देशविरोधी ‘टूलकिट’शी शिवसेनेचे कनेक्शन?

21 Feb 2021 18:16:32

toolkit_1  H x




मुंबई (सोमेश कोलगे):
भारताविरोधात तयार करण्यात आलेल्या ‘टूलकिट’प्रकरणी बीड जिल्ह्यातील शंतनू मुळूकवर आरोप ठेवण्यात आले आहेत, तर शंतनू मुळूक याचे वडील शिवसेनेचे माजी नगरसेवक शिवलाल मुळूक गेल्या सात-आठ दिवसांपासून गायब असल्याचे समजते. तसेच शंतनू मुळूकचा भाऊ सचिन मुळूक हा शिवसेनेचा जिल्हाप्रमुख असल्याचे समजते.


मूळचा बीड जिल्ह्यातील असलेला शंतनू मुळूक बंगळुरू येथे शिकायला होता. शंतनूवर देशविरोधी ‘टूलकिट’ तयार करण्यात सहभाग असल्याचा आरोप आहे. ग्रेटा थनबर्ग या एका किशोरवयीन विदेशी मुलीने कृषी कायदेविरोधी आंदोलनाला पाठिंबा देताना चुकून ‘टूलकिट’च शेअर केले होते. ‘टूलकिट’मध्ये टप्प्याटप्प्याने भारताविरोधात कृत्रिम जनआक्रोश तयार करण्याविषयी सूचना होत्या. परंतु, ग्रेटा थनबर्ग हिने थेट हे ‘स्ट्रॅटेजिक डॉक्युमेंट’ उघड केले. ग्रेटाच्या चुकीमुळे भारताविरोधात सुरू असलेला हा आंतरराष्ट्रीय कट उघड झाला होता. भारतातील अनेकांचा यात सहभाग असल्याचे उघड झाले होते. त्यापैकी दिशा रवि हिला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.


मुंबईतील निकीता जेकब आणि बीडमधील शंतनू मुळूक याच्यावरही आरोप आहेत. निकीता आणि शंतनू यांना उच्च न्यायालयाने ट्रान्झिट जामीन दिला आहे. परंतु, शंतनू याच्या घरात शिवसेनेचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर येते. शंतनूचे वडील शिवसेनेचे माजी नगरसेवक शिवलाल गेल्या आठ-नऊ दिवसांपासून चमत्कारीकरीत्या गायब असल्याची चर्चा आहे. शंतनूचा नातेवाईक सचिन मुळूक सेनेचा जिल्हाप्रमुख असून, त्याने शंतनूला पाठिंबा देणारे विधान केले होते. शिवसेनेची याविषयी अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.मुळूक यांच्यासमवेत बीड जिल्ह्यातील डाव्या विचारांचे काही आघाडीचे कार्यकर्ते, पत्रकारही गायब असल्याची माहिती समोर येते आहे. देशाविरोधात मोठा कट रचणार्‍या ‘टूलकिट’ प्रकरणाशी शिवसेनेचा नेमका संबंध काय, हा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
Powered By Sangraha 9.0