हिंदुत्वाची पोकळी जर आपण स्वीकारली तर आपले अस्तित्व महाराष्ट्रभर निर्माण होईल. म्हणून राजकीय लाभ करून घेण्यासाठी शिवसेना हिंदुत्ववादी झाली. हाच शिवसेना-भाजपमधील फरक आहे. एकाची जीवननिष्ठा आहे, तर एकाची राजकीय लाभाची निष्ठा आहे.
"महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यानंतर मी अयोध्येला श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी गेलो, तेव्हाच स्पष्ट केले होते की, मी भाजपपासून दूर गेलो आहे, हिंदुत्वापासून नव्हे. हिंदुत्वाचे पेटंट भाजपने घेतलेले नाही. हिंदुत्व ही काही भाजपची मक्तेदारी नाही.” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विशेष मुलाखतीतील ही काही वाक्ये. ते पुढे म्हणाले की, “देशात हिंदुत्ववादी पक्षांच्या पर्यायाची एक पोकळी निर्माण झाली होती. सध्याच्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रीय पातळीवर आता पर्याय हवा, असे लोकांना वाटू लागले असून, लोकांना असे वाटते तेव्हा पर्याय उभा राहतोच. एखादा पक्ष ती पर्याय पोकळी एकटा भरून काढेल वा काही जण एकत्र येऊन भरून काढतील.” १९९२चा बाबरी ढाँचा पडल्याचे उदाहरण देऊन ते म्हणाले की, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तेव्हा म्हणाले होते की, ‘मशीद शिवसेनेने पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे.’ त्या एका वाक्याने शिवसेनेच्या हिंदुत्वाबद्दल देशात लोकांना, राजकीय कार्यकर्त्यांना आकर्षण वाटू लागले.”
“हिंदुत्व हे भाजपची मक्तदारी नाही,” हे उद्धव ठाकरे यांचे म्हणणे एकदम खरे आहे. हिंदुत्व ही साऱ्या हिंदुस्थानची मक्तेदारी आहे. काँग्रेस, कम्युनिस्ट पक्षात असलेल्या सगळ्यांचा त्यावर हक्क आहे. डॉ. बाबासाहेब यांनी ३०च्या दशकात मंदिरप्रवेशाचे आंदोलन महाराष्ट्रात चालवले होते. पुण्याला पर्वतीचा सत्याग्रह, नाशिकला काळा राम मंदिराचा सत्याग्रह आणि अमरावतीला देवी मंदिर सत्याग्रह झाले, तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते की, “हिंदुत्व ही केवळ स्पृश्यांचीच मालमत्ता नाही. ती अस्पृश्यांचीदेखील मालमत्ता आहे. हिंदुत्व हे व्यापक आहे. त्यावर कोणत्याही एका राजकीय पक्षाची मक्तेदारी असू शकत नाही.” या अर्थाने भाजपची हिंदुत्वावर मक्तेदारी नाहीच. परंतु, दुसऱ्या अर्थाने हिंदुत्वावर भाजपची मक्तेदारी आहे आणि शिवसेना या मक्तेदारीपासून हजारो हात दूर आहे. ही मक्तेदारी कोणती आहे? ही मक्तेदारी जीवननिष्ठेची आहे. हिंदुत्व ही भाजपची जीवननिष्ठा आहे. भाजपचा तो श्वास आणि उच्छ्वास आहे. ती राजकीय पोकळी नाही. राजकारणात हे हिंदुत्व प्रस्थापित करण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना बलिदान द्यावे लागले. पं. दीनदयाळ उपाध्याय यांनादेखील बलिदान द्यावे लागले. असंख्य कार्यकर्ते पोलिसी अत्याचारात ठार झाले. अशी बलिदानाची परंपरा भाजपच्या हिंदुत्वाच्या मागे आहे.
