नौदल अधिकाऱ्याचे अपहरण करून पालघरमध्ये हत्या

07 Feb 2021 18:06:20

palghar_1  H x


तलासरी
: एका नौदल अधिकार्‍याचे चेन्नईमधून अपहरण करून त्याला पालघरमध्ये जिवंत जाळण्यात आले आहे. जखमी अधिकाऱ्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सुरज कुमार दुबे असे या अधिकार्‍याचे नाव असून पैशांच्या व्यवहारातून हत्या केल्याचा वडिलांनी आरोप केला आहे.


दुबे ३१ जानेवारीला चेन्नई विमानतळावर पोहोचले. तेथे तीन अज्ञातांनी त्यांचे अपहरण केले. त्यांना तीन दिवस चेन्नईला अज्ञातस्थळी कोंडून ठेवून दहा लाख रुपयांची मागणी केली. मात्र, दुबे यांनी नकार दिल्यानंतर कारमधून पाच फेब्रुवारीला महाराष्ट्र-गुजरात सीमेलगतच्या तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटातील जंगलात रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तिघांनी त्याच्यावर पेट्रोल ओतून पेटवून दिले.



दुपारच्या सुमारास जंगलात होरपळलेल्या अवस्थेतील व्यक्तीला पाहिल्यानंतर स्थानिकांनी घोलवड पोलिस चौकीला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ दुबे यांना डहाणूच्या आगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना मुंबईत हलवण्यात आले. तेथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तीन अज्ञात अपहरणकर्त्यांविरुद्ध घोलवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास प्रभारी अधिकारी कुंभार करीत आहेत.



न्याय हवा, कुटुंबीयांची मागणी
आपले अपहरण करून तीन दिवस डांबण्यात आले होते, अपहरणकर्त्यांनी खंडणी मागितली होती असे जबानी सुरज दुबे यांनी मृत्यूपूर्वी दिल्याची माहिती त्यांचे वडील मिथिलेश दुबे यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणी चौकशी करून आपल्या मुलाला न्याय मिळावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0