पुदुच्चेरीतील घटना एकाकी घडली नाही. जानेवारीपासून नारायणसामी यांचे सरकार ‘आयसीयु’मध्ये गेले. सरकार धोक्यात आले आहे, हे उघड दिसत होते. अशा वेळी राष्ट्रीय नेते सरकार वाचविण्याच्या उचापती करत राहतात. झाले उलटे, राहुल गांधी आले आणि सरकार गेले.
"गेल्या वर्षी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना काँग्रेसचे नेते शशी थरूर म्हणाले की, “आपला देश एकपक्षीय राजकारणाकडे चाललेला आहे. संसदीय लोकशाहीच्या संदर्भात ही गोष्ट चांगली नाही.” शशी थरूर यांचे हे म्हणणे अगदी बरोबर आहे. पण, ते धूर्त राजकारणी आहेत. देशात सुमारे ४० वर्षे एकाच पक्षाची म्हणजे कॉंग्रेसची सत्ता होती. तेव्हा एकपक्षीय राजकारण नव्हते काय? शशी थरूर समजतात तेवढे श्रोते मूर्ख नसतात. त्यांचे दुःख कॉंग्रेस सत्तेपासून जात चालली आहे, याचे आहे. त्याच्या कारणांचा शोध त्यांनी करायचा आहे.
काँग्रेसची सत्ता आता फक्त तीन राज्यांत राहिली आहे. पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगढ ही ती तीन राज्ये आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेत सहभागी आहे. पुदुच्चेरीत कॉंग्रेसची सत्ता होती. पुदुच्चेरीत निवडणुका आहेत. निवडणूक प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी राहुल गांधी पुदुच्चेरीला गेले आणि काही दिवसांतच मुख्यमंत्री नारायणसामी यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. विधानसभेतील त्यांचे बहुमत संपले. काँग्रेस पक्षाचे आमदार फुटले. त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. दोन आमदार भाजपमध्ये सामील झाले. द्रमुकच्या आमदाराने राजीनामा दिला. विधानसभेत काँग्रेसचे फक्त ११ आमदार उरले. त्यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव दाखल करण्यात आला. तो मतदान टाकण्यापूर्वीच नारायणसामी यांनी राजीनामा दिला. त्यामुळे सध्या पुदुच्चेरीमध्ये राष्ट्रपती राजवट आहे. माजी मुख्यमंत्री रंगासामी हे विरोधी पक्षदलाचे नेते आहेत. सरकार स्थापनेसाठी त्यांनी दावा केलेला नाही. त्याचे कारण असे की, असे केल्यास नारायणसामी यांना सहानुभूती मिळेल. एक ‘सामी’ गेला आणि दुसरा ‘सामी’ आला, असे त्यांना होऊ द्यायचे नाही.
शशी थरूर यांनी याची चिंता करायला पाहिजे. पुदुच्चेरीतील घटना एकाकी घडली नाही. जानेवारीपासून नारायणसामी यांचे सरकार ‘आयसीयु’मध्ये गेले. सरकार धोक्यात आले आहे, हे उघड दिसत होते. अशा वेळी राष्ट्रीय नेते सरकार वाचविण्याच्या उचापती करत राहतात. झाले उलटे, राहुल गांधी आले आणि सरकार गेले. ग्रीक देशात मिडास राजाची दंतकथा सांगितली जाते. ‘मी ज्याला हात लावीन, त्याचे सोने होईल,’ असा वर त्याने मागून घेतला. जेवायला बसला, अन्नाला हात लावला ते सोनं झालं. मुलीला जवळ घेतली ती सोन्याची झाली. शेवटी राजाला हा वर परत करावा लागला. याला ‘मिडास टच’ असे म्हणतात. राहुल गांधींचा ‘मिडास टच’ ज्याला हात लावू त्याचे सरकार जाईल, असा आहे.
