शक्तीप्रदर्शन पाहून पूजाला न्याय मिळेल असे वाटते का?
23-Feb-2021
Total Views |
मंत्री राठोड उद्धव ठाकरेंवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत का ?
मुंबई : ७ फेब्रुवारी रोजी पुण्यातील वानवाडी भागातील इमारतीवरून उडी घेऊन बंजारा समाजाचा तरुण चेहरा, टीकटॉक स्टार हिने आपले जीवन संपवले. या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारचे मंत्री संजय राठोड यांचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट नाव घेत आरोप केले.आत्तापर्यंत पूजा चव्हाणच्या १२-१३ ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. मंत्री राठोड गेले १५ दिवस प्रसिद्धीमाध्यमांपासून दूर मौन बाळगून होते.
शिवसेनेसह कुठल्याही सरकारच्या नेत्याने राठोड यांच्याबद्दल ब्र देखील काढला नाही. राठोड आले ते थेट मंगळवारी २३ फेब्रुवारी रोजी पोहरादेवी मंदिरात हजारो समर्थकांच्या उपस्थित हजर झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनाबद्दल जनतेला अल्टीमेटम दिला असताना राठोडांनी मात्र, याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. मंदिराबाहेर त्यांच्या समर्थकांनी एकच धुडगूस घातला. हा सर्व प्रकार पूर्वनियोजित असल्याचा एकंदरीत परिस्थितीवरून दिसून येत होता. राठोड यवतमाळमध्ये येणार म्हटल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थकांना व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आधीच पूर्वसूचना दिल्या होत्या. प्रसार माध्यमांपुढे शक्तीप्रदर्शन करण्याची संधी कार्यकर्त्यांनी सोडली नाहीच. शिवाय त्यांना कसे या प्रकरणात गोवले जात आहे, याचा एकच सूर आळवला होता.
राठोड पोहरादेवी मंदिरात पोहोचले. त्यांच्या स्वागतासाठी एकच गर्दी जमली होती. त्यानंतर संत सेवालाल महाराजांचे दर्शन घेऊन राठोड मंदिराबाहेर पोहोचले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांपुढे गेल्या १५ दिवसानंतर मौन सोडले. पूजा चव्हाण कुटूंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे, या प्रकारात माझे नाव गोवण्याचा प्रयत्न झाला त्यावरून घाणेरडे राजकारण सुरू आहे, असा बचाव राठोड यांनी केला. राठोड हेच मुद्दे १५ दिवसांपूर्वी लगेचच का मांडले नाहीत, इतके दिवस आकांडतांडव सुरू असताना ते गप्प का होते हा प्रश्नही आहेच.
या प्रकारात पूजा चव्हाणचा जीव गेला. तरीही राठोड यांनी त्यांचीच राजकीय कारकिर्द धोक्यात आणण्यासाठी कसा प्रयत्न केला जात आहे, असाही आरोप केला. चौकशी सुरू आहे, वाट पहा माझ्या परिवाराची बदनामी थांबवा, असेही ते म्हणाले. राठोड यांना पूजासोबतच्या फोटोवरूनही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सामाजिक क्षेत्रात काम करत असताना सर्वांसोबत फोटो काढावे लागतात, असे मोघम उत्तर दिले. आपल्या बचावासाठी राठोड यांनी ओबीसी समाजाचे नावही पुढे केले, "मी ओबीसींसाठी काम करणारा नेता आहे, त्यामुळे माझ्या बदनामीचा कट रचण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचेही राठोड म्हणाले.
मुलीच्या आयुष्यापुढे समाजाचे नेतृत्व मोठे आहे का ?
शिवसेनेचे मंत्री असलेले राठोड हे बंजारा समाजाचे मोठे नेते असल्याचा दावा ते स्वतः करतात. राठोड यांनी मंगळवारी शक्तीप्रदर्शन करून हाच इशारा पक्षाला आणि विरोधी पक्षांनाही दिला. पूजा चव्हाण प्रकरणी काय कारवाई होणार याबद्दल प्रश्नचिन्ह आहेच, मात्र, उद्धव ठाकरे सहजासहजी राठोड यांचा राजीनामा घेऊन नाराज करतील, असे चित्र तूर्त दिसत नाही. त्यामुळेच महाविकास आघाडीतील मोठे नेते राठोड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
नैतिकतेचे काय ?
