अक्कलकोट आणि गाणगापूर या धार्मिक स्थळांचे महत्त्व तर आपण सर्वच जाणतो. पण पायी वारी माध्यमातून साधलेल्या वेगळ्या भक्तीची अन् स्वामीभक्तांची माहिती आज इथे वाचायला मिळणार आहे.
गेली पाच वर्षे सातत्याने सोलापूर स्थानक ते अक्कलकोट श्रीक्षेत्र पायी वारी करण्याचा उपक्रम भांडुप येथील तरुण मंडळी करत आहेत, ज्यांनी आपल्या समूहालाच नाव दिलेले आहे ‘अक्कलकोट वारी समूह.’ हा उपक्रम एकंदरीत २० तरुण राबवतात आणि भक्तीची एक वेगळी व्याख्या रचू पाहतायत. पायी वारी म्हटले की, निरंतर मंदिर मार्गावर चालत राहणे, देवाचे नामस्मरण करणे, भक्तीगीते गाणे, देवाचा जयघोष करणे या सर्व गोष्टींचा तर आपोआप समावेश होतोच. पण या तरुणांच्या भक्तीचा वेगळेपणा म्हणजे वारी माध्यमातून एकत्रित होऊन आपले योगदान सामाजिक उपक्रमासाठी देणे हे आहे.
२०१९ साली पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी मुळे उद्भवलेली पूरपरिस्थिती आणि त्याचे गंभीर परिणाम तर आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहेत. यावेळी पश्चिम महाराष्ट्राकडे संपूर्ण भारताचे लक्ष झाले होते आणि मदतीचे असंख्य हातदेखील पुढे सरसावले होते. अशात या तरुणांनी भक्ती माध्यमातून एकत्र राहून सांगली कोल्हापूर पूरपरिस्थितीत मदत पोहोचवण्याचे कार्य केले होते. इतकेच नव्हे, तर गेल्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये ‘लॉकडाऊन’ आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्या कारणाने अक्कलकोट वारी पायी करणे शक्य झाले नसले, तरी वर्षभरात या समूहाचा गरजूंपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपात पोहोचून त्यांना मदत करण्याचे कार्य निरंतर चालूच होते.
जे का रंजले गांजले ।
त्यासि म्हणे जो आपुलें ॥
तो चि साधु ओळखावा ।
देव तेथें चि जाणावा ॥
संत तुकारामांच्या अभांगाप्रमाणे खर्या अर्थाने या तरुणांना भक्ती आणि सेवा या शब्दांचा अर्थ उमजलेला आहे आणि त्यांनी प्रत्यक्षात तो अंमलात आणलेला आहे. या वर्षी वारी शनिवार, दि. २० फेब्रुवारी रोजी चालू झाली आणि दि. २२ फेब्रुवारी (सोमवार) संपन्न झाली. या अंतर्गत सोलापूर स्थानक ते अक्कलकोट हे अंतर पायी गाठण्यात आले. या पायी प्रवासात रस्त्यालगत फुटपाथवर राहणार्या बेघर गरजूंना या समूहाकडून खाऊ, अन्नधान्य आणि साहित्यरुपी मदत कारण्यात आली.
इतकंच नव्हे, तर मुक्या जनावरांनादेखील खाद्यवाटप करण्यात आला. स्वामींनी आपल्या भक्तांना आपल्या लिलायांमध्ये माणसातला देव ओळखण्याचा संदेश बर्याचदा दिलेला आहे, तो खर्या अर्थाने संदेश या तरुणांना उमगला आहे, असे म्हणायला हरकत नाही. पुढे जाऊन या समूहाचा मुंबईतील ट्राफिक सिग्नलवर भीक मागणार्या किंवा वस्तू विकणार्या मुलांचे भविष्य बदलावे आणि त्यांना शिकता यावे, या हेतूने चालू करण्यात आलेल्या ‘हॅप्पीवाल्या’ पाठशाळेत मदत करण्याचा मानस स्पष्ट केलेला आहे. एकीकडे कोरोनामुळे जगभरात भीतीचा अंधार पसरतो आहे आणि त्यात अक्कलकोट वारी समहाकडून आगळ्या-वेगळ्या स्वरूपात भक्ती करण्याचा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला जातो आहे. अशा या स्वामीभक्तांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहेत. नक्कीच त्यांची सेवास्वामींना फार आवडली असेल, याबाबत तीळमात्र शंका नाही. श्री स्वामी समर्थ!
- विजय माने
९६६४२१२५६८
अक्कलकोट पायी वारी घडवणे आणि या माध्यमातून असे सामाजिक उपक्रम हाताळले जाणे ही तर स्वामींची इच्छा बाकी आम्ही सर्व निमित्त मात्र आहोत. पण या पद्धतीने सेवा करण्याचे भाग्य मिळणे ही आम्हा सर्वांसाठी फार मोठी गोष्ट आहे. पायी वारी काढताना सुरुवातीच्या पहिल्या एक-दोन वर्षांत काही अडचणीदेखील आल्या, पण अडचणीसोबत प्रत्येक वेळी आशेची नवीन किरणेदेखील स्वामींनी पसरवलीत आणि अडचणी आपोआप दूर होत गेल्या आणि सोबतच वारी माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा निश्चय दृढ होत गेला. पुढे जाऊन ही वारी दरवर्षी याच पद्धतीने निरंतर चालू ठेवण्याचा आमच्या समूहाचा उद्देश आहे आणि सोबतच स्वामींच्या आशीर्वादाने जास्तीत जास्त सामाजिक उपक्रमात आम्ही आपले योगदान देणार आहोत.
- निलेश कुंभार (अक्कलकोट वारी समूह प्रतिनिधी)