काँग्रेसला राहुल गांधींशिवाय पर्याय नाही, असे शशी थरूरपासून पी. चिदंबरमपर्यंत सर्वांचे म्हणणे आहे. गांधी घराण्याशिवाय काँग्रेस टिकू शकत नाही, अस्तित्वात राहू शकत नाही, असे सर्वांना प्रामाणिकपणे वाटते. त्यांचा प्रामाणिकपणा आपण मान्य करूया, कारण त्याला तशी कारणे आहेत. पं. नेहरू पंतप्रधान झाल्यादिवसापासून काँग्रेस पक्ष एक व्यक्तिकेंद्री पक्ष झाला. पं. नेहरू यांनी आपल्याला प्रतिस्पर्धी होऊ दिला नाही. जयप्रकाश नारायणसारखे थोर नेते कॉंग्रेसच्या बाहेर गेले. पटेल यांचा मृत्यू झाला. सुभाषचंद्र बोस अज्ञातात गेले. नेहरूंनी आपल्या मुलीची म्हणजे इंदिरा गांधींची वाट मोकळी करून दिली. इंदिरा गांधी यांनी कामराज, मोरारजी देसाई, निजलिंगप्पा इत्यादी ज्येष्ठ नेत्यांना काँग्रेस बाहेर काढले. नंतर ‘इंदिरा बोले, काँग्रेस डोले’ अशी परिस्थिती निर्माण झाली. नेहरू यांना काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीचा वारसा प्राप्त झाला. इंदिरा गांधींना नेहरूंचा वारसा मिळाला. राजीव गांधी यांना इंदिरा गांधींचा वारसा मिळाला आणि राहुल गांधी यांना मनमोहन सिंग यांचा वारसा मिळाला. मनमोहन सिंग हे कळसूत्री पंतप्रधान होते. राजकीय निर्णयक्षमतेचा पूर्ण अभाव असलेले नेतृत्व होते. दहा वर्षांत त्यांनी काँग्रेसचा जनाधार असलेला पाया खिळखिळा केला. राहुल गांधींकडे हा सर्व वारसा आला.
घराणेशाहीचे नाव आहे. पण, प्रभावी वलय नाही. वारसा हक्काने नेतृत्व प्राप्त झाले आहे. पण, नेतृत्वाची क्षमता नाही आणि त्यांना पर्याय शोधण्याची पक्षांतर्गत कोणतीही व्यवस्था नाही. सर्व नेते ‘१०, जनपथ’ म्हणजे गांधी निवासाकडे डोळे लावून बसलेले असतात. गांधी घराण्याबाहेरच्या पक्षाचा अध्यक्ष निवडला जाईल. पण, तो दुसरा मनमोहन सिंग असेल. म्हणजे कळसूत्री अध्यक्ष असेल. गांधी घराण्यातील तिघांना विचारल्याशिवाय तो काहीही निर्णय करू शकणार नाही. असा कळसूत्री अध्यक्ष घेऊन पक्षात नवचैतन्य कसे उभे राहणार? हे थरूर, चिदंबरम, गेहलोत जाणोत!
सशक्त राजकीय पक्ष उभा करण्यासाठी चार गोष्टी लागतात. १) पक्षाची विचारधारा, २) प्रतिभासंपन्न राजकीय नेता, ३) विचारधारेला समर्पित कार्यकर्ते, ४) अखिल भारतीय जनाधार. काँग्रेस पक्षाची विचारधारा कोणती? काँग्रेस नेते म्हणतात, ‘आमची विचारधारा सेक्युलॅरिझमची.’ प्रश्न असा निर्माण होतो की, सेक्युलॅरिझम म्हणजे काय? ते कुणालाच स्पष्ट करता येत नाही. काँग्रेसचा सेक्युलॅरिझम म्हणजे ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवणे. उदा- ‘३७० कलम’ काँग्रेस हटवू शकत होती, ‘तिहेरी तलाक’ बंद करू शकत होती, ‘समान नागरी कायदा’ आणू शकत होती, ते केले असते तर सेक्युलॅरिझमची अंमलबजावणी झाली असती. काँग्रेसचा सेक्युलॅरिझम म्हणजे मुसलमानांतील कट्टरपंथीयांचे तुष्टीकरण आणि सुधारणावाद्यांची कत्तल असे झाले. सामाजिक अभिसरण करण्यासाठी दलित, मागासवर्गीय, अनुसूचित जमाती यांच्या सबलीकरणासाठी आणि सहभागितेसाठी खूप काही काँग्रेसला करता आले असते, यातील त्यांनी काही केले नाही. काँग्रेसची विचारधारा एकच झाली, येन-केन-प्रकारे सत्तेवर बसणे आणि त्यासाठी आवश्यक असतील त्या भूमिका घेणे, कोलांट्या उड्या मारणे सुरू झाले. काँग्रेस म्हणजे सत्ताभोगींचा वर्ग झाला.