संजय राठोड विदर्भ यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदारसंघात सलग तीन टर्म आमदार आहेत. आमदार म्हणून राठोड यांचे वलय आहे, शिवाय वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्यानंतरच्या बंजारा समाजातील नेत्यांपैकी एक राठोड आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघात बंजारा समाजाचा मोठा पगडा आहे. पाच लाख मतदार असलेल्या या समाजाच्या नेत्यावर कारवाई मुख्यमंत्री करणे शिवाय तेही त्यांच्याच पक्षातील नेत्याविरोधात हे इतक्या सहज शक्य नाही. त्यासाठी ठोस पुरावे पीडितेच्या नातेवाईकांना उभे करावे लागणार आहेत. याच कारणामुळे १३ ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्यानंतरही राठोड यांच्यावर कुणी थेट बोट उगारलेले नाही. मात्र, नैतिकतेच्या मुद्द्यावरून तरी किमान मंत्री राजीनामा देतील हा देखील न सुटणारा प्रश्न आहे.
पूजाच्या घरच्यांचे काय होणार ?
पूजा चव्हाणच्या घरच्यांनी मुलीची बदनामी थांबवा, अशी मागणी केली आहे. पूजाने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा दावा तिच्या कुटूंबियांनी केला आहे. तिच्यावर पोल्ट्रीचे कर्ज असल्याचेही तिचे वडिल म्हणाले होते. सातत्याने त्यांच्या घरच्यांकडूनही केलेल्या वक्तव्यांमध्ये तफावत आढळत आहे. आता पूजाच्या कुटूंबियांना न्याय मिळणार का हा देखील प्रश्न आहे. पोहरा देवी गडावर तरी किमान राठोड यांनी खरे बोलावे, खोटे बोलून समाजाची दिशाभूल करू नये, ७ ते २१ पर्यंत शहरातील सर्व सीसीटीव्ही छायाचित्रण तपासावे, अशी मागणी पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी केली आहे.
सोशल डिस्टंसिंगचा फज्जा
मंत्री राठोड यांच्या ताफ्यात एकूण १६ वाहनांचा फौजफाटा होता. मंदिरात केवळ २५ जणांना प्रवेश होता. २४० पोलीस पूर्वनियोजित ठिकाणी तैनात होते. मात्र, परिस्थिती चिघळल्याने अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. समर्थकांनी राठोड आल्यावर एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीसांनी नाईलाजाने लाठीचार्ज केला. शासकीय कार्यक्रम घरी बसून करावेत, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्र्यांच्याच कार्यक्रमाला असा प्रकार घडल्याने आता कारवाई होणार का याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
पूजाला जाऊन महिनाही नाही अन् राठोडांचे फटाक्यात स्वागत
पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर एक महिनाही उलटला नाही. अवघ्या १५ दिवसांनंतर राठोड यांनी प्रथमच सार्वजनिकरित्या मौन सोडले होते. यवतमाळ दौऱ्यावर राठोड आल्यावर त्यांचे फटाक्यांनी आणि ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले. जयघोष केला. खुद्द राठोड यांनी मंदिरात जाऊन वाद्ये वाजवली.
धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांचाही पाठींबा
संजय राठोड पोहरादेवी येथील चार पिठांचे दर्शन करून बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांच्या सह माध्यमांशी बोलले. पोहरादेवी गडावर वर्दळ वाढली, मुख्य प्रवेश द्वाराच्या दिशेने लोकांचा ओघ सुरू, संजय राठोड यांच्या स्वागतासाठी हजारो नागरिक मंदिर प्रवेशद्वारावर दाखल होते. महाराजांनीही राठोड यांना पाठींबा दर्शवला होता.