१९५२ साली हिंदुत्वाला अतिशय प्रतिकूल वातावरण होते. नेहरूंनी तर प्रतिज्ञाच केली होती की, देशातून हिंदुत्ववादी चळवळ मी संपवून टाकीन. त्यासाठी त्यांनी स्वा. सावरकर यांना तुरुंगात टाकले. त्यांचा भयानक द्वेष केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली. ८० हजार संघ स्वयंसेवकांना तुरुंगात डामले. पण, संघाने हिंदुत्व सोडले नाही आणि जनसंघानेदेखील हिंदुत्व सोडले नाही, तेव्हा कोणतीही राजकीय पोकळी नव्हती. ही राजकीय पोकळी या कार्यकर्त्यांनी आपल्या झंझावाताने निर्माण केली. ‘मराठी मराठी’चे तुणतुणे वाजवून महाराष्ट्रात आपला प्रभाव निर्माण होणार नाही, हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लक्षात आले. हिंदुत्वाची पोकळी जर आपण स्वीकारली तर आपले अस्तित्व महाराष्ट्रभर निर्माण होईल. राजकीय लाभ करून घेण्यासाठी शिवसेना हिंदुत्ववादी झाली. हा दोघांतील फरक आहे. एकाची जीवननिष्ठा आहे, तर एकाची राजकीय लाभाची निष्ठा आहे.
ही राजकीय लाभाची निष्ठा कशी कशी काम करते? जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आले की, भाजपबरोबर जर सरकार स्थापन केले तर मुख्यमंत्रिपद मिळत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केली, तर मुख्यमंत्रिपद मिळते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा एक समान कार्यक्रम आहे, तो म्हणजे कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्तेवर येऊ द्यायचे नाही. उद्धव ठाकरे यांच्या भाषेत सांगायचे तर या दोन्ही पक्षांनी ‘भाजप नको’ची पोकळी निर्माण केली. ही पोकळी भरून काढण्याची चतुराई उद्धव ठाकरे यांनी केली. आपण एक चतुर राजकारणी आहोत, हे त्यांनी दाखवून दिले. राजकीय नेत्याकडे ही गुणवत्ता असावी लागते. त्याबद्दल आमचे काही म्हणणे नाही.
हिंदुत्व ही जर त्यांची जीवननिष्ठा असती, केवळ राजकीय निष्ठा नव्हे, तर शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्याबरोबर जाताना त्यांनी हजार वेळा विचार केला गेला असता. राजकीय निष्ठा, सत्तानिष्ठेचे धडे, विचारनिष्ठा, सिद्धांतनिष्ठा हे केवळ बोलायचे असते. व्यवहार करताना याचा राजकीय लाभ काय होणार आहे, एवढाच विचार करायचा असतो. म्हणून भगवा खांद्यावर घेऊन भगवा गाडण्याची राजनीती करणाऱ्या शरदराव पवार आणि सोनिया गांधी यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी अगदी सहजपणे हातमिळवणी केली. मुख्यमंत्रिपद मिळवले. त्यांना असे वाटते की, आणखी चार वर्षे त्यांना मुख्यमंत्रिपदावर राहायचे आहे. त्यांचे एक सहकारी सुभाष देसाई म्हणतात, “राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षे सत्तेचे स्वप्न बघत राहावे.” जोपर्यंत महाविकास आघाडीचे विधानसभेत बहुमत आहे, तोपर्यंत उद्धव ठाकरे यांचे शासन स्थिर राहणार आहे. संसदीय राज्यपद्धतीचा हा नियम आहे. यामुळे माझे सरकार स्थिर आहे, असे वारंवार सांगण्याची ना उद्धव यांना गरज आहे, ना सुभाष देसाई यांना गरज आहे. प्रश्न एवढाच आहे की, विधानसभेतील हे बहुमत कायम राहणार आहे का? लोकशाही हा आकड्यांचा खेळ असतो. हे आकडे कोणत्याही क्षणी बदलू शकतात. विशेषकरून ज्या ठिकाणी एकपक्षीय सत्ता नसते, आघाडीची सत्ता असते, अशा ठिकाणी आकडे बदलण्याची शक्यता खूप राहते. अशा आघाड्यांत मुख्यमंत्रिपदाचे दावेदार अनेक जण असतात. कोण कधी पाय खेचेल हे सांगता येत नाही. तरीसुद्धा हिंदुत्वाचा मुखवटा पांघरून भाजपविरोधाची पोकळी भरून काढणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे शासन आणखी चार वर्षे चालावे, अशा सदिच्छा द्यायला काही हरकत नाही.
