‘सत्याग्रही’ सत्यजित

10 Feb 2021 20:31:22

satyajit  _1  H
 

उपदेशांची मुक्ताफळे उधळून शासकांना, राजकारण्यांना दोष देत राहण्यापेक्षा समाजात बदल घडवून आणण्यासाठी झटणारे ठाण्यातील सत्याग्रही सत्यजित शाह हे दक्ष नागरिक समाजाचे खरे आरसे आहेत. त्यांच्याविषयी...
 
 
 
सत्यजित शाह हे ठाण्यातील एक ‘चळवळे व्यक्तिमत्त्व.’ सत्यजित यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे झाला. मराठी माध्यमातून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी यांत्रिक अभियांत्रिकी स्नातक, (बी.ई. मेकॅनिकल),आर्थिक व्यवस्थापन पदविका (डिप्लोमा इन फायनान्शियल मॅनेजमेंट), तसेच विपणन व्यवस्थापन पदविका (डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट) धारण केली. १९६४ ते २००१ मुंबईतील चेंबूरमध्ये वास्तव्य करणारे सत्यजित २००१ साली ठाण्यातील घोडबंदर परिसरात राहायला आले.
 
 
 
उदरनिर्वाहासाठी त्यांनी अभियांत्रिकी वस्तूंच्या विपणनाचा व्यवसाय सुरू केला.तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाच, त्यांच्या पाहण्यात एक अप्रतिम व्यंगचित्र आले. ज्यात दोन प्रसंग चितारले होते. पहिल्या प्रसंगात वक्ता सभेला जमलेल्या व्यक्तींना विचारतो की, “व्हू वॉण्ट्स चेंज?” म्हणजे, कोणाला बदल हवा आहे? त्यावर प्रत्येक व्यक्ती हात वर करते. दुसर्‍यांदा तो वक्ता विचारतो की, “व्हू वॉण्ट्स टू चेंज?” म्हणजेच, कोण हा बदल घडवून आणणार? त्यावर मात्र कुणीच हात वर केला नाही, प्रत्येकानेच खाली मुंडी घातली. ही बहुसंख्य नागरिकांची मानसिकता बदलण्याचा निर्धार सत्यजित यांनी केला.
 
 
त्यानुसार, वयाच्या २१-२२व्या वर्षीपासून प्रत्येक समस्येवर आवाज उठविण्यास सुरुवात केली. एक दिवस सायंकाळच्या वेळी घरी येत असताना रस्त्यावरील खड्ड्यात सत्यजित दुचाकीसह कोसळले. सुदैवाने डोक्यावर ‘हेल्मेट’ (सत्यजित यांचा मराठीचा आग्रह) शिरस्त्राण असल्याने दुखापतीवर निभावले. रक्तबंबाळ अवस्थेतच ते स्थानिक नगरसेवकाकडे गेले.त्यांच्याकडे कैफियत मांडल्यानंतर दुसर्‍याच दिवशी रस्त्यावरील खड्डा गायब झाला होता.तेव्हापासून नागरिक ते जागरूक नागरिक होण्याकडे सत्यजित यांची वाटचाल सुरू झाली, ती आजतागायत. दक्ष नागरिक म्हणून सत्यजित यांनी अनेक समस्या मार्गी लावल्या आहेत. वानगीदाखल सांगायचे झाले, तर अनेक सामाजिक प्रश्नांनाही त्यांनी वाचा फोडून न्याय मिळवला.
 
 
सन २००२ ते २०१२ अशी दहा वर्षे ठाणे पश्चिमेकडील घोडबंदर रस्ता येथील पाच प्रदूषणकारी कारखान्यांविरुद्ध लढा देऊन हा परिसर प्रदूषणमुक्त केला. अर्थातच याकामी त्यांना भाजपचे आमदार संजय केळकर आणि प्रसारमाध्यमांनी मोलाचे सहकार्य केले. गेली आठ ते दहा वर्षे ते भटक्या कुत्र्यांच्या अमर्याद वाढणार्‍या संख्येविरुद्ध, तसेच श्वानदंशांच्या घटनांविरुद्ध लढत आहेत. मार्च २०१३ पासून महाराष्ट्र राज्यातील पोलीस, वाहतूक पोलीस यांनी दुचाकी चालविताना शिरस्त्राण घालावे, तसेच वाहनांवर पोलीस मानचिन्ह मिरवणार्‍यांविरुद्ध सत्यजित हे डोळ्यात तेल घालून पहारेकर्‍याची भूमिका बजावत आहेत.
 
