फखराबाद येथील निवृत्त सैन्याधिकारी माणिक देशपांडे यांच्या ग्रामविकास व कृषी क्षेत्रातील कार्याचा आढावा घेणारा लेख...
भारताच्या समृद्धी आणि सार्वभौमत्वासाठी ‘जवान’ आणि ‘किसान’ हे दोन घटक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. या विचाराने अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील फखराबाद येथील माणिक दत्तात्रय देशपांडे यांनी आपल्या गावात सैन्यभरतीसाठी युवकांना प्रेरित करण्याबरोबरच, सेंद्रिय शेती आणि सहकाराच्या माध्यमातून आर्थिक चळवळ सुरू केली आहे.
देशपांडे यांनी भारतीय सैन्यात ‘रडार इंजिनिअर’ म्हणून ११ वर्षे सेवा बजावली. १९७१च्या युद्धात त्यांचा सक्रिय सहभाग होता. या युद्धात पाठीवर जखमी झाल्याने त्यांनी सैन्यातून वैद्यकीय निवृत्ती घेतली. त्यानंतर ‘डीआरडीओ’मध्ये त्यांनी ‘तंत्र अधिकारी’ म्हणून सेवा बजावली. या काळात त्यांनी संरक्षण संशोधन क्षेत्रात अतुलनीय योगदान देत विविध प्रकल्पात सक्रिय सहभाग नोंदविला. अनेक थोर संशोधकांच्या समवेत कार्य करण्याची संधी या काळात देशपांडे यांना मिळाली. माजी सैनिकांच्या विविध समस्या दूर करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ‘डीआरडीओ’मधील निवृत्तीपश्चात त्यांनी आपले पूर्ण लक्ष हे कृषी क्षेत्राकडे वळविले. फखराबाद येथे असलेल्या वडिलोपार्जित जमिनीवर त्यांनी आता आपले कसब दाखविण्यास सुरुवात केली. गावात शेती करत गावातील जवळपास अनेक शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सोसायटीच्या परिप्रेक्षात आणत त्यांना सभासद करून घेतले. यामुळे त्या शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास सुरुवात झाली. तसेच, ज्या शेतकरी वर्गाची अल्पभूमी ही सोसायटीच्या नोंदणीत होती.
त्या शेतकऱ्यांची सर्व भूमी त्यांनी सोसायटीच्या दस्तावेजात नमूद केली. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक अर्थसाहाय्य अधिक मात्रेने मिळण्यास सुरुवात झाली. सुरुवातीपासून देशपांडे यांचा ‘विषमुक्त शेती’ हा ध्यास होता. तसेच बळीराजा म्हणूनदेखील देशाचे देणे लागतो, या जाणिवेतून शेतीला नवसंजीवनी देण्यासाठी देशपांडे यांनी आपल्या गावात एक चळवळ सुरू केली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यासाठी त्यांनी सर्वांत आधी स्वत:च्या शेतीत विविध प्रयोग करत शेतीच्या सेंद्रियकरणाच्या मोहिमेस सुरुवात केली. सेंद्रिय शेती ही देशी गाईशी संबंधित आहे. कारण, ही शेती करत असताना आवश्यक असणारी रोगनियंत्रक द्रव्य जसे, जीवामृत आणि दशपर्णी अर्क हे गोमूत्र व इतर नैसर्गिक औषधीयुक्त वनस्पतींचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. यासाठी त्यांनी गोपालनास सुरुवात केली. यामुळे देशपांडे यांनी कृषी व पशुपालन याची एक नवी मुहूर्तमेढ रोवली. जेणेकरून गावकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीची शेती व कृषीपूरक उत्पादने याबाबत माहिती होण्यास मोठी मदत झाली.
कमी पर्जन्यमान असलेले फखराबाद हे गाव असून येथे उन्हाळ्यात दुष्काळाची समस्या ही कायमच डोके वर काढत असते. सेंद्रिय शेतीमुळे पाण्याचा वापर कमी होण्यास मदत होते. तसेच, जमिनीचा पोत उत्तम राहण्यास मदत होते. त्यामुळे जमीन नापीक होण्याचे प्रमाणदेखील कमी होण्यास मदत झाली. त्यामुळे देशपांडे यांचा सेंद्रिय शेतीचा प्रयोग हा एका अर्थाने गावासाठी फलदायी ठरला, असेच म्हणावे लागेल. शेतकरी वर्गाला पीक उत्पादनासाठी कर्जाची सुलभता व्हावी, तसेच आर्थिक साक्षरता गावात रुजावी, यासाठी देशपांडे यांच्या प्रयत्नांतून अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची फखराबाद येथे मुहूर्तमेढ रोवण्यात आली. यामुळे गावात आर्थिक चलनवलन होण्यास सुरुवात झाली. गाव पातळीवरील असणाऱ्या विविध कार्यकारी सोसायट्या या कायमच अनेक कारणांनी चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. अहमदनगर जिल्ह्यात काही मोजक्या अशा सोसायट्या आहेत की, ज्यांच्या स्वतःच्या इमारती आहेत. गावाचा विकास व्हावा आणि गावकऱ्यांना रोजगार प्राप्त व्हावा तसेच विविध कार्यकारी सोसायटीस आपले आर्थिक चलनवलन विनासायास करता यावे, यासाठी देशपांडे यांनी अथक प्रयत्नांतून गावात सोसायटीची इमारत साकारली. या इमारतीच्या माध्यमातून काही गाळे काढत, तेथे गावातील नागरिकांना व्यवसाय स्थापण्यासाठी मोठी मदत झाली. तसेच त्या माध्यमातून प्राप्त भाड्यामुळे सोसायटीस आर्थिक उत्पन्न वाढविणे शक्य झाले. देशपांडे यांचे कार्य गाव आणि गावकरी यांना केंद्रस्थानी ठेवूनच सुरु आहे. त्यामुळे ते मागील दहा वर्षांपासून या सोसायटीच्या बिनविरोध अध्यक्षपदी विराजमान आहेत.
शेती आणि सैन्य हे भारतीय प्रगतीचे दोन महत्त्वाचे अंग आहेत, अशी देशपांडे यांची धारणा आहे. त्यामुळे गावात सैन्य शिक्षण रुजावे व गावातील अधिकाधिक तरुण हे सैन्यात दाखल व्हावे, याकरिता देशपांडे हे गावातील तरुणांना व्यायामाचे धडे देत आहेत. वयाच्या ७२व्या वर्षी देशपांडे हे अतिशय निरोगी असून आजही १६ ते १८ तास काम करताना दिसून येतात. त्यांचा हा उत्साह गावातील तरुणांना आदर्शवत असाच आहे. आधुनिक युगाची कास धरत देशपांडे यांनी आपल्या शेतीचे यांत्रिकीकरण करण्यावर भर दिला. देशपांडे यांची शेती ही सर्व अत्याधुनिक साधनांनी युक्त अशी आहे. यासाठी त्यांची पत्नी मालती यांचा त्यांना पाठिंबा मिळत आहे. एका गावात उभे राहिलेले हे कार्य इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांचा कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!