फॅशन डिझायनर मायलेकी

11 Feb 2021 21:34:11
ananda  _1  H x
 
 
 
लांजेकर कुटुंबाचे सध्या ऐरोली आणि ठाणे येथे ‘बुटीक’ आहे. तसेच ड्रेस तयार करण्याचा कारखानादेखील आहे. जवळपास दहापेक्षा जास्त कर्मचारी त्यांच्याकडे कार्यरत आहेत. भविष्यात ‘अनंदा’च्या संपूर्ण महाराष्ट्रात शाखा सुरू करण्याचा या लांजेकर मायलेकींचा मानस आहे.
 
 
 
दोन मास्कची किंमत फक्त १०० रुपये. मात्र, ते मास्क देण्यासाठी ती ऐरोलीहून बोरिवलीला गेली. मास्कच्या किमतीपेक्षा पेट्रोलला जास्त खर्च झाला. पण, पैशांपेक्षा तिने ग्राहकसेवेला प्राधान्य दिले. परिणामी, असे अनेक ग्राहक तिच्या ‘बुटीक’च्या वर्धापनदिनी महाराष्ट्राच्या विविध भागांतून खास तिला भेटायला आले आणि विविध ड्रेस त्यांनी खरेदीसुद्धा केले. ग्राहकांची किंमत ज्याला उमजली, त्यालाच खरा व्यवसाय कळला आणि तोच खरा उद्योजक म्हणून घडला. अवघ्या पंचविशीतील प्रियांका लांजेकरला ग्राहकांची किंमत कळली म्हणूनच तिचा ‘अनंदा’ हा ब्रॅण्ड आता लोकप्रिय होत आहे.
 
 
 
रत्नागिरीतील लांजामधले हे मूळचे लांजेकर कुटुंब. हरीश लांजेकर हे एका कपड्याच्या कंपनीत कामाला होते, तर त्यांची पत्नी शुभांगी लांजेकर या एका प्रसिद्ध ‘फॅशन इन्स्टिट्यूट’मध्ये शिक्षिका होत्या. या दाम्पत्यांना दोन अपत्यं. प्रियांका आणि प्रथमेश. प्रथमेश सध्या माहिती व तंत्रज्ञान विषयातून ‘बीएस्सी’ करत आहे. प्रियांका लहानपणापासून थोडीशी वेगळी. कापड उद्योगाचं बाळकडू जणू आई-वडिलांकडूनच तिला मिळाल्यासारखं.
 
 
तिचं शालेय शिक्षण ऐरोलीच्या श्रीराम विद्यालयात झालं. त्यानंतर तिने अकरावी, बारावी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून केली. दरम्यान, प्रियांकाला नृत्याची आवड असल्याने ती नृत्याचे धडे नृत्यगुरू मयूर वैद्य यांच्याकडे गिरवत होती. तिने विविध पुरस्कार समारंभ कार्यक्रमात नृत्य सादर केलेली आहेत. तसेच काही कोरिओग्राफर्सना साहाय्यक म्हणून सोबतदेखील केलेली आहे. या नृत्याशी निगडित महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे वस्त्रप्रावरणे. या वस्त्रप्रावरणांविषयी तिला बरंचसं काही मयूर वैद्य यांच्याकडे शिकावयास मिळाले.
 
 
प्रियांकाने बारावीनंतर ‘बीएमएम’ विषय निवडला. ‘बीएमएम’ म्हणजे जनमाध्यम विषयाची पदवी. ही पदवी प्राप्त केल्यानंतर पत्रकारिता, निवेदन क्षेत्र, जाहिरात क्षेत्र, चित्रपट, अशी अनेक क्षेत्र तिच्यासाठी पर्याय म्हणून उभी होती. मात्र, प्रियांकाने आपल्या आईवडिलांचा वारसा पुढे न्यायचे निश्चित केले. तिने सांताक्रूझच्या ‘एसएनडीटी’ विद्यापीठातून ‘फॅशन डिझायनिंग’ची पदविका प्राप्त केली. त्यासाठी आपल्या आयुष्यातील बहुमोल अशा दोन वर्षांची तिने गुंतवणूक केली.
 