 
विनाशिरस्त्राण पोलीस दिसला रे दिसला की, त्याचे चित्रण करून सत्यजित वरपर्यंत तक्रार करतात. त्यामुळे, पोलिसांनीही सत्यजित यांचा वेगळ्या प्रकारे धसका घेतल्याचे अनेकांकडून ऐकावयास मिळते. रिक्षातील जादा प्रवासी तसेच अपघातास निमंत्रण देणार्‍या कापुरबावडी व माजिवडा येथील उड्डाणपुलांच्या सदोष बांधकामाविरोधातही तसेच खड्ड्यांविरोधात त्यांनी शड्डू ठोकला आहे. ठाणे महापालिका परिवहन सेवेचा गाडा रुळावर यावा, यासाठी त्यांनी अनेक खस्ता खाल्या. त्यातून, परिवहन बसेसचा वापर पोलीस करतात, त्याचे अनेक वर्षे रखडलेल्या लाखो रुपयांपैकी काही रक्कम पोलीस खात्याकडून परिवहनला मिळाली. कोपरी सेतू (पूल) रुंदीकरणासाठी दक्ष नागरिक निलेश आंबेकर यांच्यासोबत सत्यजित उभे ठाकले होते.
 
 
नागरी सुरक्षा दलाचे सदस्य असलेले सत्यजित आपल्या वाढदिवसानिमित्त ठाणे वाहतूक पोलिसांना स्वतःच्या पैशातून वाहनांच्या धुरापासून वाचण्यासाठी मुखपट्टी (मास्क) व ध्वनिप्रदूषणापासून वाचण्यासाठी कानबोळे (इअर प्लग) यांचे वाटप केल्याचे सांगतात. दरवर्षी एका ज्येष्ठ नागरिकाचा सत्कार श्रीफळ व पुस्तक देऊन करतात. ‘दिवाळी पहाट’च्या कार्यक्रमात वाहतूक पोलिसांना घरातून दिवाळी फराळ नेऊन वाटप करण्यात त्यांच्या सहकारी मृदुला भावे यांनीदेखील आर्थिक मदत केली. याशिवाय, गेले १० ते ११ महिने मराठी माणसांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी समभाग गुंतवणूक करण्यासाठी उद्युक्त करून योग्य मार्गदर्शन व सल्ले मोफत देत आहेत. हे एकप्रकारे सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न असल्याचे ते मानतात.
 
 
अनेक पुरस्कारांवर आपली मोहर उमटविणारे सत्यजित अनेक वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंक व नियतकालिकांमध्ये त्यांचे लेखन-काव्य छापून येतच असते. २०१४ रोजीचा त्यांचा ‘आजची सत्यगीते’ हा पहिलावहिला खुमासदार काव्यसंग्रह वाचनीय आहे. याशिवाय, गेली काही वर्षे ते मराठी भाषेवर होणारे इंग्रजीचे आक्रमण थोपविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मराठी संभाषणात, व्यवहारात नेहमी वापरल्या जाणार्‍या इंग्रजी शब्दांना समानार्थी व सोप्पे मराठी शब्द, असा एक शब्दकोश ते बनवीत असून, आजपर्यंत अंदाजे पाच हजार शब्द तयार झाल्याचे ते सांगतात. मराठी माणूस वाढदिवसादिवशी ‘हॅप्पी बर्थडे टू यू’असे इंग्रजी गाणे गाऊन वाढदिवस साजरा करतो. यासाठी सत्यजित यांनी त्याच चालीत मराठमोळं गीत लिहिलं आहे. त्यांच्या सजग आणि चिकाटीपूर्ण कारकिर्दीला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!



- दीपक शेलार 
Powered By Sangraha 9.0