पक्षाला प्रतिभाशाली नेता लागतो. या राजकीय नेत्याला राजकारणातील ज्वलंत प्रश्न कोणते आहेत, याचे अचूक ज्ञान असावे लागते. हे प्रश्न लोकभाषेत मांडण्याची कल्पनाशक्ती लागते. जनतेला या प्रश्नांच्या भोवती विविध मार्गांनी गोळा करावे लागते. पक्षाचा संदेश लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी समर्पित कार्यकर्ते लागतात. काँग्रेसकडे यापैकी काहीही सध्या तरी नाही. याचा अर्थ काँग्रेस लयाला जाणार का? असा करणे अगदी धाडसाचे होईल. सध्याचा काँग्रेसचा कालखंड हा काँग्रेसच्या नवसर्जनाचा कालखंड आहे. काँग्रेसमध्ये नको असलेल्या गोष्टी या कालखंडात परिस्थितीच्या रेट्यामध्ये आपोआपच नामशेष होत जातील. जीवशास्त्राचा नियम असा आहे की, नको असलेल्या गोष्टी हळूहळू कमी कमी होत जातात. काँग्रेसला विचारधारा म्हणून लोकांना काय सांगायचे, कार्यकर्त्यांना काय सांगायचे याचे चिंतन करावे लागेल. ३० वर्षांपूर्वीच्या गोष्टी आज सांगून काही उपयोग नाही. काँगेस नावाची जी चळवळ उभी राहिली, ती राष्ट्रीय होती आणि सगळ्या विचारधारेचे लोक यात होते. नेहरूंनी या राष्ट्रीय चळवळीला राजकीय पक्ष केले. राष्ट्रीय विचारधारा सोडून दिली आणि समाजवाद, सेक्युलॅरिझमची भाषा सुरू केली. त्यात समाजवाद १९९० सालीच काँग्रेसने सोडून दिला आणि २०१४ साली जनतेने काँग्रेसचा सेक्युलॅरिझम नाकारला. मग आता पुढे काय? आजही काँग्रेसमध्ये राजकीय विद्वान खूप आहेत, राजकीय नेतृत्वाची क्षमता असणारेही खूप आहेत, त्यांना भाजपला पर्याय उभा करावा लागेल आणि त्याची विचारधारा कोणती? नाकारलेली विचारधारा मेलेले मढे झाली आहे. या मेलेल्या मढ्यात जुन्या विचारधारेचा प्राण फुंकता येणार नाही.
आमच्या दृष्टीने काँग्रेसपुढे विचारधारा म्हणून एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे हिंदुत्वाचा राजकीय आशय व्यक्त करण्याचा. या हिंदुत्वाच्या पायावरच काँग्रेस स्वातंत्र्यापूर्वी उभी राहिली. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, लाला लजपतराय, अॅनी बेझेंट, सरदार वल्लभाई पटेल, मालवीय, के. एन. मुन्सी, अशी कितीतरी नावे घेता येतात. प्रत्येकाने हिंदुत्वाचा कालानुरूप राजकीय, सामाजिक आशय मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचे पुनरुज्जीवन केल्याशिवाय काँग्रेसचे पुनरुज्जीवन होणे कठीण आहे. ‘हिंदू’, ‘हिंदुत्व’ इत्यादी शब्द न वापरतादेखील हा आशय कसा व्यक्त करता येतो, याचा गृहपाठ नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसला दिलेला आहे. राहुल गांधींच्या तो डोक्यावरून जात असेल, तर दुसर्या कुणीतरी तो डोक्यात घेतला पाहिजे. ‘चौकीदार चोर हैं’, ‘पंतप्रधान डरपोक हैं’, वगैरे राहुल गांधींच्या घोषणा त्यांचे बालीशपण दाखवितात आणि ही वेळ आता काँग्रेसच्या दृष्टीने बालीशपणा करण्याची नसून प्रौढपणा करण्याची आहे. पुदुच्चेरीचा हा निरोप काँग्रेससाठी आहे.