माहूलमधील कांदळवनांवर भराव
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - माहूल परिसरातील कांदळवनांवर भराव टाकल्याप्रकरणी कांदळवन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी दोघांना अटक केली. यामधील महिला आरोपी कांदळवनांवर भराव टाकण्यासाठी कुख्यात असून काही दिवसांपासून अधिकारी तिच्या मागावर होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या भागाचा दौरा करुन संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले होते.
कांदळवनांवर भराव टाकणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करण्यास 'कांदळवन कक्षा'ने सुरूवात केली आहे. गेल्या महिन्यात आदित्य ठाकरे यांनी 'कांदळवन कक्षा'च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी कांदळवनांवर भराव टाकणाऱ्यांविरोधात कडक शासन करण्याचे आदेश दिले होते. माहूल येथील कांदळवनांवर वाढत्या भरावाच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी ४ फेब्रुवारी रोजी या भागाचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत कांदळवन कक्षाचे अधिकारी उपस्थित होते. या दौऱ्यादरम्यान त्यांना वन विभागाबरोबरच महसूल विभागाच्या जागेवरील कांदळवनांवर भराव टाकल्याचे दिसले. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाईचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
त्यानुसार 'कांदळवन कक्षा'च्या मध्य मुंबई वन परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी संबंधित आरोपींचा शोध सुरू केला. माहूल परिसरातील कांदळवनांवर राजरोसपणे सिमेंट-विटांचा राडारोडा टाकण्यात येतो. रात्रीच्या वेळी हे काम चालत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. यामधील एक महिला आरोपी कांदळवनांवर भराव टाकण्यामध्ये कुख्यात असल्याचे समजले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी तिला पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, ५६ वर्षीय ही महिला अधिकाऱ्यांच्या हातून निसटत होती. अखेरीस बुधवारी राणी मणी अर्जुन नामक या महिलेला वाशी नाका परिसरातून भराव करण्यासाठी वापरत असलेल्या ट्रॅकसह अटक करण्यात आल्याची माहिती मध्य मुंबईचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांनी दिली. ही महिला सिमेंट-विटांचा राडारोडा उचलण्याचे कंत्राट स्वीकारत असून हा राडारोडा ती कांदळवनांमध्ये येऊन टाकत असल्याचे त्यांनी सांगितले. या महिलेसोबत शिफकउल्ला चौधरी नामक व्यक्तीला देखील ताब्यात घेण्यात आले.
दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता राणी मणी अर्जुन हिला आरोग्याच्या कारणास्तव न्यायालयाने जामीन मंजूर केला, तर चौधरीला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. ही कारवाई 'कांदळवन कक्षा'च्या उपवनसंरक्षक निनू सोमराज यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत करण्यात आली. कारवाईत सहाय्यक वनसंरक्षक आर.टी.मगदुम, सुरेश वरक, वनपाल मोढवे, मन्सुरी, वनरक्षक नागरगोजे, झुगरे, पोले, जाधव, झाडबुके, कांबळे आणि गाडेकर यांचा सहभाग होता.