हे शासन चार वर्षे राहिल्याने आकाश काही कोसळत नाही. काळ अतिशय वेगाने सरकत असतो. १९८४ सालापर्यंत इंदिरा गांधी एके इंदिरा गांधी होत्या. त्या गेल्या. आताच्या पिढीला त्याचे काही घेणे-देणे राहिलेले नाही. काळ असा निर्दयी असतो. म्हणून चार वर्षे जातील. पण, पुढे काय? या प्रश्नाचे उत्तर उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीत नाही. पुढे हिंदुत्वाची पताका राहणार का? आणि ती खांद्यावर राहिली तर सहकारी मित्रपक्षांचे काय होणार? जनता ते स्वीकारेल का? या प्रश्नांची उत्तरे काळ देईल.
हिंदुत्व हे राजकीय निष्ठा की जीवननिष्ठा? हा प्रश्न आहे. तो लाखमोलाचा प्रश्न आहे. हिंदुत्व म्हणजे काय? हे प्रथम समजून घ्यावे लागेल. हिंदुत्व म्हणजे मुसलमानांना ‘लांडे’ म्हणणे नव्हे, किंवा ख्रिश्चनांना हिणवणे नव्हे. हिंदुत्व म्हणजे फक्त ‘शिवाजी महाराज की जय’ नव्हे आणि हिंदुत्व म्हणजे पाकिस्तानविरोध नव्हे. राजकीय भाषेत हिंदुत्व म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन केलेला विकास. हिंदुत्व म्हणजे शिवाजी महाराज की जय, रामदास स्वामीजी की जय, म. गांधीजी की जय, डॉ. आंबेडकरजी की जय.... म्हणजे सर्वसमावेशकता. ‘सर्व आपले, आपण सर्वांचे’ हा विचार जगावा लागतो. जगणे म्हणजे जीवननिष्ठा! हिंदुत्वाचा राजकीय अर्थ होतो, भ्रष्टाचारमुक्त राजकारण, खंडणीमुक्त राजकारण, आपण काही खायचे नाही अन् दुसऱ्याला खाऊ द्यायचे नाही. ‘तू पण खा आणि त्यातील वाटा मला पाठव,’ अशी वाटाघाटी म्हणजे हिंदुत्व नव्हे. हिंदुत्व म्हणजे साधनशूचिता. हिंदुत्व म्हणजे पारदर्शकता. ती सर्वात दिसावी लागते. ती दिसू लागली की, मी हिंदुत्ववादी आहे, हे कुणाला सांगावे लागत नाही. सूर्याला ‘मी सूर्य आहे,’ असे सांगावे लागत नाही. त्याचा प्रकाशच हे काम करत असतो. पुढचा कालखंड ‘स्पेस’ची राजकीय निष्ठा ही हिंदुत्वाची जीवननिष्ठा याचा आहे. हा राजकीय संघर्ष आहे. भाजपला आणि शिवसेनेला तो लढावा लागणार आहे. मागच्या निवडणुकीत मोदींच्या लाटेमुळे अनेक तरले. पुढच्या निवडणुकीत कोणती लाट असेल, हे नाही सांगता येणार आणि लाट नसेल तर स्वत:च्या निष्ठेवर तरावे लागेल. आपला मतदार निष्ठांची निवड करण्यात तसा चतुर आहे आणि त्याची चतुराई पोकळी व्यापण्याच्या चतुराईपेक्षा अधिक मौल्यवान असणार एवढे खरे!