आता खबरदारी हाच उपाय

21 Feb 2021 21:15:06

JP_1  H x W: 0



शास्त्रज्ञ आणि डॉक्टर आधीच म्हणाले आहेत की, कोरोना विषाणू आपले स्वरूप बदलतच राहतो आणि कोणत्याही देशात त्याचे नवीन रूप पाहता येत असेल तर हे आश्चर्यकारक नाही आणि ते कोणत्याही पातळीवर धोकादायकदेखील सिद्ध होऊ शकतात. अशा परिस्थितीत दक्षता बाळगणे हे अधिक महत्त्वपूर्ण होते.



बाजारात कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यावर काहीशी बेफिकिरी जगभरातील नागरिकांमध्ये दिसून आली. त्यामुळे सध्या रुग्णसंख्येत कमालीची वृद्धी होतानाचे चित्र जगातील बहुतांश राष्ट्रांत दिसून येत आहे. भूतकाळात जगाने कोरोनाची व कोरोनामुळे निर्माण झालेली अनेक आव्हाने पहिली आहेत. जगातील इतर देशांत सापडलेल्या व अंगोला, टांझानिया आणि दक्षिण आफ्रिका येथून भारतात आलेल्या काही लोकांमध्ये कोरोना विषाणूचे एक नवीन रूप दिसून आले. ब्राझीलमधील एका व्यक्तीमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे जगभरात पुन्हा कोरोना डोके वर काढतो की काय, अशी नवीन शक्यता निर्माण झाली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीस कोरोनाच्या नवीन प्रकाराविषयी ब्रिटनमधील लोकांमार्फत पहिल्यांदाच उघडकीस आले होते. जेव्हा हेच लोक कोणतीही खबरदारी न घेता तपासणीशिवाय इतर शहरांमध्ये पोहोचले तेव्हा हे संकट भारतात आले. या लोकांमार्फत किती लोकांना हा आजार झाला असेल, हे सांगता येत नाही. ब्रिटनमधील असे सुमारे २०० लोक भारतात पोहोचले. शास्त्रज्ञ आणि डॉक्टर आधीच म्हणाले आहेत की, कोरोना विषाणू आपले स्वरूप बदलतच राहतो आणि कोणत्याही देशात त्याचे नवीन रूप पाहता येत असेल तर हे आश्चर्यकारक नाही आणि ते कोणत्याही पातळीवर धोकादायकदेखील सिद्ध होऊ शकतात. अशा परिस्थितीत दक्षता बाळगणे हे अधिक महत्त्वपूर्ण होते. कोरोना संसर्गाने लोकसंख्येच्या किती मोठ्या समूहाला आपल्या जाळ्यात वेढले आहे आणि त्याचे स्वरूप आणि रूप यामुळे जगाची किती हानी झाली आहे, याबाबत कोणाच्या मनात दुमत असण्याचे कोणतेही कारण नाही.


सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र आणि केरळमध्ये झपाट्याने वाढ होत असताना, अगदी कमालीचा हलगर्जीपणा करून काही नागरिकांनी पुन्हा देशावर गंभीर संकट आणलेले दिसते. केरळ आणि महाराष्ट्र वगळता देशातील बहुतेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची परिस्थिती आता नियंत्रणात असून कोरोनाग्रस्त मृतांचा आकडा शून्यावर आला आहे. यामध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू तसेच उत्तर-पूर्व राज्यांचा समावेश आहे जिथे संसर्ग सर्वाधिक पसरला होता. परंतु, गेल्या एका आठवड्यात महाराष्ट्रात दररोज तीन हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत आता लोकलसेवा सुरू झाली आहे. वरवर पाहता गर्दी पूर्वीप्रमाणेच वाढली आहे. अशा परिस्थितीत धोका वाढण्यापासून रोखणे सोपे नाही. महाराष्ट्र आणि केरळमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या केंद्रीय पक्षाने आपल्या अहवालात या राज्यांतील दुर्लक्षाकडे लक्ष वेधले आहे. कोरोना संसर्गाची प्रकरणे शोधण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर ‘आरटीपीसीआर’ तपासणी करीत नाहीत, तथापि या दोन राज्यांतील संसर्गाचे प्रकार नवीन विषाणूचे रूप असू शकते का, हाही एक प्रश्न आहे. परंतु, अद्याप याची खातरजमा झालेली नाही. कोरोना साथीच्या आजाराला सामोरे जाण्यासाठी भारताने केलेल्या निरंतर प्रयत्नांचा परिणाम म्हणून ब्रिटन, जर्मनी आणि अमेरिकेसारखे दिवस आम्हाला दिसले नाहीत, हे त्या दिवसांचे परिणाम आहेत.



शास्त्रज्ञांच्या परिश्रमांमुळे देशी लसदेखील लागू करण्यात आली आणि देशात लसीकरणाची मोहीम सुरू झाली. अशा परिस्थितीत लोक जर निष्काळजीपणा दाखवू लागले, तर संसर्ग पसरण्यास वेळ लागणार नाही. सुरुवातीपासूनच, यावर जोर देण्यात आला आहे की, कोरोना संक्रमणापासून मास्क आणि सुरक्षित अंतरासह सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. खबरदारी बाळगणे आणि सजगता बाळगणे हे सर्वस्वी नागरिकांच्याच हातात आहे. कोरोना हे स्थानिक संकट नाही, तर ती जागतिक स्तरावरील महामारी आहे, याची जाणीव जगभरातील नागरिकांनी ठेवणे आवश्यक आहे. न केवळ भारतात तर तुलनेने प्रगत म्हणून मिरविल्या जाणार्‍या पश्चिमी राष्ट्रातील नागरिकांचे बेफिकीर वागणे हे कोरोनाचे वाण जगभर वाटण्याचाच प्रकार आहे. कोणताही आजार हा त्याचे नवीन रूप घेऊन पुन्हा पुन्हा येत असतो. हे आजच्या प्रगत युगात समजावून सांगण्याची गरज नाही. कारण, आजच्या समाजास ते सहज समजू शकते. अशा वेळी केवळ सावधानता बाळगणे हाच एकमेव उपाय आहे. याची जाणीव आता जगभरातील नागरिकांनी बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा जगाला पुन्हा एकदा नवीन आव्हानाचा नव्याने सामना करावा लागेल, यात शंका नाही.
Powered By Sangraha 9.0