पूजा चव्हाण प्रकरण महत्वाच्या वळणावर
यवतमाळ : स्वतःला बंजारा समाजाचे नेते म्हणवून घेणारे वनमंत्री राठोड यांना आता बंजारा समाजानेच मोठा धक्का दिला आहे. पूजा चव्हाण प्रकरणाची निःपक्ष चौकशी व्हावी, तसेच तिला न्याय मिळावा, अशी मागणी बंजारा समाजाने परिपत्रक काढून केली आहे. आम्ही कुणाचेही समर्थन करत नाही, दोषींवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी समाजाने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र लिहून सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
बीडची बंजारा समाजातील तरुणी पूजा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले आहे. या प्रकरणी सरकारचे वनमंत्री संजय राठोड यांच्याबद्दल संशयाचे वातारवण निर्माण झाले आहे. त्या प्रकरणाची योग्य चौकशी व्हायला हवी. राठोड यांच्यामुळे बंजारा समाजाबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकाराची सीबीआय मार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी बंजारा क्रांती दल महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष देविदास राठोड यांनी केली आहे. दोषींविरोधात कडक कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे काय कारवाई करणार ?
संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. पूजा चव्हाण प्रकरणात मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप होत आहेत. संजय राठोड यांच्यावर महाविकास आघाडीतील नाराज असल्याची चर्चा आहे. राठोड यांचा राजीनामा घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायोजनांची कठोर अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, दुसरीकडे पूजा चव्हाण प्रकरणावरून चर्चेत असलेले मंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी पोहरादेवी येथे मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले. त्यामुळे महाविकास आघाडीची प्रतिमा मलीन झाल्याचा प्रकार घडला असल्याने मुख्यमंत्री कारवाई करणार का हा देखील प्रश्न आहे.
शरद पवार नाराज
महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे राठोड यांच्यावर नाराज आहेत. तसेच पवार यांनी राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनावरही आक्षेप घेतल्याची सुत्रांची माहिती आहे. पोहरादेवी येथे दर्शनासाठी गेलेल्या संजय राठोड यांनी बंजारा समाजातील हजारो समर्थकांना एकत्र करून नियमांचा आणि सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवला. यावर महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. आता यावर उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार आहेत.