना मान्य नाहीत हे आता सांगावे. म्हणजे आम्हाला पुढे बोलता येईल.”
- समीर देव, सामाजिक कार्यकर्ता
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0