दरम्यान, प्रियांकाची आई घरातूनच ‘फॅशन डिझायनिंग’ संदर्भात वर्ग घेत असे. विशेषत: अचूक आकाराचा ‘ब्लाऊज’ शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्याकडे अशाप्रकारचे ‘ब्लाऊज’ शिकण्यासाठी दूर भागातून मुली येत. या मुलींना शिकवलेले ‘ब्लाऊज’ शुभांगी लांजेकर यांच्याकडेच असायचे. एका वस्त्रप्रावरणाच्या प्रदर्शनात त्यांनी एक दालन घेतले आणि या ब्लाऊजचे सादरीकरण केले. त्यांच्या दालनास प्रचंड प्रतिसाद मिळाला.
 
खरंतर प्रियांका आणि शुभांगी यांनी विविध कापडांच्या दुकानांतून कपड्यांचे अनेक नमुने जमा केले होते. या कपड्यांना एकत्र करून त्यावर डिझाईन करून त्यांनी ‘ब्लाऊज’ तयार केले. या ‘ब्लाऊजेस’ना प्रचंड मागणी येऊ लागली. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई, पालघर, नाशिक, पुणे अशा ठिकाणी भरवल्या जाणार्‍या ग्राहक प्रदर्शनात हे ‘ब्लाऊजेस’ हातोहात खपले जाऊ लागले.
 
यासोबतच प्रियांका लग्न समारंभ, मेहंदी, हळदी समारंभ, संगीत अशा विविध समारंभासाठी मराठमोळे डिझाईन केलेले कपडे तयार करू लागली. या वस्त्रप्रावरणांनासुद्धा जोरदार मागणी वाढू लागली. खण हा मराठमोळा कापडाचा प्रकार तर प्रियांकाचा सगळ्यात आवडता. खणाचा वापर करून तिने ‘रेडिमेड ब्लाऊज’, ‘वन पीस’, रिवर्सिबल जॅकेट’ तयार केले. या अनोख्या मराठमोळ्या वस्त्रांचीही स्तुती होऊ लागली. हाताने चितारलेले आणि कशिदाकाम केलेले ‘ब्लाऊज’ यांनासुद्धा खूप मागणी येऊ लागली.
प्रसिद्ध आणि नवोदित अशा दोन्ही प्रकारच्या अभिनेत्री आज ‘अनंदा’च्या ग्राहक आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम वनिता खरात, रसिका वेंगुर्लेकर या अभिनेत्री, सुवेधा देसाई, भार्गवी चिरमुले, सुकन्या कुलकर्णी सारख्या नावाजलेल्या अभिनेत्री अशा अनेक अभिनेत्रींचा यांत समावेश आहे. ‘झी मराठी’, ‘स्टार प्रवाह’, ‘सोनी मराठी’, ‘कलर्स मराठी’ या मराठी मनोरंजन वाहिन्यांवर सुरू असणार्‍या बहुतांश मालिकेत प्रमुख अभिनेत्री जी वस्त्रप्रावरणे परिधान करतात, ती सारी वस्त्रे प्रियांका आणि शुभांगी या मायलेकींनीच डिझाईन केलेली आहेत.
 
दि. ५ जानेवारी, २०२० मध्ये ठाण्यात ‘अनंदा’ नावाचे ‘बुटीक’ प्रियांका लांजेकरने सुरू केले. प्रतिसाद तुफान होता. मध्येच कोरोना या महामारीचे वारे वाहू लागले, ‘लॉकडाऊन’ सुरू झाले आणि प्रियांकाला ‘अनंदा’ तात्पुरतं बंद करावं लागलं. याकाळात ऑनलाईन विक्रीचं जणू पेवच फुटलं होतं. काहीजण घरी काही टाईमपास नाही म्हणून वस्तूंची ऑनलाईन विक्री करू लागले होते. आपल्याकडे तर एवढं दर्जेदार उत्पादन असून आपण शांत का बसायचे, हा प्रियांकाला प्रश्न पडला. तिने आपला मोर्चा मास्ककडे वळवला.
 
एव्हाना मास्क हा सुरक्षिततेच्या परवलीचा शब्द झाला होता. सुरुवातीला सुरक्षितता म्हणून मास्क वापरला जायचा. काही महिन्याने ‘अनलॉक’ झाल्यावर विवाह-समारंभ सुरू झाले आणि मास्क ‘फॅशन आयकॉन’ झाला. प्रियांकाने या मास्कला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये साकारले. खणाचे, लग्नसमारंभाचे, नवरीचे, नथीचे डिझाईन असलेले, पैठणीवाले, नवरात्रीचे नऊ रंगांचे असे खास मास्क तिने डिझाईन केले. समाजमाध्यमातून हे मास्क तिने व्हायरल केले.
 
मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातून प्रचंड मागणी मास्कला येऊ लागली. फक्त ५० रुपयांत मनपसंद डिझाईनचे मास्क मिळत असल्याने मागणी वाढली होती. ग्राहकांची सेवा करण्याची संधी प्रियांकाला सोडायची नव्हती. अगदी दोन मास्क ग्राहकाला देण्यासाठी तिने ऐरोली ते बोरिवली असा प्रवास दुचाकीवरून केला आहे. ‘लॉकडाऊन’दरम्यान तिने तब्बल एक हजारपेक्षा जास्त डिझायनर मास्कची विक्री केली. ग्राहकांची सेवा व समाधान यास तिने नेहमीच प्राथमिकता दिली. यामुळेच की काय, ५ जानेवारी, २०२१ रोजी ‘अनंदा’ या ठाण्याच्या ‘बुटीक’ला एक वर्ष झाले म्हणून तिने छोटेखानी ‘एक्झिबिशन’ ठेवले होते. या प्रदर्शनाला ते सारे ग्राहक अगदी झाडून आले होते. या ‘बुटीक’बाहेरची गर्दी पाहून शेजारील गुजराती-मारवाडी दुकानदार आले. “एका मराठी माणसाच्या दुकानाबाहेर पहिल्यांदा एवढी गर्दी पाहत आहोत,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
 
लांजेकर कुटुंबाचे सध्या ऐरोली आणि ठाणे येथे ‘बुटीक’ आहे. तसेच ड्रेस तयार करण्याचा कारखानादेखील आहे. जवळपास दहापेक्षा जास्त कर्मचारी त्यांच्याकडे कार्यरत आहेत. भविष्यात ‘अनंदा’च्या संपूर्ण महाराष्ट्रात शाखा सुरू करण्याचा या लांजेकर मायलेकींचा मानस आहे. शुभांगी लांजेकर यांनी ‘फॅशन डिझायनिंग’ उद्योगक्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवला, यासाठी ठाण्याच्या ‘स्वयंसिद्धा संस्थे’ने ‘यशस्वी महिला उद्योजिका’ म्हणून त्यांना नुकतेच गौरविले. मॉरिशस येथील ‘बृहन्महाराष्ट्र मंडळा’ने मराठमोळं प्रदर्शन भरवलं होतं. या प्रदर्शनात जिथे अन्य महिला आपल्या आप्तांसह आल्या होत्या तिथे प्रियांका एकटीच गेली होती. प्रदर्शनात वस्त्रप्रावरणे मांडण्यापासून ते विक्री करण्यापर्यंत सगळं काही तिने एकटीनेच केले. या प्रदर्शनात सहभागी होणारी ती सर्वांत लहान उद्योजिका होती. यासाठी तिचा मंडळाने ‘युवा उद्योजिका’ हा पुरस्कार देऊन गौरव केला होता.
 
“ ‘लॉकडाऊन’मध्ये एकीकडे नैराश्याचे वातावरण पसरले होते. मात्र, आम्ही मनावर ताबा ठेवला. कोणत्याही परिस्थितीत हार मानायची नाही, हे मनाशी निश्चित केले. प्रियांकाचे बाबा निवृत्त झालेले. त्यामुळे हेच आमच्यासाठी उत्पन्नाचे एकमेव स्रोत. म्हणून पुन्हा जोमाने सुरुवात केली. आज ‘अनंदा’ हा जवळपास प्रत्येक मालिकेत अभिनेत्रींच्या पेहरावामध्ये दिसणारा ब्रॅण्ड झाला आहे,” असे शुभांगी लांजेकर सांगत होत्या. हार न मानण्याची हीच ताकद आपल्या भारतीय महिलेचा स्थायीभाव आहे. या गुणामुळेच कितीही संकटे आली तरी भारत हरलेला नाही आणि हरणारदेखील नाही. शुभांगी लांजेकर आणि प्रियांका या मायलेकी खर्‍या अर्थाने हा वारसा जपत आहेत.
 



 
Powered By Sangraha 9.0